Goan Musical Instrument|Ghumat  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

गोमन्तक डिजिटल टीम

Goan Traditional Instrument Ghumat

राजेंद्र. पां. केरकर

मानवी समाजाला आदिम काळापासून संगीताची विलक्षण ओढ आहे. परिसरातल्या निसर्ग-पर्यावरणातल्या सूर, ताल, लय, नाद यांनी त्यांच्यातल्या संगीताच्या आवडीला वृद्धिंगत करण्याचे कार्य केले. निसर्गाच्या सान्निध्यात जगत असताना मानवी समाजात आदिम संगीताचा उगम झाला. संस्कारित, शिष्ट व कला-संगीताची धारा नसताना आदिम संगीताची निर्मिती झाली. प्रारंभी मानवी समाजातल्या कंठसंगीतातून लोकसंगीताला चालना मिळाली आणि कालांतराने त्याला वाद्यवादनाची साथ लाभली. कर्त्याची अनामिकता आणि निर्मितीचे अनादी-अनंत स्वरूप याद्वारे लोकसंगीत युक्त असले तरी विविधांगी लोकवाद्यांनी त्याला अधिकाधिक लोकप्रिय करण्यात योगदान दिले.

कंठसंगीतातल्या नैसर्गिकपणाने त्याला लोकसंगीतात (Goan Music) महत्त्वाचे स्थान प्रदान केले असले तरी कालांतराने कल्पकतेने केलेल्या लोकवाद्यांच्या वापराने त्याच्या परिणामकारकतेत भर घातली. कंठ संगीताच्या विविध प्रकारांनुसार लोकवाद्यांचा उपयोग निश्चित होत असतो. सामूहिक गीतांना मोठ्या आवाजाची, व्यक्तिगत गीतांना त्यामानाने नाजूक आवाजाची तर नृत्याच्या साथीतल्या गीतांसाठी अधिक दणकट व जास्त वाद्यांचा वापर केला जातो. वाद्यसंगीताचा उगम मुख्यतः जादूटोणा व त्याच्याशी संबंधित विधीतून, तर कंठसंगीताचा उगम मात्र हाकेतून झाला असे मानले जाते.

जगभरातल्या लोकगीत आणि लोकनृत्यासाठी झांज, टाळासारखी कंपित शरीर, ढोल, ढोलकीसारखी कंपित पटल, सारंगी, तंबोरा, एकतारीसारखी कंपिततंत्री आणि शिंग, तुतारीसारख्या कंपित वायुस्तंभ लोकवाद्यांचा वापर केला जातो.

घनवाद्य (इडिओफोन्स) अवनद्धवाद्य (मेंब्रेनोफोन्स), सुषिरवाद्य (अ‍ॅरोफोन्स), आणि तंतूवाद्य (कोर्डोफोन्स) या लोकवाद्यांनी लोकसंगीताच्या सादरीकरणाला नवी दिशा प्रदान केली आहे. निसर्गसंपन्न गोव्याच्या भूमीत कंठसंगीताने आदिम संगीत समृद्ध केले तर अवनद्ध वाद्यांनी या संगीताला ठेका धरण्याचे आणि लयीद्वारे अलंकृत करण्याची कामगिरी बजावली आहे. इथल्या मातीतून जन्माला आलेल्या ग्रामीण भागातल्या ‘सुंवारी’, ‘फाग’, ‘खाणपद’, ‘चंद्रावळ’ या संगीतप्रकारांना सजवण्यात ‘घुमट’, ‘म्हादळे’, ‘समेळ’ यांसारख्या चर्मवाद्यांचे विशेष योगदान आहे.

‘पाव रे सिद्धा’ अशी हाळी देऊन डमरू, टाळावरती संत सखुचे पवाडे गाणारे पर्येचे गोसावी, मृदंग-झांजीच्या संगीतावरती सादर होणारा काला, घुमट, समेळ आणि कासाळेवरती रंगणारी कष्टकऱ्यांची ‘तालगडी’ याद्वारे गोव्याच्या लोकसंगीताच्या (Goan Folk Music) वैविध्याची कल्पना येते. डमरू, मृदंग यासारख्या चर्मवाद्यांना गोव्यातल्या मूर्तिकलेत (Goan Sculpture Art) पूर्वापार स्थान लाभले असले तरी घुमटासारख्या चर्मवाद्याने इथल्या विविध जातीजमातींचे लोकसंगीत समृद्ध करण्यात शेकडो वर्षांपासून विशेष योगदान दिले आहे.

कुंभाराने घडवलेल्या मातीच्या घड्याच्या बुडाला जो काठ असतो त्याला घोरपडीच्या कातडीने आणि नैसर्गिक डिंकाचा वापर करून, सुंभाच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित मढवले जाते. हे वाद्य आडवे घेऊन किंवा गळ्यात घालून वाजवले जाते. वाजवणारा आपल्या उजव्या हाताने घुमटाच्या चामड्यावर थाप मारून आणि उघड्या असलेल्या त्याच्या तोंडावर डाव्या हाताने हवेचा दाब नियंत्रित करून तालाची निर्मिती करतो. घुमटातून निर्माण झालेल्या श्रवणीय तालावरती लोकगीतांचे आणि लोकनृत्याचे सादरीकरण केले जाते.

गोव्याच्या लोकसंस्कृतीत (Goan Folk Culture) घुमट या लोकवाद्याला अनन्यसाधारण स्थान आहे. इथल्या लोकगीत, लोकनृत्य यांच्या सादरीकरणाबरोबर बऱ्याच पारंपरिक लोकनाट्यांतदेखील त्याचा वापर अनिवार्य आहे. जेथे घुमटाचे वादन केले जाते अशा महाराष्ट्रातील कुडाळपासून ते कर्नाटकातील कारवारपर्यंतच्या भूमीचे गोव्याशी पूर्वापार नाते असल्याचे मानले जाते. सरड्याच्या कुळातील घोरपडीच्या चामड्याला, मातीच्या घड्याच्या बुडावर असलेल्या काठाला व्यवस्थितपणे मढवून हाताच्या थापीने आगळा वेगळा ताल निर्माण करण्याची इथल्या भूमिपुत्राची कला आणि कौशल्य उल्लेखनीय आहे.

त्यामुळे जेथे घुमट वाजते ती गोव्याची भूमी असे गोव्याच्या लोकसंस्कृतीचे (Goan Folk Culture) अभ्यासक विनायक खेडेकर यांनी म्हटलेले आहे ते वावगे नव्हे. घुमटासारखे चर्मवाद्य गोव्याच्या लोकसंस्कृतीचे भूषण ठरलेले असले तरी घुमटाचा वापर गोव्याच्या शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या काही प्रांतातल्या सण-उत्सवांच्या प्रसंगी प्रामुख्याने केला जातो. घुमट या गोव्यातल्या लोकवाद्याशी साधर्म्य दर्शविणारी चर्मवाद्ये अन्य प्रांतातल्या लोकसंस्कृतीने उपयोगात आणलेली आहेत.

काश्मिरातले ‘तुंबकनारी’, कर्नाटकातील ‘घुम्माटे’, आंध्रप्रदेशातील ‘घट नाट्यम्’ किंवा ‘बुर्रा’ आणि तामिळनाडूतील ‘जमुक्कू’ या पारंपरिक चर्मवाद्याचे काहीसे स्वरूप घुमटासारखे असले तरी जे भांडे कातडे मढवण्यासाठी वापरले जाते ते विशेषतः धातूचे वापरले जात असते. त्यामुळे मातीच्या घड्यावरती घोरपडीची कातडी मढवलेले घुमट हे वाद्य काही प्रमाणात भिन्न ठरते.

गोव्यातल्या लोकमानसाने घुमटाला उल्लेखनीय स्थान दिलेले आहे. केवळ लोककलाकारच नव्हे तर सर्वसामान्यही त्याकडे आदर आणि भक्तिपूर्वक पाहतात. शिगम्याच्या लोकगीतांतून (Shigmo Folk Songs) इथल्या लोकसंगीतात महत्त्वाचे स्थान असलेल्या इथल्या पारंपरिक लोकवाद्यांचा (Traditional Goan Instruments) प्रामुख्याने उल्लेख आढळतो.

शिगमो कोणी रचिलो

ईश्वराच्या देवांनी शिगमो रचिलो

मूर्तीयाच्या मातयेची देवांनी घुमट केली

खैयरीच्या रुखाचे देवांनी तोणयो केल्यो...

गोव्याच्या लोकसंस्कृतीत घुमट वाद्याचे स्थान जातीजमाती आणि धर्मांच्या भिंतीपल्याड पोहोचलेले आहे. त्यामुळे अंत्रूज महालातल्या कुळागारांच्या शीतल सावलीत रंगणारा गावडा जागर असो अथवा केप्यातल्या किणी या भाटातल्या ख्रिस्ती गावड्यांची धालोतली गाणी असोत किंवा:

आम्याच्या ताळा, सुकेल्या व्हाळा

येणया बाळा तू, घेयलेलो रे

बाळाल्यो घाग-थो, शेणल्यो व्हाळा

सोदून हाड बाळा, न्हंयी व्हाळा रे

अशी कुणबी नृत्यातल्या लोकगीताचे सादरीकरण असो; त्यात घुमट वादन हवेच! गोव्यातल्या पेडणे ते काणकोणपर्यंत होणाऱ्या धालोत्सवात लोकवाद्यांच्या वादनाला जरी मुळी वाव नसला तरी, म्हाऊस- सत्तरीतल्या धालोत्सवात महिलांमार्फत छोटेखानी रणमाले लोकनाट्याचे सादरीकरण केले जाते, त्यात चतुर्थीच्या सणात घुमट आरतीचे (Ghumat Aarti) विशेष प्रस्थ आहे. त्यावेळी गावोगावी वर्षभर वेगवेगळ्या श्रमाच्या कामात गुंतलेले हात घुमटावरती थाप मारतात ते तालातच. गोव्याच्या मातीतच संगीताची जी स्पंदने आहेत त्यांचा उत्स्फूर्त आविष्कार याचवेळी होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT