बीच पार्टी, डिजे, बियर आणि गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात बिंधास्त फेरफटका मारण्यासाठी व निवांत वेळ घालवण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्यात येत असतात. गोव्यातून विविध मजेशीर अनुभव घेऊन पर्यटक आपपल्या गावी परतत असतात.
पण, बऱ्याचवेळा काही विचित्र अनुभवांचा सामना देखील पर्यटकांना करावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीच्या पर्यटकासोबत घडला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बेदर्दी राजा नावाने अकाऊंट चालविणाऱ्या एका युजरने त्याच्यासोबत गोव्यात घडलेल्या अनुभव शेअर केला आहे.
दिल्लीतील हा पर्यटक गोव्यात असताना सुमारे दीड लाख रुपयांच्या आसपास किमतीचा त्याचा आयफोन चोरीला गेला. 36 तासानंतर त्याचा आयफोन सुमारे साठ किलोमीटर लांब एका भाजीपाव दुकान मालकाकडे सापडला.
पण, सर्व प्रकारामागे विचित्र आणि धक्कादायक घटनाक्रम उघडकीस आल्याचे या युजरने सांगितले आहे.
दारुच्या नशेत असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने दिल्लीच्या या पर्यटकाचा आयफोन चोरी केला. काहीकाळानंतर या व्यक्तीला भूक लागल्याने त्याने एका गाड्यावर जात भाजीपाववर ताव मारला.
पैसे द्यायला नसल्याने त्याने चोरी केलेला लाखोंचा आयफोन भाजीपाव गाडे धारकाला दिला. भाजीपाव गाडे मालकाने देखील बिलाच्या बदल्यात आयफोन स्वीकारला.
गाडे धारकाने आयफोन चार्च केल्यानंतर त्यावर आलेला फोन कॉल स्वीकारला. फोनवर संभाषण झाल्यानंतर गाडे धारक आयफोन चोरी झालेल्या ठिकाणापसून 60 किलोमीटर लांब असल्याचे समोर आले.
पर्यटकाने आयफोन असलेल्या ठिकाणाची माहिती घेतली आणि तेथे धाव घेतली. भाजीपाव विक्री करणाऱ्याने कोणतीही तक्रार न करता तात्काळ आयफोन परत केला, अशी माहिती पर्यटकाने दिली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, हफ्ते भरुन आयफोन खरेदी करणारा वर्ग एकीकडे आहे तर, शंभर रुपयांच्या भाजीपावसाठी चोरीचा का असेना पण, आयफोन देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणावं असाही एक सुर सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.