Fire In Goa कुंकळ्ळी मतदारसंघातील पारोडा डोंगरावर आणि काणकोण येथील चापोली धरण परिसरात लागलेल्या भीषण आगीत ‘फायर माफिया’ पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात सरकारी यंत्रणा हतबल आहे.
गोव्याचे हरित क्षेत्र नष्ट करणाऱ्या या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी मी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमण्याची मागणी करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
गोव्यात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडून त्यात राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये झाडे, वनस्पती आणि भातशेती नष्ट झाली.
परंतु, पर्यावरण संवेदनशील आणि वनक्षेत्रात अशा आगी रोखण्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत, असे युरी आलेमाव यांनी निदर्शनास आणले.
मी गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता आणि गोव्यात कार्यरत असलेले ‘फायर माफिया’ हरित क्षेत्रांचे काँक्रिटच्या जंगलात रूपांतर करतील, असा इशारा सरकारला दिला होता.
गोव्यातील आगीच्या घटनांची चौकशी करण्यासाठी मी वनमंत्री विश्वजीत राणे यांना उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याची विनंती केली होती, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष कमकुवत
मी रात्री उशिरापर्यंत पारोडा येथे आग लागलेल्या ठिकाणी होतो आणि वन अधिकारी तसेच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात होतो.
गोव्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षच कमकुवत असल्याने वनअधिकारी तसेच जिल्हाधिकारी हतबल होण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोमंतकीयांनी जागृत राहावे
रिअल इस्टेटच्या व्यवसायासाठी गोव्यातील जमिनींवर डोळा ठेवून हिरवे आच्छादन नष्ट करण्याची पद्धतशीर योजना आखली जात आहे.
गोमंतकीयांनी आताच जागृत राहण्याची गरज आहे. गोव्याचे कॉंक्रिट जंगलात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.
विधानसभेतील तारांकित प्रश्नांच्या उत्तरांचा अभ्यास केल्यास पर्यावरण संवेदनशील भागात आगीच्या घटना हाताळण्यासाठी तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे कसलीच यंत्रणा व तयारी नाही, हे स्पष्ट होते. वनमंत्री व भाजप सरकार कोणतीही कृतियोजना नसताना केवळ आश्वासने देत आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.