सासष्टी, भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने गोव्यात राज्यकारभार हाताळत आहे ते पाहता गोव्याचे अस्तित्व धोक्यात आहे.
तेव्हा यावेळी गोव्याच्या व देशाच्या हितासाठी इंडिया युतीच्या काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभेत पाठविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मडगावात केले.
शुक्रवार, १२ रोजी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांच्यासमवेत नावेली, मडगाव, फातोर्डा, कुडतरी व बाणावलीत जाऊन कॉंग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॅ. विरियातो यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर कडाडून टीका केली.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या खासगीकरणाला कॉंग्रेस पक्षाचा विरोध असेल. या इस्पितळात अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने २०२३ साली ४,५०० रुग्णांना बांबोळी इस्पितळात दाखल करावे लागले. जवळजवळ २०० पेक्षा जास्त पदे व वेगवेळ्या क्षेत्रातील २८ डॉक्टरांची पदे येथे रिक्त असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
‘इंडिया’ युतीतील सर्व पक्षांना व घटकांना मान्य असा उमेदवार कॉंग्रेसने कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्या रूपाने दिल्याचे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले.
गिरीश चोडणकर व विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन हेसुद्धा पक्षासोबत असल्याची ग्वाही डिकॉस्ता यांनी दिली. कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी २७ वर्षे देशसेवा केली आहे तर विरोधी उमेदवारांनी देशासाठी वा राज्यासाठी काय केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे, असेही डिकॉस्ता यांनी सांगितले.
यावेळी सायलंट मतदार भाजपचे स्वप्न भंग करणार असल्याचे भाकित विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
निवडणूक ठरेल दुसरा ओपिनियन पोल
आगामी लोकसभा निवडणूक ही गोव्यासाठी दुसरा ओपिनियन पोल असून सर्व कॉंग्रेसजनांनी तसेच इंडिया युतीच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी लोकांना हे पटवून देणे गरजेचे आहे. भाजपचे केंद्र सरकार देशाची घटनाच दाबून टाकण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप विरियातो यांनी केला.
काँग्रेस पक्ष पक्षांतर कायद्यामध्ये बदल करणार आहे व तसे पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे. पक्षांतर केलेल्या लोकप्रतिनिधीला राजीनामा देऊन परत निवडून दाखवावे लागेल, असा बदल केला जाईल. भारतीय जनता पक्ष विरोधी लोकप्रतिनिधींना भीती दाखवून, धमक्या देऊन पक्षांतराला खतपाणी घालत आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
काँग्रेसने गोव्यासाठी काहीच केले नाही, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे; पण माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांनी प्रकाशन केले ते पुस्तक त्यांनी वाचावे. राणे यांनी गोव्यासाठी काय केले ते त्यात नमूद आहे. तसेच राणे हे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते.
- एल्टन डिकॉस्ता, आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.