काणकोण: मालपे - कर्नाटकातील (Karnataka) मासेमारी ट्रॉलरना (trawler) काणकोणमधील (CANACONA) मच्छीमारांनी (fisherman) काल हाकलून लावले. त्याचबरोबर त्याची जाळी ताब्यात घेतली. मात्र, या कारवाईत त्या ट्रॉलरवरील मच्छिमारांनी काणकोणमधील पाती घेऊन गेलेल्या मच्छिमारावर लोखंडी गोळ्यांचा मारा केला.
गेले अनेक दिवस हे ट्रॉलर निर्धारित बारा नॉटिकल मैलाची हद्द ओलांडून गोव्याच्या समुद्री हद्दीत घुसून मासेमारी करतात. काही वेळा पाच किलोमीटरपेक्षा कमी हद्दीत मासेमारी ते करतात. आज कारवाई केली त्यावेळी तेरा ट्रॉलर पाच नॉटिकल मैलापेक्षा कमी अंतरावर घुसून मासेमारी करत होते, तर आजुबाजुला सुमारे शंभर ट्रॉलर मासेमारी करत होते. ते जास्त क्षमतेचे ट्रॉलर असल्याने त्याची मासेमारी करण्याची क्षमता जास्त असते. यासंदर्भात मत्स्योद्योग खात्याकडे तक्रार केली. तळपण येथील तटरक्षक दलाकडे असलेल्या बोटी तळपण जेटीवर काढून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तटरक्षक दलाचे पोलिस व काणकोण पोलिस ठाण्याच्या पोलिसांना बरोबर घेऊन ही कारवाई करण्यात आली असल्याचे मत्स्य व्यावसायिक व पैंगीणचे पंच रूद्रेश नमशीकर यांनी सांगितले.
काणकोणचे ट्रॉलर त्यांचा पाठलाग करीत असल्याचे दिसताच काही ट्रॉलर्सनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली जाळी सोडून पोबारा केला. आता यापुढे मच्छिमारांना मत्स्योद्योग खात्याने संरक्षण देण्याची गरज क्षत्रिय पागी समाजाचै अध्यक्ष अशोक धुरी त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, दिवाकर पागी व अन्य मत्स्य व्यावसायिकांनी केली आहे.
तटरक्षक दलाकडे अपुरी सामुग्री
तटरक्षक दलाची बोट तळपण जेटीवर नादुरुस्त अवस्थेत आहे. या तटरक्षक दलाच्या तळपण पोलिस स्टेशनकडे पोळे ते बेतूलपर्यंतच्या समुद्री टापूचे टेहळणी करण्याचे कार्यक्षेत्र आहे. अपुऱ्या सामुग्रीमुळे ते हतबल आहेत. सध्या मच्छीमारांनाच स्वरक्षण करावे लागते हे आजच्या घटनेने पुढे आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.