Flood Impact: विष्णू पद्माकर सावईकर Dainik Gomantak
गोवा

Flood Impact: 86 वर्षांच्या विष्णू पद्माकर सावईकरांच्या डोळ्यात प्रश्‍नांचा महापूर

‘एवढा पूर आला, आमचे सर्वस्व गेले, सरकार औदार्याचा आव आणणार, परंतु पुराचा प्रश्न समजून घेण्याची कुवत आमच्या नेत्यांमध्ये आहे काय? अधिकाऱ्यांकडे तेवढे कौशल्य आहे काय?’

दैनिक गोमंतक

पणजी: म्हादई (Mahadayi) खोऱ्यातील मंगळवारच्या दौऱ्यात मला एकाने संतापून प्रश्न केला, ‘एवढा पूर आला, आमचे सर्वस्व गेले, काही तुटपुंजी रक्कम सरकार आता आमच्या तोंडावर फेकून औदार्याचा मोठा आव आणणार आहे, परंतु पुराचा (Floods) प्रश्न समजून घेण्याची कुवत आमच्या नेत्यांमध्ये आहे काय? अधिकाऱ्यांकडे तेवढे कौशल्य आहे काय?’ (Flood Impact: Hundreds deprived of shelter amid floods in Goa)

म्हादईच्या खोऱ्याला या महापुराने गुरुवारी जबरदस्त तडाखा दिला. त्यातून अद्याप तो सावरलेला नाही. महापुराने सत्तरीतील अनेक भाग भूईसपाट झाल्याचे, त्यांच्या बागायती उद्‍ध्वस्त झाल्याने आणि हताश, उदासवाणे भयावह चित्र मी प्रत्यक्ष पाहात होतो. म्हादई नदीच्या नाल्याचे पाणी सहा फूट चढले व ते पुलावरून वाहात अडवई गावातील भटवाडीच्या घरांच्या छपरावरून वाहू लागले. घरे कोसळली. तेथे आता गुडघाभर चिखल निर्माण झाला आहे. त्यात उभे राहून 86 वर्षांचे विष्णू पद्माकर सावईकर माझ्या डोळ्यात पाहात प्रश्न करीत होते.

महापुराचाी गोव्याला जबर तडाखा

गांजे येथे म्हादईवर बंधारा बांधताना या जलप्रपाताचा विचार वरिष्ठांना सूचला नव्हता काय? माजी सरपंच उदयसिंह राणे यांचेही वडिलोपार्जित घर सध्या पुराच्या तडाख्यात दोलायमान स्थितीत आहे. ते म्हणाले, ‘बंधारा बांधताना कोणी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आपत्ती शास्त्राबद्दल पंचायत स्तरावर कधीच चर्चा झालेली नाही... हे आपल्या आदर्श राज्यातील सुशासन आहे.’

‘गोमन्तक’च्या पथकाची भेट...

दै. ‘गोमन्तक’च्या पथकाने म्हादई खोऱ्यातील या अनेक भागांना भेट दिली. तेव्हा स्थानिक शेतकरी व पंचायत सदस्य, शिवाय पंचायत पातळीवरील अधिकाऱ्यांना आपत्कालीन व्यवस्थापन योजनेसंदर्भात कधी कोणी विश्वासात घेतले नसल्याचे आढळून आले. त्यांना तसे प्रशिक्षणही देण्याची तरतूद आहे. दुर्दैवाने अनेक ठिकाणी हा विषय गांभीर्याने घेतलाच गेला नाही.

महापुराचाी गोव्याला जबर तडाखा

अतिवृष्टीमुळे पाणी वाहून नेण्याची मुख्य नदी व तिच्या उपनद्यांची क्षमता यांचा अभ्यास कधीच प्रत्यक्ष कार्यवाहीत आला नाही. 1987 मध्ये गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. पण स्वतंत्र राज्याचे अधिकारी आणि धनीपणाची जबाबदारी नेत्यांना पेलताच आली नाही. आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात सरकारला अपयश आले. शिवाय दिल्लीहून येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही राज्याबाबत सजग बनविता आले नाही. शास्त्रज्ञांनी इशारा देऊन ठेवलाय, की गेल्या दहा वर्षांत बंगालच्या उपसागराला धडकणाऱ्या वादळांची संख्या आठ टक्क्यांनी घटली आहे, तर अरबी समुद्रातील वादळांमध्ये 52 टक्के वृद्धी झाली आहे.

अशा वादळांमुळेच पूर येतात हे आता सर्वमान्य झाले

वादळांच्या तीव्रतेत 80 टक्के वाढ झाली आहे. यंदा पावसाच्या प्रमाणातही अनेक वर्षांच्या तुलनेत 50 टक्के वाढ झाली आहे. कोकण व गोव्यात तो भयावहरितीने कोसळलाय. आपल्या देशात पावसाचे मोजमाप करणारी यंत्रणा बऱ्यापैकी विकसित झाली असली, तरी तिची पद्धत गुंतागुंतीचीच आहे. अरबी समुद्रात वादळांमुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढते. परिणामी पश्चिम किनारपट्टीवर अतितीव्र पाऊस पडतो. लक्षात घेतले पाहिजे, तौक्ते वादळाचा वेग ताशी 185 कि. मी. होता. अशा वादळांमुळेच पूर येतात हे आता सर्वमान्य झाले आहे.

महापुराचाी गोव्याला जबर तडाखा

हवामान बदलामुळे आता तीन महिने टप्प्याटप्प्याने पडणारा पाऊस एका आठवड्यात पडू शकेल. गोव्यात अवघ्या दोन दिवसांत 300 मि. मी. पाऊस पडला हे एक मोठेच संकट होते. परंतु त्यावर मुकाबला करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांकडे मानसिकता नव्हती आणि यंत्रणेचाही मागमूस नव्हता. शास्त्रज्ञांना, पर्यावरणप्रेमींना जेव्हा गांभीर्याने घेण्याची गरज सरकारला, नेत्यांना वाटत नाही. एवढे ते कोडगे, अकार्यक्षम व बेफिकीर बनले आहे. त्यांचे चुकीचे, भ्रष्ट निर्णय व नियोजनाबद्दलची अनास्था याचा परिणाम राज्यातील लोकांची सुरक्षा व मालमत्तेची नुकसानी यावर होऊ लागला आहे. गुरुवारी पूर आल्यानंतर आपले नेते या भागात धावत गेले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, श्रीपाद नाईक यांना तेथे जावेसे वाटले. पूर, अतिवृष्टी विरोधात लढणारे व्यवस्थापन कौशल्य ते आपल्या सरकारात बाणवण्यात का अयशस्वी झाले? भविष्यात येणारे पूर ते रोखू शकतील काय? दुसरे, ते मदतही वेळेवर पोहोचवू शकले नाहीत. काल मंगळवारी महापुराच्या चौथ्या दिवशी लोक चिखलातच उभे असलेले आम्ही पाहिले.

संकटांच्या मालिका का?

वादळांची कारणे शोधण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. परंतु आपण उत्सर्जीत करीत असलेले विविध वायू, प्रदूषणाचे वाढते प्रमाण, विशिष्ट शेती व जंगले यांचा परिणाम असतोच, शिवाय म्हादई खोऱ्यात कर्नाटकाने केलेली बेछूट जंगलतोड, पाण्याचे प्रवाह बदलण्याचे प्रकार, गोव्यातील अतिरेकी खनिज लूट, नद्यांमध्ये साचत गेलेला गाळ व नदीच्या प्रवाहावर देखरेख न ठेवण्याच्या प्रवृत्तीसह जलवेगाच्या शास्त्राकडे केलेला कानाडोळा हे प्रकार वाढत्या पुरांना आमंत्रण देऊ लागले असून या संकटाच्या मालिका आता गोव्यावर सतत घोंगावणार आहेत.

-राजू नायक

(गोमन्तक संपादक संचालक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT