Goa Electricity Department : मोठ्या प्रमाणावर होत असलेली वीज गळती आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा बेसुमार खर्च यामुळेच वीज खात्याच्या महसुलाचा ताळेबंद बसत नाही. त्यामुळेच वीज खात्याचा तोटा वाढते असे मत निवृत अभियंत्यांनी व्यक्त केले.
वीजखात्याने नियामक प्राधिकरणाला 6 टक्क्यांची दरवाढ सुचविली आहे. ही दरवाढ संमत झाल्यास सामान्य वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणार हे निश्चित. आज जर कुणाला सरासरी १००० रूपये बिल येत असेल तर वाढीव दरांमुळे हे प्रमाण किमान दीड हजारांवर पोहोचणार आहे.
वीज खात्याची ‘आमदनी आणि खर्च’ यांच्यात ताळमेळ का बसत नाही, असे विचारले असता एका निवृत्त अभियंत्याने सांगितले, की मोठ्या प्रमाणावर होणारी वीज गळती हे त्याचे मुख्य कारण आहे. वीज खात्याच्या आकडेवारी प्रमाणे वीज गळती 8.5 टक्के अशी दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ती 16 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अजूनही वीज खाते वीज चोरीवर नियंत्रण आणू शकलेले नाही.
मोठ्या प्रमाणावर असलेले कर्मचारी याचाही खात्यावर आर्थिक बोजा बराच वाढत आहे. लहानशा गोव्यात या वीज खात्याकडे 6000 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. आणि प्रत्येक नवीन मंत्री त्यात अधिक भर घालत आहे. अशा स्थितीत वीज खात्याला कर्मचाऱ्यांचा ताफा सांभाळणे गरजेचे आहे का, असा सवालही एकाने केला.
दोन वर्षापूर्वी वीज खात्याने डिजिटल मीटर खरेदी केले होते. आता नवीन मंत्री स्मार्ट मीटर आणू पहात आहेत. हे स्मार्ट मीटर आणले तर आधीचा डिजिटल मीटरचा खर्च व्यर्थ ठरेल, असे अभियंत्यांनी सांगितले.
हे तर जखमेवर मीठ !
६ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव म्हणजे कोविड महामारीच्या नंतर आर्थिक बोजाखाली आलेल्या व आता कुठे सावरणाऱ्या गोमंतकीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. काल जनसुनावणीस उपस्थित राहून मी शपथविधी सोहळ्यावर मिनिटाला 33.33 लाख या हिशेबाने 6 कोटी रु. खर्च करणाऱ्या भाजप सरकारने जनतेवर हा भार टाकू नये, अशी मागणी केली आहे.
-युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
उद्योगांना अखंडित वीज द्या !
वीज खात्याने वीज बिलात ६ टक्के वाढ केली तर उद्योगांवर त्याचा थोडाफार परीणाम होणार हे जरी निश्चित असले तरी आम्ही तो भार सोसायला तयार आहेत. आमची वीज खात्याकडे एवढीच मागणी आहे, की आम्हाला अखंड आणि पुरेसा वीज पुरवठा करा. खंडित वीज पुरवठ्यामुळेच उद्योगांचे अधिक नुकसान होत असते.
- दामोदर कोचकर, अध्यक्ष गोवा उद्योजक संघटना
वीज खात्याचे नुकसान का वाढते याचा बारकाईने आढावा घेण्याची गरज आहे. वीज गळती कुठे होते आणि ती कशी थांबवावी, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे का, हेही पाहणे गरजेचे आहे. - पीटर फर्नांडिस, निवृत कार्यकारी वीज अभियंते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.