Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; साहेब, गांधी जयंती कधी साजरी करावी ?

Khari Kujbuj Political Satire: सरकार सध्या राज्यात आयआयटी प्रकल्प आणण्यासाठी चंग बांधून आहे. सुरवातीला काणकोण, सत्तरी, सांगे, आणि केपे अशा ठिकाणी आयआयटीसाठी सरकारने चाचपणी केली.

Sameer Panditrao

साहेब, गांधी जयंती कधी साजरी करावी ?

सुट्टी आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा समज सरकारी कर्मचाऱ्यांनी करून घेतला आहे. सरकारी कर्मचारी कोणत्याही स्थितीत आपली हक्काची सार्वजनिक सुट्टी फुकट घालवू पाहत नाहीत. यंदा गांधी जयंती व दसरा एकाच दिवशी आला आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सरकारी व सरकारी अनुदानित शाळांसाठी हजेरी सक्तीची असते. मात्र, यंदा गांधी जयंती दसऱ्याच्या दिवशी आल्यामुळे गांधी जयंती एक तारखेला साजरी करणे शक्य आहे का? यावर शाळा चालकांची म्हणे चर्चा सुरू आहे. गांधीजींचा जयंतीदिवस यंदा एक दिवस अगोदर साजरा केला जाण्याची दाट शक्यता आहे. ∙∙∙

कोडारचा ‘फियास्को’ होणार की काय...

सरकार सध्या राज्यात आयआयटी प्रकल्प आणण्यासाठी चंग बांधून आहे. सुरवातीला काणकोण, सत्तरी, सांगे, आणि केपे अशा ठिकाणी आयआयटीसाठी सरकारने चाचपणी केली मात्र तोंडघशी पडले. आता कोडार कोमुनिदादच्या सहकार्याने कोडार - बेतोड्यात आयआयटी आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत. मात्र कोडार - बेतोडावासीयही विरोधावर ठाम आहेत. गावागावात बैठका घेण्यात येत असून विरोधाची धार तीव्र होऊ लागली असल्याचे या लोकांशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले, त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणेच कोडारचा आयआयटी विषय फियास्को होणार की काय, अशी चर्चा सुरू आहे. आयआयटी ज्या भल्या मोठ्या जमिनीचा आग्रह बाळगते आहे, त्या तरी गोवेकरांनी का द्याव्यात, हा प्रश्‍न आहेच की! ∙∙∙

कशाला ही लपवाछपवी?

बिटस्‌ पिलानी मृत्‍यू प्रकरणात मृताच्‍या पोटात ड्रग्‍स सापडल्‍यावर पोलिसांनी हे ड्रग्‍स त्‍या विद्यार्थ्‍याने मुद्दामहून घेतले की, त्‍याच्‍यावर चालू असलेल्‍या औषधोपचारातून ते त्‍याच्‍या पोटात गेले, असा नवीन प्रश्‍न उभा केला आहे. वास्‍तविक जर असे ड्रग्‍स औषधोपचारातून गेले असते तर त्‍याचा अंश रक्‍तात सापडला असता. मात्र, हे ड्रग्‍स ऋषी नायरच्‍या पोटात सापडले आणि त्‍याच्‍यावर जो औषधोपचार होत होता, त्‍यापैकी एकाही औषधात सिंथेटीक ड्रग्‍सचा समावेश नव्‍हता. त्‍यामुळे पोलिस अशा वेगळ्‍याच निष्‍कर्षापर्यंत का पाेचले, की आणखीही कारण आहे, की त्‍यामुळे पाेलिसांकडून ही लपवाछपवी केली जातेय? ∙∙∙

रवींचा वाढदिन आणि विरोधक...

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे विद्यमान आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचा यंदा वाढदिन सोहळा भव्य प्रमाणात आयोजित करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. रवी पात्रावचे चाहते राज्यभर आहेत. त्यांची कार्यपद्धती पाहूनच लोक प्रभावित होतात, म्हणूनच लोकांच्या आग्रहाखातर यंदा हा वाढदिन सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. रवी पात्राव सध्या फोंड्याचे विद्यमान आमदार आहेत, त्यात त्यांचा वाढदिन सोहळा म्हणजे जंगी सोहळा असतो, फोंड्यातील बहुतांश मतदारांची या वाढदिन कार्यक्रमाला उपस्थिती असते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून नशीब आजमावू पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा खासगीत बोलताना कार्यकर्ते दावा करताहेत! ∙∙∙

गोव्यातही उभे राहणार बोन्साय किल्ले!

‘जो प्रांत आपला इतिहास व संस्कृती विसरतो, त्या प्रांताचा विकास अशक्य’ असे म्हणतात ते खरे. आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले की नाही, यावर इतिहास संशोधनात जरी वाद असला तरी येथील शिवप्रेमींच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल श्रद्धा व सन्मान आहे. राज्यात जरी मोठे गड-किल्ले नसले तरी गोमंतकीयांत छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या इतिहासावर मोठी श्रद्धा आहे. राज्यातील काही शिवप्रेमींनी एकत्रित येऊन किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले आहे. दिवाळीत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी घसघशीत बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. उत्कृष्ट किल्ल्याचा मॉडेल उभारणाऱ्या संघटनेला एक लाख, दुसऱ्या स्थानावर पन्नास हजार तर तिसऱ्या स्थानावर येणाऱ्या पथकाला तीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दहा हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायाच्या इतिहासाच्या संवर्धनासाठी व प्रचार क्रसारा साठी जे प्रयत्न चालविले आहे, ते उल्लेखनीय आहेत असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

चुकीच्या माहितीवर ‘आयआयटी’चा घाट

कोडार - बेतोडा येथील ‘आयआयटी’ला आता उघड विरोध होऊ लागला असून बेतोड्यात दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी बैठक घेऊन विरोध केल्यानंतर आता नजीकच्या गावातील लोकांनीही विरोध दर्शवला आहे. या भागातील ९५ टक्के लोक हे शेती-बागायतीवर जगत असून सरकारला कुणी तरी चुकीची माहिती दिली असल्यामुळेच सरकारकडून ‘आयआयटी’चा अट्टाहास केला जात असल्याची चर्चा येथील ग्रामस्थांत होत आहेत. गंमत पहा, जे सरकार अधिकारावर येते, ते असा प्रकल्पाचा पुरस्कार करते. विरोधक ते कोणत्याही पक्षाचे असोत, प्रकल्पाला विरोध करतात. जनता बिचारी मात्र त्यात भरडते आहे. ∙∙∙

किनारी भागांतील पंच ‘ईडी’च्या रडारवर?

गोव्यात सध्या ईडीच्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या मोठ्या मालमत्ता जप्तीनंतर लोकांमध्ये एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा आहे किनारी भागांतील पंच आणि सरपंचांबद्दल. लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत की, ‘ईडीने खऱ्या अर्थाने काळ्या पैशांवर लगाम घालायचा ठरवले असेल, तर त्यांनी किनारी भागांतील आजी-माजी पंच आणि सरपंचांच्या घरांवर धाडी टाकाव्यात.’ गेल्या काही वर्षांत अनेक पंचायत सदस्यांची संपत्ती ज्या गतीने वाढली आहे, ती सामान्य माणसाच्या कल्पनेपलिकडची आहे. पूर्वी साधी राहणी असलेल्या या लोकांकडे आज आलिशान गाड्या, बंगले आणि मोठी गुंतवणूक कशी आली, असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे, ईडीची पुढील कारवाई पंचांवर होते का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi High Court Bomb Threat: तीन बॉम्ब ठेवलेत, थोड्याच वेळात फुटतील... दिल्ली उच्च न्यायालयाला धमकीचा मेल, पोलिस अलर्ट मोडवर

Rangoli: एक लाख रुपयांची 'रांगोळी', गोव्यात उंबरठ्यापलीकडे गेलेली कला

Rohit Sharma: वनडे रिटायरमेंटच्या चर्चेला पूर्णविराम! रोहित शर्माच्या VIDEO शेअर करत दिलं मोठं अपडेट

खरी, खोटी म्हणत अखेर MRF ने नोकर भरतीच केली रद्द; सिंधुदुर्ग मनसे जिल्हाध्यक्षांना E-Mail वरुन दिली माहिती

Old Goa Crime: डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना; ICU मधील स्पॅनिश महिलेचा विनयभंग, DNB विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT