Education Secretary Prasad Lolayekar said that the new education policy will be fully implemented in Goa by 2027 28 Dainik Gomantak
गोवा

New Education Policy In Goa: गोव्यात चार वर्षात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; यंदा नववीपासून तर पुढील वर्षी...

Education Secretary Prasad Lolayekar: यंदा इयत्ता नववीच्या वर्गापासून नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि त्यानुसार विषय लागू केले जातील.

गोमन्तक डिजिटल टीम

New Education Policy In Goa: यंदा इयत्ता नववीच्या वर्गापासून नवे शैक्षणिक धोरण (एनईपी) आणि त्यानुसार विषय लागू केले जातील. पुढील शैक्षणिक वर्षात तिसरी व सहावीसाठी हे धोरण लागू केले जाईल. गेल्या वर्षी फाऊंडेशन -१ या स्तरावर ते लागू केले होते. असेच एकेक वर्ष पुढे सरकत २०२७-२८ पर्यंत नवे शैक्षणिक धोरण पूर्णपणे लागू करण्‍यात येणार आहे, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्र या विषयांची परीक्षा गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सत्र परीक्षा या पद्धतीने घेईल. यंदा नववीला गुणांऐवजी क्रेडिट रेटिंग सिस्टम लागू केली जात आहे. २०२८-२९ शैक्षणिक वर्षापासून या धोरणासाठी आवश्यक असलेला पायाभूत सुविधांचा आकृतिबंध निर्माण करण्याकडे सरकार लक्ष देणार आहे. कारण नव्या शैक्षणिक धोरणात नववी ते बारावी हा एक घटक मानला गेला आहे, असे लोलयेकर म्‍हणाले.

काही शाळांमध्‍ये दहावीपर्यंतचे वर्ग आहेत, तर काही उच्च माध्यमिक विद्यालयांना हायस्कूल्‍स जोडलेली नाहीत. पाचवीचा वर्ग हा प्राथमिक विद्यालयाला जोडलेला हवा. सध्या तो हायस्कूलला जोडलेला आहे. हे सारे पायाभूत सुविधांतील बदल २०२८-२९ या वर्षात हाती घेतले जातील, असेही लोलयेकर यांनी सांगितले. शाळांचा दर्जा वाढवावा, शिक्षकांचा कौशल्य विकास व्हावा यासाठी हे नवे शैक्षणिक धोरण आहे. ग्रामीण भागातही शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयारी करण्याकरिता हे धोरण योग्य ठरणार आहे, असेही ते म्‍हणाले.

नवे शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर १ ऑगस्टपर्यंत सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. दोन महिन्यांनंतर पुन्हा मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाईल आणि त्रुटी दूर केल्या जातील. मुख्याध्यापकांशी सातत्याने संवाद साधून नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत पुढे काय-काय करणे अपेक्षित आहे याची माहिती त्यांना वेळोवेळी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे लोलयेकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला शैलेंद्र झिंगडे, भगीरथ शेट्ये व एससीईआरटी संचालक मेघना शेटगावकर यांचीही उपस्‍थिती होती.

कौशल्याधारित अभ्यासक्रम

नववीसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम असतील. यात कृत्रिम प्रज्ञा, कोडिंग, रोबोटिक्स अशा विषयांचा समावेश असेल. १६ विद्यार्थ्यांनी मागणी केली तर एखाद्या विशिष्ट विषयाचा विचारही या विभागात करता येणार आहे. मात्र यासाठी शिक्षकाची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा असेल.

शारीरिक शिक्षणासाठी ६० शैक्षणिक तास

शारीरिक शिक्षणासाठी दोन क्रेडिट असून यासाठी ६० शैक्षणिक तास ठेवण्यात आले आहेत. कलाशिक्षणाअंतर्गत फाईन आर्ट, संगीत, थिएटर आर्ट, भरतनाट्यम, कथ्थक, तबला, हार्मोनियम, गायन असे पर्याय असतील.

पाच विषयांची प्रश्‍‍नपत्रिका मंडळ तयार करणार

भाषा, विज्ञान, समाजशास्र, गणित, स्पर्धात्मक विचार या पाच विषयांची प्रश्नपत्रिका गोवा शिक्षण मंडळ तयार करून शाळांना पाठवणार आहे. या विषयाची परीक्षा विद्यालय घेऊन त्यांचे क्रेडिट संकेतस्थळावर अपलोड केले जातील. इतर विषयांच्या परीक्षा मात्र विद्यालय पातळीवरच सत्र परीक्षा पद्धतीने घेण्यात येतील. मंडळाची ५० टक्के प्रश्नपत्रिका ही ‘योग्य पर्याय निवडा’ या प्रकारातील असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केला जाणार नाही.

शिक्षकांना बंगळूरला प्रशिक्षण

बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला असून गणित व विज्ञान शिक्षकांना तेथे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. या विषयासाठी दीडशे शैक्षणिक तास आहेत तर पाच क्रेडिट या विषयाला असतील. विज्ञान या विषयासाठीही १५० शैक्षणिक तास आहेत व त्यालाही पाच क्रेडिट आहेत. समाजशास्र विषयासाठी दीडशे शैक्षणिक तास नव्या धोरणात ठेवण्यात आले आहेत.

शंकांचे केले जाईल निरसन

नववीत लागू करण्यात येणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाविषयी सर्व माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना सादरीकरणाच्या स्वरूपात पाठवली जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांच्या दोन वेळा बैठका घेऊन त्यांच्‍या शंकांचे निरसन केले आहे. ते सादरीकरण त्यांनी पालकांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे. तरीही मुख्याध्यापकांच्या पातळीवर त्या शंकांचे निरसन करता येणे शक्य न झाल्यास शैक्षणिक पथकाच्या दौऱ्यावेळी ते पथकाची भेट घेऊ शकतील.

६ वर्षे पूर्ण झाल्‍यावरच पहिलीत प्रवेश

पहिलीच्या वर्गात सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना प्रवेश मिळेल. सध्या बालवर्ग १ व २ मध्ये शिकणाऱ्यांना वयात सवलत देण्यात येईल. २०२६ शैक्षणिक वर्षापासून ही सवलत मागे घेण्यात येईल.

१ विदेशी, २ देशी भाषांचा पर्याय

सध्या प्रथम भाषा, द्वितीय भाषा व तृतीय भाषा अशी पद्धत आहे. ती यंदा नववीसाठी रद्द करण्यात आली आहे. एक विदेशी भाषा व दोन देशी भाषा विद्यार्थ्याला निवडता येतील. मात्र सर्व भाषा समान असतील. इंग्रजी, मराठी, कोकणी, पोर्तुगीज, फ्रेंच, अरेबिक हे विषय विद्यार्थी निवडतील असा अंदाज आहे. १५ विद्यार्थ्यांच्या समूहाने एखाद्या भाषेची मागणी केली तर तो विषय तेथे उपलब्ध करण्यावर विचार करता येईल. अर्थात शिक्षकाची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा असेल. भाषा या विषयासाठी १२० शैक्षणिक तास दिले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT