भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून महिलेला उमेदवारी देण्याचा विचार चालवल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेदरम्यान त्यांच्याशी चोडणकर यांची गोव्यातील उमेदवारीविषयी चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ‘मी गोव्यातील असल्याने साहजिक माझ्याकडे राजकीय वातावरणाविषयी त्यांनी विचारणा केली’, असे चोडणकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांनी उमेदवारीसाठी केलेला अर्ज स्थानिक पातळीवर न स्वीकारल्याने त्यांनी तो थेट छाननी समितीकडे पाठवला होता. मात्र, चोडणकर यांच्या उमेदवारीच्या इच्छेने गोम्स यांच्यासह खासदार सार्दिन यांच्यावरही मात केल्याचे दिसते. दक्षिण गोव्यातून सुरवातीला आम आदमी पक्षाने बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांची उमेदवारी जाहीर केली होती.
उत्तर गोव्यातून पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांची उमेदवारी जाहीर करण्याची तयारी त्यांनी चालवली होती. याच दरम्यान मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांच्या मधल्या फळीतील नेत्यांनी दिल्लीत चर्चा केली. दिल्ली आणि पंजाबमधील जागांच्या बदल्यात आपने गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेसने आघाडीच्या वतीने लढवाव्यात, असे ठरवले.
त्यानंतर आता उमेदवारी ठरवण्याची जबाबदारी काँग्रेसवर येऊन पडली आहे. काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्ज मागवले आणि त्या अर्जांवर छाननी समितीच्या बैठकीत विचार केला. अद्याप काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक दिल्लीत व्हायची आहे. ती झाल्यावरच पहिल्या यादीत गोव्याच्या दोन्ही जागांना स्थान मिळेल की नाही हे समजणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.