Free Cylinder in Goa : भारतीय जनता पक्षाने तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख केला होता. एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटली, तरी गोमंतकीयांना गॅस सिलिंडर मिळालेले नाहीत. याबद्दल आज भाजपचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की केवळ दारिद्र्य रेषेखालील व्यक्तिंनाच हे तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जातील. ही योजना रद्द करण्यात आलेली नाही.
या योजनेची रचना चालू आहे. तसेच दारिद्ररेषेखालील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण चालू आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर ही योजना राज्यात लागू केली जाईल, असेही खासदार तेंडुलकर यानी सांगितले. महागाई संदर्भात बोलताना ते म्हणाले, जगभरात महागाईचा भडका उडालेला आहे. आमच्या शेजारील काही राष्ट्रे डबघाईला आली आहेत. तरीसुद्धा भारत ताठ मानेने विकास करीत आहे. देशांमध्ये साधन सुविधांमध्ये वाढ होत आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. युक्रेन व रशियामध्ये जे युद्ध चालू आहे, त्याचा परिणामही बाजारभावावर होत आहे.
गोव्यात भाजप सत्तेवर आल्यास राज्यांतील गृहिणींना वर्ष भरात तीन सिलिंडर मोफत देणार, हा २०२३ च्या निवडणूक वचननाम्यात पहिल्या क्रमांकावर दिलेले वचन होते. त्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच ही सवलत मिळेल, असे कुठेही म्हटले नव्हते, आता जर भाजपचे खासदार ही योजना फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना असे म्हणत असतील, तर गोवा भाजपने आपल्या वचननाम्यातील नमनाच्य्या वचनालाच हरताळ फासण्याचे ठरवले आहे, हे स्पष्ट होत आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.
तीन मोफत सिलिंडर हे फक्त दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना असून या कुटुंबांचे आम्ही सर्व्हेक्षण करत आहोत, असे खासदार विनय तेंडूलकर यांनी आज म्हटले. त्याचा समाचार घेताना हे घुमजाव म्हणजे भाजपचे २०२३ सालचे ''तो मी नव्हेच'' हे नाटक आहे. जे सरकारं आपल्या वचननाम्यातील पहिल्या वचनाचीही पूर्तता करत नाही, त्यांनी दिलेल्या शब्दावर लोकांनी विश्वास कसा ठेवावा? हे आता मतदारांनीच ठरावे. याबाबत सरकारने भान ठेवावे, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.