Ram Navami 2023: श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला येत्या बुधवारी (ता.29) डिचोलीत रामोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त 'गीत रामायण' या महाकाव्याचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी 6.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर हा सोहळा होणार आहे. अशी माहिती डिचोली रामोत्सव समितीचे संजय नाईक आणि उज्वला आचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरसेवक विजयकुमार नाटेकर, उदय जांभेकर, दत्तप्रसाद जोग, पापूराज मयेकर, मंदार गावडे, मनीषा पणजीकर, गोविंद साखळकर, प्रमोद गावकर आणि आश्विनी लामगावकर उपस्थित होते.
श्रीराम आणि हनुमान यांच्या प्रतिमेचे पूजन करून रामोत्सव सोहळ्याला सुरवात होणार आहे. त्यानंतर आधुनिक वाल्मिकी स्व. ग. दी. माडगुळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी साकारलेले 'गीत रामायण' या महाकाव्याचे सादरीकरण होणार आहे. सुप्रसिद्ध गायक किशोर भावे, हर्षा गणपुले आणि मंजिरी जोग हे कलाकार गीतरामायण सादर करणार आहेत.
त्यांना मनोज गणपुले, सुरेश आमोणकर, सतीश हेगडे आणि तारानाथ होलेगडी हे साथसंगत करणार आहेत. हिंदी गीतरामायणचे अनुवादक दत्तप्रसाद जोग या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे. अशी माहिती डिचोली रामोत्सव समितीतर्फे देण्यात आली. या सोहळ्याला रामभक्तांनी उपस्थित राहून गीतरामायणाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.