सासष्टी तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या साळ नदीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चालले आहे. तालुक्यातील गावांमधील नागरिकांकडून नदीत सांडपाणी सोडण्यात येत आहे हे खरे असले तरी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतेय ते मासेमारी ट्रॉलर्सकडून. या ट्रॉलर्समधील सांडपाणी व इंजीन ऑईल नदीत सोडले जात आहे. त्यामुळे सरकारने ट्रॉलरमालकांना सक्त ताकीद दिली पाहिजे, असे मत युवा पर्यावरणतज्ज्ञ सॅम्युअल आफोन्सो यांनी व्यक्त केले आहे.
संपूर्ण साळ नदीत सांडपाणी सोडण्याची 35 ठिकाणे आहेत असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. जागतिक पर्यावरणदिनी समाजसेवक व पर्यावरणमित्र स्व. सिद्धार्थ कारापूरकर यांच्या मित्रपरिवाराने साळ नदीच्या काठावर रोपे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी या लोकांनी सांगितले की, साळ नदी लोप पावण्याच्या अवस्थेकडे झुकत चालली आहे. त्याची वेळीच दखल घेऊन उपाययोजना आखली नाही तरी साळ नदीचे अस्तित्व कायमचे नाहीसे होण्यास वेळ लागणार नाही.
ट्रॉलर्ससाठी मार्गदर्शक तत्वे लागू करा
जे ट्रॉलर्स साळ नदीतून मच्छीमारीसाठी जातात, त्यांच्यासाठी सरकारने काहीतरी मार्गदर्शक तत्वे लागू केली पाहिजेत, असे स्थानिक मच्छीमार रेमेडिअस क्रास्तो यांनी सांगितले. तर, साळ नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलणे गरजेचे असल्याचे काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.