Crime Dainik Gomantak
गोवा

Flashback 2022 : गोव्‍याच्या कपाळी ड्रग्‍सचा कलंक! कोणत्या गुन्ह्यांमुळे गोवा राहिला चर्चेत?

गोवा हे छोटे राज्य असल्याने गुन्ह्यांची संख्या यंदा इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी असली तरी अलीकडे गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत असले तरी दरदिवशी ड्रग्‍सविक्रेते सापडत आहेत. हणजूण येथील ‘कर्लिस’ बार अॅण्‍ड रेस्‍टॉरंटमध्‍ये अभिनेत्री तथा भाजप नेत्‍या सोनाली फोगाट यांचा मृत्यू ड्रग्‍सच्या अतिसेवनामुळे झाला अन् गोवा पुन्हा जगाच्या नकाशावर चर्चेत आला. ड्रग्समुळे गोव्‍याचे नाव आंतरराष्‍ट्रीय पातळीवर बदनाम होत आहे.

गोवा हे छोटे राज्य असल्याने गुन्ह्यांची संख्या यंदा इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी असली तरी अलीकडे गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने गुन्हेगार येथे आसरा घेतात. पोलिस स्थानकात नोंद होणाऱ्या खून व बलात्कार या गुन्ह्यांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक आरोपी व पीडित हे परप्रांतीय असल्‍याचे आढळून आलेले आहेत.

राज्यात ड्रग्‍सची होणारी कोट्यवधींची उलाढाल हे नेहमीचेच झाले आहे. रेव्ह पार्ट्यांसाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्‍स आणले जाते. मात्र पोलिसांकडून होणारी कारवाई ही फक्त नावापुरती असल्‍याचे संशयितांकडून जप्त केलेल्या ड्रग्‍सच्‍या प्रमाणावरून सिद्ध झाले आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये पोलिसांना गांजाचे प्रमाण अधिक सापडले आहे.

हेरॉईन, कोकेन, एलएसडी तसेच एमडीएमए या प्रकारच्‍या किमती ड्रग्‍सचा साठा मिळविण्यात पोलिसांना अपयशच आलेले आहे. परदेशातून गोव्यासह इतर राज्यांत पाठविण्यात येणारे ड्रग्‍स देशाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतच जप्त करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. हा ड्रग्‍ससाठा गोव्यात येणार होता, ती महिला दक्षिण गोव्यात वास्तव्य करून होती. परंतु हा साठा जप्‍त करून मुंबईतच पुरवठा करणाऱ्याला अटक झाल्याने तो साठा गोव्यात येऊ शकला नव्‍हता.

यावर्षीच्‍या प्रारंभीच जानेवारीमध्ये विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले असतानाच कळंगुट येथे ‘सोझा लोबो’ बार ॲण्‍ड रेस्टॉरंटच्‍या तोडफोडीचे प्रकरण बरेच गाजले. त्‍यामुळे एका पोलिस निरीक्षकाला निलंबनाला सामोरे जावे लागले. तो अजून पुन्हा सेवेत रूजू झालेला नाही.

यावर्षी राज्यात सरकारी तसेच खासगी जमीन हडपप्रकरण, सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण, तूरडाळ व साखर नासाडी प्रकरण, धान्याची चोरी अशी अनेक प्रकरणे गाजली. जमीन हडप प्रकरणांची संख्या तर सध्या दोनशेवर पोहोचली असून गेली अनेक वर्षे बनावट दस्तावेजांद्वारे जमिनींची विक्री केलेले दलाल गजाआड होत आहेत. यामध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांचे असलेले लागेबांधेही उघड झाल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे.

अधिकाऱ्यांपासून राजकारण्‍यांपर्यंत साटेलोटे

गेल्या कित्येक वर्षांपासून बनावट दस्तावेजांद्वारे जमिनींची विक्री करणारी टोळी गोव्यात वावरत होती व त्यासंदर्भातच्या तक्रारी दाखल होऊन त्या तपासाविना पडून होत्या. परदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीने गोव्यातील आपल्‍या जमिनीसंदर्भातची चौकशी केली असता व तक्रार दाखल केल्यावर या टोळीचा पर्दाफाश झाला व सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एसआयटी स्थापन केली. कोविड काळात खरेदी केलेली तूरडाळ विक्रीविना पडून राहिल्याने त्याची नासाडी झाली. काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याने त्याची चौकशी सध्या दक्षता खात्यामार्फत सुरू आहे. या प्रकरणी नागरीपुरवठा खात्याच्या तत्कालीन संचालकांना बळीचा बकरा बनविण्‍यात आला असला तरी त्‍यात अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत मोठा हलगर्जीपणा झाल्‍याचे लपून राहिले नाही.

विद्यार्थिनीवरील बलात्काराने मर्यादा पुन्‍हा उघड

राज्यात बलात्काराच्या घटनांची नोंद पोलिसांत होत असली तरी त्‍यात गुंतलेले आरोपी तथा पीडित हे परप्रांतीय असण्याबरोबरच लांबचे नातेवाईक किंवा शेजारीच असल्‍याचे अनेक प्रकरणांमध्‍ये दिसून आले आहे. ते दोघेही एकमेकांना अधिक ओळखत असतात. वर्ष संपता संपता दोन दिवसांपूर्वीच ईडीसी पाटो-पणजी येथे बसचालकाने महाविद्यालयीन इंजिनीअर विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याने गोव्याच्‍या प्रतिमेला पुन्हा एकदा गालबोट लागले.

अल्पवयीनांचे लैंगिक शोषण याबाबतचे गुन्हेही पोलिसांत दाखल झालेले आहेत. काही बलात्काराची प्रकरणे ही तांत्रिक मुद्यावर असल्‍याची नोंद आहे. त्यामध्ये संशयिताने विवाह करण्याचे वचन देऊन त्यानंतर फारकत घेतल्यावरही पीडित महिलांकडून बलात्काराचा आरोप होऊन गुन्हे नोंद आहेत. खून व बलात्कार प्रकरणांचा तपास 90 टक्क्यांहून अधिक आहे.

घरफोड्या व चोऱ्यांची प्रकरणे वाढली

राज्‍यात घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांत नोंद झालेल्या अर्ध्याहून अधिक प्रकरणांमध्‍ये पुरावे व धागेदोरे सापडत नसल्याने ते पडून आहेत. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे नोकरीसाठी येणारे अनेकजण ड्रग्‍सविक्री व चोऱ्यांमध्ये गुंतत आहेत. दुकानांमध्‍ये चोऱ्यांचे प्रमाण कमी असले तरी बंद घरांचा शोध घेऊन तेथे चोरी करण्‍याचे प्रमाण बरेच वाढले आहे.

चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी शेजारील राज्यांशी गुन्हेगारांची माहिती देवाणघेवाण करण्याकरिता राज्य पोलिसांच्या समन्वयक बैठका घेतल्या. मात्र त्‍यात फारसे यश आलेले नाही. यंदाचे वर्ष तसे पोलिस व सरकारला गुन्हेगारीच्या बाबतीत खडतरच गेले.

बेकायदा वास्‍तव्‍य; 750 विदेशी नागरिक ताब्यात

पर्यटनस्थळ असलेल्या गोव्‍यात विदेशी नागरिक मोठ्या संख्‍येने येतात. एकदा आल्यावर व्हिसा संपल्यावरही ते जाऊ इच्छित नाहीत. इस्रायली व नायजेरियन नागरिक हे ड्रग्‍स व्यवसायात घुसतात व त्यातून ते आपला उदरनिर्वाह सुरू करतात. पोलिसांनी यावर्षी अशा बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या अनेक विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यास सुरवात केल्यावर अनेकांनी गोव्यातून इतर राज्यांत पळ काढला. आतापर्यंत पोलिसांनी 750 विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी मायदेशात केली आहे तर 50 जणांची पाठवणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना मोकळे न सोडता स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात येते.

अल्पवयीन वाहनचालक ठरताहेत डोकेदुखी

राज्यात रस्तेअपघात ही मोठी डोकेदुखी बनली असून दररोज बळी जात आहेत. त्‍यामुळे वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहिमा आखल्या जात आहेत. अल्पवयीन मुले बेकायदा रस्त्यावर वाहने चालवितात, त्यांच्‍याविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. नवीन मोटारवाहन कायद्याची अंमलबजावणी करून दंडात्मक कारवाई करण्यासही सुरवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांना कारवाईचे स्‍वातंत्र्य दिले आहे. अल्पवयीन मुले वाहने घेऊन रस्त्यावर आल्यास पालकांना जबाबदार धरून कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. सरकारने रस्तेअपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी यंदा ठोस पावले उचलली. त्यास काही प्रमाणात यशही आले.

न्‍यायालयाकडून सरकारची अनेकदा कानउघाडणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने विविध प्रकरणांची स्वेच्छा दखल घेऊन सरकारची वेळोवेळी कानउघाडणी केली आहे. राज्यातील बेकायदा चिरेखाणी तसेच पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प, किनारपट्टी परिसरातील बेकायदा बांधकामे यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयात उभे केले आहे. सरकारकडून लोकांना न्याय मिळत नाही म्‍हणून अखेर न्‍यायालयाला दखल घ्‍यावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT