Drugs Worth 25 Lakhs Seized at Anjuna: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) राज्यात अमली पदार्थ विक्री आणि त्यात गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांविरुद्ध धडक मोहीमच राबवली आहे.
हणजूण येथे गुप्तपणे कार्यरत असलेल्या एलएसडी ड्रग्सच्या उत्पादन प्रयोगशाळेचा एनसीबीने पर्दाफाश केला आहे.
या छाप्यावेळी विविध प्रकारचे ड्रग्स जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 25.17 लाख रुपये आहे. यामधील मास्टरमाईंड पश्चिम बंगालचा रहिवासी ए. कुंडू याला अटक केली आहे.
या छाप्यात एनसीबीने 32 हजार रुपये रोकड, 18 यूएसडी चलन तसेच 38,210 रुपये इतकी श्रीलंकन चलनातील रोकड जप्त केली. गोव्यात विक्री होणाऱ्या या ड्रग्स माफियांचे जाळे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे.
एनसीबीने मांद्रे येथून अटक केलेल्या श्वेतलाना व आंद्रे हे रशियातील ड्रग्स जगताशी संबंधित आहेत. गोव्यात ड्रग्स व्यवहाराचे जाळे विस्तारल्याने तसेच त्याला मोठी मागणी असल्याने हे दोघे गोव्यात येऊन स्थानिकांच्या मदतीने ड्रग्स व्यवसाय चालवत होते.
सरकारचा दावा फोल
राज्य सरकारने सारवासारव करताना, गेली अनेक वर्षे गोवा हे ड्रग्सनिर्मिती केंद्र नसून देशाच्या इतर भागांतून व परदेशातून ड्रग्स गोव्यात विविध मार्गाने पोहोचते.
मग त्याची विक्री केली जात असल्याचे सांगितले होते. मात्र, या विक्रीमध्ये गोव्यातील अनेकजण ड्रग्स विक्रेते आहेत. त्यामुळे सरकारचा दावा फोल ठरला आहे.
वागातोर येथे दीड लाखाचा गांजा जप्त; मुंबईसह कर्नाटकच्या तरुणांना अटक
वागातोर येथील शापोरा फुटबॉल मैदानाजवळ सोमवारी मध्यरात्री गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने दोघा तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दीड किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक केलेल्या विक्रम उमेश उप्पर (21) आणि साहील अनिल उज्जनिया (26) या दोघांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. हणजूण परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्री ड्रग्स दलाल पर्यटकांना लक्ष्य बनवत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.
त्याच्या आधारे सोमवारी रात्री या परिसरात साध्या वेशातील पोलिस तैनात केले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोघे तरुण शापोरा फुटबॉल मैदानाजवळ बराच वेळ उभे होते. ते ग्राहकाच्या शोधात होते. त्यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले होते.
मात्र, ग्राहक मिळत नसल्याने ते पर्यटकांना गाठत होते. पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीची झडती घेतली असता गांजासदृश पदार्थ आढळला. त्या पदार्थाची तपासणी केली असता, तो गांजा असल्याचे उघड झाले. ड्रग्स बाळगल्याप्रकरणी त्यांना अटक केली आहे.
गोव्यात मिळतो गांजा
संशयित विक्रम उप्पर हा मूळचा दांडेली (कर्नाटक) येथील तर साहील उज्जनिया हा मूळचा माटुंगा (मुंबई) येथील आहे. त्यांनी हा गांजा गोव्यातीलच ड्रग्स माफियाकडून विकत घेऊन त्याची विक्री केल्याचे पोलिस तपासात सांगितले. त्यामुळे गोव्यात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.