पणजी: दोनापावल येथील नागाळी हिल्स परिसरात गजबजलेल्या उच्चभ्रू वस्तीत एका उद्योजकाच्या बंगल्यावर बुरखाधारी दरोडेखोरांनी घातलेल्या दरोड्याला आठवडा उलटला तरी अजूनही पोलिसांना धागेदोरे सापडलेले नाहीत.
हे दरोडेखोर बांगलादेशी टोळीतील असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे, मात्र हाती यश मिळवू शकले नाहीत. या दरोड्यामुळे दोनापावल खळबळ माजली होती, तसेच या भागात अनेक महिने पोलिस गस्तीबाबत अनेक प्रश्न व शंका निर्माण झाल्या होता. पोलिसांनी या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासकामाची माहिती उघड करण्यास टाळाटाळ चालवली आहे.
दरोडेखोरांनी जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्याची दरोडा घालण्यापूर्वी रेकी केली होती. या बंगल्यात राहणाऱ्या वृद्ध दांपत्याची तसेच केअरटेकर तथा सुरक्षारक्षकाची माहिती मिळवून हा दरोडा घातला होता. घटनेपूर्वी या बंगल्यामधील कामाच्या निमित्ताने कोणी मजूर वैगरे आले होते का, याचा तपास करत आहे. बंगल्यातील सीसी टीव्हीचे ‘डीव्हीआर’ दरोडेखोरांनी पळविल्याने त्यांना या बंगल्यामधील बरीच माहिती असण्याची शक्यता आहे.
या चोरीवेळी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी पळविली अशी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र दागिन्यांबाबतची माहितीही जमा करत आहेत. पोलिसांनी वृद्ध दांपत्य तसेच केअरटेकर तथा सुरक्षारक्षकाची जबानी नोंदवली असली तरी त्यामध्ये विसंगती दिसून येत असल्याने तपासकामाची दिशा ठरवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.
दरोडेखोरांनी चेहऱ्यावर बुरखा घातल्याने त्यांची ओळख पटवणेही पोलिसांना कठीण झाले आहे. आठवडा उलटून गेल्याने दरोडेखोर हे गोव्याबाहेर केव्हाच पसार झाले आहेत. सुगावाच न लागल्याने पोलिस पथक कोठे पाठवायचे असा प्रश्न पोलिसांसमोर पडला आहे.
दरोडाप्रकरणी आठवडा उलटला तरी काहीच ठोस पुरावे हाती लागले नसल्याने पणजी पोलिस हतबल बनले आहेत. या घटनेचा शोध लावण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. दोनापावल परिसरात या घटनेनंतर रात्रीच्यावेळी पोलिस वाहन गस्त वाढवण्यात आली आहे. त्या परिसरात सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणच्या मजुरांचीही पडताळणी व चौकशी करण्यात येत आहे.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी गेल्या आठवडाभरात या दरोड्याचा तपास करण्यासाठी काही गुप्तचर पोलिस यंत्रणेची मदत घेतली, मात्र अजून ठोस अशी काहीच माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणाच्या शोधकार्यासाठी क्राईम ब्रँचचे अनुभवी दोन पोलिस निरीक्षकांनाही नियुक्त करण्यात आले आहेत. ते या कामात पणजी पोलिसांना मदत करत आहेत.
दरोडेखोर हे बांगलादेशी असल्याचा निष्कर्ष सुरवातीला काढण्यात आला होता, मात्र तो सुद्धा अंधूक दिसू लागला आहे. दोनापावल येथील बंगल्यांच्या बाहेर असलेल्या सीसी टीव्ही कॅमेराच्या मदतीने दरोडेखोर येताना व जातानाही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या रात्री ही टोळी कोठेच दिसत नाही. यावरून ते दरोडा घातल्यानंतर वेगवेगळ्या वाटेने पसार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.