helicopter rescue forest Fire with their water bucket Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa : म्हादई, सत्तरीत अग्निप्रकोप; हेलिकॉप्टरचा वापर

दैनिक गोमन्तक डिजिटल

गेल्या चार दिवसांपासून सत्तरीतील म्हादई अभयारण्य क्षेत्रात तसेच सत्तरी तालुक्यातील विविध भागांत आगीचे तांडव सुरूच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची अपरिमित हानी सुरू आहे. आज पुन्हा चार ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या. त्यात मोर्ले गडावर आग लागल्याची घटना समोर आली असून वन अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

साट्रे गड जळून खाक झाल्यानंतर दोन दिवसांपासून चोर्ला घाट परिसरात केरी, चरावणे आदी भागातील जंगल जळून खाक झाले. सुर्ला व वाघेरी डोंगर भागात आगीचे तांडव अद्याप सुरूच असून म्हादई अभयारण्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

साट्रे गडाला शनिवारपासून आग लागली होती. ती आता कमी झाली असली, तरी रविवारी सायंकाळी सुर्ला डोंगराला आग लागली. सोमवारी सकाळी वाघेरी डोंगराला आग लागली होती. आग विझविण्यासाठी स्थानिक, अग्निशामक दल तसेच वन खात्याचे कर्मचारी प्रयत्न करत असले तरी ती विझविण्यात त्यांना यश आलेले नाही.

आज सकाळपासून चोर्ला घाट परिसरातील आगीचा वणवा विझविण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरने पाण्याचा फवारा मारण्यात आला.

हळीदवाडा-केरी येथे काजू बाग खाक; लाखोंचे नुकसान

आज सत्तरीत चार ठिकाणी आग लागली. त्यात डिंगणे येथे गवताला आग लागली. हळीदवाडा-केरी येथे काजू बागायती व सुक्या गवताला आग लागून मोठी हानी झाली. त्यात काजूची झाडे जळून तीन लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली. अडवई-शिंगणे येथे काजू बागायतीला आग लागली, तर भेडशेवाडा-भुईपाल येथे आगीची दुर्घटना घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले आहे.

जैवविविधतेची मोठी हानी

मंगळवारी मोर्ले गडाच्या माथ्यावर आगीचे लोण पसरले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या अभयारण्यातील जैविक संपत्ती धोक्यात आली असून डोंगर परिसरातील काजू बागायतदारांच्या बागांवर संकट कोसळले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकसान भरपाई द्या!

सध्या काजूचा हंगाम सुरू असून ऐनवेळी पीक काढण्याच्या वेळी काजू बागायतींना आग लागण्याची घटना घडत आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

‘डॅनियर’ सतर्क

सध्या म्हादई अभयारण्य परिसरात अनेक ठिकाणी आग लागली असून ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असले तरी आग पूर्णत: विझलेली नाही. यासाठी सकाळी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि ‘डॅनियर’कडून (अधिक क्षमतेचे हेलिकॉप्टर) एरियल सर्वे करण्यात येईल. त्यानंतर आवश्‍यक असलेल्या ठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात येईल. ‘डॅनियर’ स्क्वाड्रनला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खाण पीटाच्या पाण्याचा वापर

म्हादई अभयारण्यातील आगीचे स्वरूप गंभीर आहे. अग्निशामक दल आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना ही आग विझविताना मर्यादा असल्याने नौदलाने आज येथे हेलिकॉप्टरचा वापर करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. यासाठी पिसुर्लेतील खाण पीटातील पाण्याचा वापर करण्यात आला.

आगीचे कारण गुलदस्त्यात

हे अग्निकांड कशामुळे सुरू झाले, हे समजणे कठीण झाले असून वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून जंगलातील जनावरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनेची मागणी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT