पर्यटनाच्या नावाखाली किनारी भागात कायद्याचा जराही मुलाहिजा न बाळगता चालणाऱ्या बेकायदा पार्ट्या आणि त्यातून उदभवणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची दखल घेत उच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणेचे कान उपटले होते. पण म्हणतात ना, सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही. न्यायालयाच्या कठोर निर्देशांना हरताळ फासत नाताळनंतर पार्ट्या आणि त्यांच्या कर्णकर्कश संगीतामुळे पुन्हा एकदा समुद्र किनारे बधीर झाले आहेत.
पोलिसांचा याला एक तर संपूर्ण पाठिंबा असावा किंवा काणाडोळा तरी केला जात आहे. कोणतीही परवानगी नसताना अमली पदार्थांचाही बेधुंद आणि सर्रास वापर होत आहे. ‘टीम गोमन्तक’ने हणजूण भागात ‘स्टिंग ऑपरेशन’ करत या प्रकरणावर प्रकाशझोत टाकला आहे.
राज्यात सध्या ‘थर्टी फर्स्ट’ची धूम आहे. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत येथे कर्णकर्कश आवाजात संगीत पार्ट्या सुरू असून निर्लज्जपणे उच्च न्यायालयाचे निर्देशांचे उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे, हणजूण-वागातोर येथे पार्ट्या सुरू असलेल्या ठिकाणापासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, तिथे एकही पोलिस तैनात नसल्याची बाब ‘गोमन्तक टीम’ च्या निदर्शनास आली.
पोलिस ‘भूमिगत’
पार्ट्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुधवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एकही पोलिस पार्टी सुरू असलेल्या जागेच्या जवळपास दिसला नाही. पर्यटक रस्त्यावरच राहून धूम्रपान आणि मद्यपान करीत होते.
रातभर चलता है...
‘लेव्हल्स’ क्लबच्या पार्किंगमध्ये उभा असलेला एक आईस्क्रीम विकणारा मुलगा सांगत होता की, येथे रात्रभर धिंगाणा चालतो. धनाढ्य लोक मौजमस्ती करतात. लोक आईस्क्रीम कमी खातात; कारण येथे जास्त दारू पिणारेच असतात. येथे संगीताचा आवाज पहिल्या दिवसापासून तसाच आहे.
10 हजार नव्हे किमान 50 हजार तरी हवेत...
तुम्ही जर मध्यरात्रीच्या पार्टीचे नियोजन करीत असाल तर हणजूण, वागातोर या भागात क्लबच्या प्रवेशिकांचे दर अव्वाचे सव्वा झाले आहेत. कधी तरी एक दोन हजार रुपयांना मिळणारी ‘एन्ट्री’ मंगळवारी 10 हजार रुपयांवर पोहोचली होती. 10 हजार रुपयांमध्ये केवळ प्रवेश, इतर खर्च वेगळा, जो 50 हजारांपर्यंत जातो, असे काऊंटवर सांगितले जात होते. ‘10 हजार है तो क्या हुआ.. पार्टी तो बनती है..’ असे म्हणत एका पंजाबी तरुणाने युवतीच्या गळ्यात हात टाकून तिला आत नेले.
किनाऱ्यांवर रात्रीचा ‘दिवस’
उत्तर गोव्यातील हणजूण, वागातोर या किनाऱ्यांवर सर्वाधिक पार्ट्या सुरू आहेत. येथेच ‘सनबर्न’ हा सर्वांत मोठा पार्टी ‘इव्हेंट’ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मंगळवारी रात्री सायंकाळी 7 ते बुधवारी पहाटे 6 पर्यंत किनारपट्टी भाग गजबजलेला पाहायला मिळाला.
दिल्ली येथील 15 जणांच्या मुला-मुलींच्या गटाने क्लबमध्ये ‘एन्ट्री’ केली. एन्ट्री फिचा अजिबात विचार केला जात नव्हता. यावरून पार्ट्यांमध्ये पैसा ओतणाऱ्यांची संख्या कमी नाही, हे लक्षात येते.
आदेशाला केराची टोपली
रात्री 10 वाजेपर्यंत संगीत वाजविण्यास कायदेशीर परवानगी असली तरी उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे पहाटेपर्यंत संगीत रजनी पार्टी सुरू असल्याचे निदर्शनास आले. ‘गोमन्तक टीम’ ने मंगळवारी पहाटेपर्यंत हणजूण, वागातोर येथील क्लबला भेटी दिल्या.
वाहतूक कोंडी कायमच, पोलिसांचे प्रयत्न निष्फळ
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सोमवारी हणजूण पोलिस कार्यालयात घेतलेल्या एका विशेष बैठकीत सनबर्नमुळे वाहतुकीवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी वाहतूक कक्षासह स्थानिक पोलिस यंत्रणांची मदत घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली दिसून आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.