अग्रलेख: ..दोनापावला, म्हापसा आणि आता बायणा! दरोड्यांच्या मालिकेने 'गोव्याची शांतता' छिन्नविच्छिन्न केली आहे

Goa Crime: जबाबदारीची वेळ यंत्रणेची आहे; मात्र जाग येण्याची वेळ नागरिकांची! सरकारने सुरक्षेची खात्री दिली नाही तर लोकांनी आवाज उठवला पाहिजे. लोकशक्ती जागी झाली तरच पोलिसांना आकड्यांपेक्षा वास्तव बदलायची गरज भासेल!
Theft News
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

शांततेसाठी गोवा ओळखला जायचा. दरोड्यांच्या मालिकेने ही शांतता छिन्नविच्छिन्न केली आहे. दोनापावला, म्हापसा आणि आता बायणा... ठिकाणे बदलली, सुरक्षेवर दरोडे सुरूच आहेत. गुन्हेगारांचा आत्मविश्वास ज्या वेगाने वाढत आहे, तितक्याच वेगाने पोलिसांचा धाक ओसरतोय.

गुन्हे कमी; चर्चा अधिक, अशी पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची सांख्यिकीची मखलाशी वास्तव झाकण्यासाठी उपयुक्त ठरेल; पण लोकांच्या घरांवर सावल्या फिरू लागल्यावर सुटलेली कायदा-सुव्यवस्थेची ‘दोरी’ आणि पोलिसांची (अ)कार्यक्षमता गुन्हेगारीचे भयाण वास्तव अधोरेखित करते.

सध्या गोमंतकीयांची झोप उडवणारा एकच प्रश्‍‍न आहे, राज्य सुरक्षित आहे, हे आम्हाला कोण दाखवून देणार? चोर, दरोडेखोरांनी रात्रीचा हक्कच जाहीर केला आहे. पोलिस बघ्याच्या भूमिकेत आहेत.

राज्यातील सुरक्षिततेवर इतके ठळक प्रश्‍‍नचिन्‍ह कधीच उमटले नव्हते. रात्रीचे दिवे पेटले की गोवा शांततेत झोपतो अशी सामान्य समजूत; परंतु त्या रात्रीच्या शांततेला चोरट्यांच्या पावलांनी फटी पडू लागल्या आहेत. दोनापावलापासून बायणापर्यंत दरोड्यांच्या शृंखलेमुळे लोकांच्या मनात एकच धसका निर्माण झालाय... रात्रीवर ताबा कुणाचा? नागरिकांचा की दरोडेखोरांचा?

बायणा येथे ‘चामुंडी आर्केड’ नामक इमारतीत सहाव्या मजल्यावर पडलेल्या दरोड्याने अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत.

नशीब बलवत्तर म्हणून तेथे जीवितहानी टळली. दोनापावला व म्हापशातील दरोड्यात पीडित कुटुंबीयांनी फारसा प्रतिकार न केल्याने अथवा तशी संधी न मिळाल्याने त्यांना मारहाण टळली होती. बायणातील सागर नायक व कुटुंबीयांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना सळीने बेदम मारहाण झाली.

कथित प्रसंग अंगावर काटा आणणारा आणि संतापाचा उद्रेक करणारा आहे. ‘चामुंडी आर्केड’मध्ये सात ते आठ दरोडेखोर इमारतीच्या मागील बाजूने आत आले, प्रवेशद्वारासमोरील सीसीटीव्ही चुकविण्याचा त्यांचा प्रयत्न होता; अर्थात ते लिफ्टमध्ये दिसून आलेच.

सुरक्षा रक्षक व्यवस्था तेथे नव्हती ही बाब त्यांच्या पथ्थ्यावर पडलीच. पुढे खिडकीचा गज काढून सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसण्याची त्यांची तयारी हेच दर्शवून जाते की त्यांनी सूत्रबद्ध रेकी केली होती; अन्यथा धाडसी आगळीक होईलच कशी?

तीनही दरोड्यांत संशयित हे उत्तर भारतातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बोलण्यात, हिंदी उच्चारांत एकसमानता आढळते. याचाच अर्थ - अशा एकाहून अधिक टोळ्या गोव्यात कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि स्थानिक पातळीवर परप्रांतीयांकडून याकामी त्यांना साथ मिळत असावी.

त्याशिवाय परक्या जागी दरोडे यशस्वी होणे निव्वळ अशक्य आहे. दोनापावलातील दरोड्याला सात महिने उलटले, म्हापशातील प्रकरणाला चाळीस दिवस. परंतु तपासात फारसे हाती काही लागलेले नाही. ‘बायणा प्रकरणी छडा लावूनच दाखवू’, असे पोलिस म्हणताहेत.

त्यात अपयश आल्यास गृह खात्याचा उपयोग तो काय? रेकॉर्डवर दाखवण्यासाठी कुणी येरेगबाळे नाही तर खरे संशयित हाती असल्यास स्थानिक पातळीवर ‘ते’ कशी माहिती जमवत आले, याचा उलगडा करणे शक्य बनेल. बायणातील घटनेसोबत सांताक्रूझमध्येही झालेली जबरी चोरी चिंता वाढवणारी आहे. पोलिसांची कार्यक्षमता कधीच लयास गेली आहे.

तसे कोरडे ओढताना कुणाला आनंद होत नाही; परंतु परिस्थिती कधी बदलणार? रस्त्यांनजीक बेकायदा फळ विक्री करणारे; भंगारअड्यांवर नोंदणीशिवाय राहणारे; ‘एसी’ दुरुस्ती करणारे; स्वीगी, झोमेटॉ डिलिव्हरी बॉय, झोपडपट्ट्यांत वास्तव्य करणाऱ्यांना दुर्लक्षून चालणार नाही.

अशा घटकांकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोरपणे व शंकेखोर नजरेने पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही. लोकांनीही आपल्या आजूबाजूला कोण राहतो, कुणाचा वावर असतो ह्याचा साकल्याने विचार करण्याची वेळ आली आहे. बायणातील दरोडा हा पोलिसांना कळताच नाकाबंदी झाली का, हा प्रश्‍न पुन्हा उपस्थित करावा लागेल.

Theft News
Baina Theft: मध्यरात्री 7 दरोडेखोर घुसले, कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; कपाट फोडून रोकड-दागिने लंपास; वाचा घटनाक्रम..

गस्तीत आपण कुठे कमी पडतो, यावर चिंतन कधी होणार? फुकाच्या मुलाखती देण्यापेक्षा महासंचालकांनी सिंहावलोकन करावे. ‘इफ्फी’ची रंगीत तालीम होत असताना पणजीत पावला पावलावर वाहतूक पोलिस जत्थ्याने उभे होते. काम काय करावे हा त्यांच्यासमोर प्रश्‍न होता. असे व्यवस्थापन काय कामाचे?

पोलिसांना आपले सत्त्व गुन्हेगारांना अद्दल घडवून दाखवावे लागेल. अन्यथा बायणानंतर नवे ठिकाण लक्ष्य होईल. पोलिसांची धमक क्षीण झाली की गुन्हेगारांची हिंमत दुणावते. गोव्यात हेच उघडपणे दिसत आहे.

Theft News
Dona Paula Theft: दरोडेखोरांसमोर पणजी पोलिस हतबल! चोर बांगलादेशी की आणखी कोण? आठवडा उलटला तरी सुगावा नाही

सलग दरोड्यांच्या घटना पोलिसांना आव्हान देणाऱ्या आहेत. सरकारी आश्वासनांपेक्षा भेदरलेल्या लोकांची सत्य स्थिती शोचनीय आहे. जबाबदारीची वेळ यंत्रणेची आहे; मात्र जाग येण्याची वेळ नागरिकांची! सरकारने सुरक्षेची खात्री दिली नाही तर लोकांनी आवाज उठवला पाहिजे. लोकशक्ती जागी झाली तरच पोलिसांना आकड्यांपेक्षा वास्तव बदलायची गरज भासेल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com