पणजी: चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजेच विघ्नहर्त्या गणरायांचे आज जल्लोषात आगमन होणार आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती आज थाटात विराजमान होऊन श्री गणेश चतुर्थीच्या पारंपरिक आनंदपर्वाला अपूर्व उत्साहात सुरुवात होणार आहे.
वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्या उत्सवाची मागील महिन्याभरापासून पूर्वतयारी सुरू होती. मात्र, प्रतीक्षेचे क्षण संपून आबालवृद्धांचे लाडके गणराय प्रत्येकाच्या घरी पाहुणा बनून पाहुणचार स्वीकारण्यासाठी दाखल झाले आहेत.
तमाम गोमंतकीय गणरायांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. राज्यातील काही भागांत मंगळवारीच अनेकांनी गणेशमूर्ती घरी नेल्या, तर अनेकजण बुधवारी सकाळी चित्रशाळेतून गणेशमूर्ती घरी नेणार आहेत. श्री गणरायाच्या आगमनासाठी घराची रंगरंगोटी करणे, सजावट करणे, आदी कामे झाली असून महिलांनी गोड धोड पदार्थ केले आहेत.
मान्यवरांकडून चतुर्थीच्या शुभेच्छा
राज्यातील जनतेला ही चतुर्थी सुखसमृद्धीची - मांगल्याची जावो, अशा स्वरूपाच्या शुभेच्छा गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच इतर मान्यवरांनी भाविकांना दिल्या आहेत.
डिचोली बाजारात चार टन फुलांची विक्री
चतुर्थीनिमित्त डिचोलीत फुलांचा बाजार फुलला असून, बाजारात सध्या फुलांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. गणेशभक्तांकडून फुलांना प्रचंड मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. चतुर्थीच्या पूर्वदिनी (मंगळवारी) एकाच दिवसात डिचोलीत सुमारे चार टन फुलांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. सायंकाळी बाजारातून फुले गायब झाली होती.
डिचोली बाजारात फुलांना तेजी आली असून, पुढील काही दिवस तरी फुलांना मागणी कायम राहणार आहे. मागणी असल्याने फुलांचा भावही वाढला आहे. पुढील दोन दिवसांत फुलांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास फुले आणखी महाग होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.
सुरक्षा यंत्रणेत वाढ
श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून राज्यातील वस्तीच्या ठिकाणी, सार्वजनिक गणेशोत्सव पूजनाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली असून विविध भागांत रात्रीची गस्त घालण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पहारा देखील पोलिसांनी ठेवला आहे.
राजधानी पणजी शहरातील बहुसंख्य नागरिक चतुर्थीनिमित्त गावी गेले असून एकूणच संपूर्ण राज्यभरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढविली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी विशेष बैठक घेण्यात आली. त्यात पेट्रोलिंग आणि नाकाबंदीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश पोलिस दलाला दिले आहेत.
- राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.