Bicholim News: गणेश चतुर्थीचा उत्सव जवळ आला असून, सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. चतुर्थीनिमित्त बाजारपेठा सजू लागल्या आहेत. सर्वत्र उत्साह संचारला असून सजावटीच्या साहित्यासह चतुर्थीसाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.
डिचोलीचा बाजारही फुलू लागलाय. पुढील दोन दिवसांनंतर खरेदीला आणखी जोर येणार आहे. सध्या डिचोलीचा बाजार चतुर्थीसाठीच्या सजावटीच्या वेगवेगळ्या आणि आकर्षक साहित्याने सजला आहे.
कागदी पताकांसह रेडिमेड पुष्पहार, मकर सजावटीचे मिळून आकर्षक आणि वेगवेगळ्या डिझाईनचे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. हे साहित्य गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक मखरही बाजारात आले आहेत.
गणपती बाप्पासाठी आकर्षक मुकुट, शेल्यांसह मोत्यांचे अलंकार बाजारात दाखल झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या वस्तू १० ते १५ टक्क्यांनी महागल्या आहेत.
‘चवथ’ म्हटली की नववधूला माहेराकडून ‘ओझे’ देण्याची प्रथा आहे. या ओझ्यात करंज्या, माटोळीच्या वस्तूंसह पाट, लाटणे, माटोळी, चौरंग आदी लाकडी साहित्य देण्यात येते. त्यामुळे चतुर्थी बाजारात लाकडी साहित्याला मागणी असते.
सध्या ते बाजारात उपलब्ध झाले आहे. फणसाच्या लाकडाच्या पाटांचे दर तीन ते सहा हजार रुपये जोडी असे आहेत. अजून या साहित्याला अपेक्षेप्रमाणे मागणी नसली तरी चतुर्थीच्या अगोदर दोन दिवस खरेदीला वेग येईल, असा विश्वास विक्रेते सखाराम गावस यांनी व्यक्त केला.
"गणेश चतुर्थी हा सर्वांचा उत्साहाचा सण. गणेशभक्त मोठ्या उत्साहात साहित्य खरेदी करतात. गणेशभक्तांचा कल लक्षात घेऊन सजावट साहित्य उपलब्ध करण्यात येते. सध्या खरेदी संथगतीने सुरू आहे."
"पुढील दोन दिवसांनी खरेदीला जोर येण्याची शक्यता आहे. यंदा वेगवेगळ्या डिझाईनचे सजावट साहित्य उपलब्ध आहे. सजावटीच्या साहित्यासह मोत्यांचे अलंकार, मुकुट हे साहित्य गणेशभक्तांसाठी आकर्षण आहे."
- विद्याधर शिरोडकर, घाऊक विक्रेते (डिचोली)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.