Goa Monsoon Update: दक्षिण प्रशांत महासागराचे वाढणारे तापमान अल निनोला जन्माला घालते आणि तीच स्थिती भारतीय उपखंडातील मॉन्सूनसाठी घातक बनते. सध्या ही स्थिती निर्माण झाल्याने मॉन्सून विस्कळीत झाला आहे.
मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे मॉन्सूनसाठी पूरक ठरतील, असा विश्वास ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. रमेश कुमार म्हणाले की, हवामान खात्याने जाहीर केलेली मॉन्सूनची प्रक्रिया ही तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. मात्र, गेल्या १० जूनपासून देशातला मॉन्सून वाटचाल करू शकलेला नाही. याला अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ कारणीभूत आहे.
शिवाय यंदाचा मॉन्सून उशिरा येण्याला अल निनो कारणीभूत ठरला आहे. सर्वसाधारणपणे एक जूनला केरळमध्ये दाखल होणारा मॉन्सून यंदा आठ जूनला आला. या उशिरा येणाऱ्या मॉन्सूनसाठी प्रशांत महासागर आणि विषुववृत्तीय पट्ट्यात तापमानात झालेली वाढ कारणीभूत आहे. सामान्यत: अल निनो स्थिती डिसेंबरमध्ये उच्च पातळीवर असते.
पण यावेळी जुलै, ऑगस्टमध्ये ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातल्या पावसावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे मॉन्सूनला मध्य आणि उत्तर भारतात सक्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
ही स्थिती अस्तित्वात आल्यास अल निनोवर हे कमी दाबाचे पट्टे मात करतील, असे म्हणता येईल. अशी स्थिती २०१९ साली निर्माण झाली होती.
अल निनो सक्रिय असताना बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याने मॉन्सून सक्रिय ठेवला आणि त्यावर्षी भारतीय उपखंडात चांगला पाऊस झाला.
ऊन-पावसाचा खेळ कायम
राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असला, तरी दक्षिण अरबी समुद्रातील मॉन्सूनचे वारे कमजोर बनले आहे. शिवाय समुद्रावरून येणार आर्द्रताही कमी झाली आहे.
यामुळे पुढील काही दिवस ऊन आणि तुरळक पावसाचा खेळ चालेल. मात्र, राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी आणखी आठवडाभराची वाट पाहावी लागेल, असे डॉ. कुमार म्हणाले.
राज्यात हलक्या सरी
गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४.६ मि.मी. पाऊस पडला. पणजी येथे सर्वाधिक पाऊस झाला. त्याखालोखाल म्हापसा, मडगाव, फोंडा, साखळी, सांगे आदी भागांत पाऊस पडला. येत्या २४ तासांत राज्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
त्यासोबतच ४५ ते ६५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आज, गुरुवारी पणजी येथे कमाल ३४ तर किमान २६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
मॉन्सून वाटचालीस पोषक वातावरण
अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला होता. रविवारी (ता. ११) रत्नागिरीपर्यंत पोहोचल्यानंतर नैऋत्य मोसमी मॉन्सूनची प्रगती मंदावली होती; परंतु आता मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण तयार होत असल्याने पाऊस पूर्ववत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागांत १८ ते २१ जूनदरम्यान मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.