Kala Academy: ईस्लामच्या नावाखाली हाफ़िज , तस्लिमा सारख्या लोकांच्या मदतीने जिहादच्या माध्यमातून स्वतःच्या व इतरांच्या आयुष्याची होळी झालेल्या तरुण-तरुणींच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावरील स्थित्यंतराचे विदारक दर्शन ‘वरदअंबिका कला संघ,फोंडा’ या इरफान मुजावर लिखित ‘दोजख’ या नाटकाच्या सादरीकरणाने झाले.
हाफिज हा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दहशतवाद्यांना मुली पुरवत असतो. त्याची बायको अमाल इच्छा नसताना रूबा या आपल्या बहिणीच्या भल्यासाठी त्याला साथ देते. हाफिजने पळवून आणलेल्या नादिया, नसीमा आणि जिहान या मुलींची मानवतेचा कळवळा असलेली, आंधळी झालेली रूबा, जवळीक साधते.
पळून जाताना नसीमा आणि जिहानचा मृत्यू होतो, तर रुबाला ‘इसिस’च्या हवाली करण्याच्या तस्लिमाच्या कृतीला विरोध करताना हाफिजचा मृत्यू होतो. अमाल एकटी पडते. रुबा नादियाच्या मनात येऊन आपल्या मानवतेच्या सुंदर संकल्पनेचे कार्य पुढे नेण्यास सांगते. दहशतवादातून अतिशय किळसवाणे , भयानक आणि यातनामय जीवन जगलेली नादिया शांतीचा संदेश देते व नाटक संपते.
हजारो वर्षांच्या वैचारिक प्रक्रियेनंतर मानव या प्राण्याचे माणसात रूपांतर झाले.विचारशक्ती प्राप्त होऊनही दहशतवाद्यांच्या बुद्धिभेदामुळे पुन्हा आपण जनावरे बनत चाललो आहोत का? हा प्रश्न हे नाटक पाहताना सतावतॊ.
‘दोजख’, एका महत्त्वाच्या संवेदनशील विषयावरील नाटक. ‘जिहाद’ मुळे स्वर्ग प्राप्त होतो, असे धर्माच्या आधारे पटवून देणारे अतिरेकी याच धर्माचा वापर स्त्रियांच्या शोषणासाठी करतात, हे नाटकाच्या सुरूवातीतील हाफ़िजने गुलाम म्हणून आणलेल्या तरुणींच्या- नादिया, नसीमा आणि जिहान यांच्या संवादावरून दिसून येते.
गुन्हेगारी, मानवी हक्क, जात, धर्म, समानता या विषयांची सरमिसळ असलेल्या या दृष्यात तिन्ही अभिनेत्रींनी सुरेख अभिनय केला. विशेषतः युद्धातून वाचलेल्या मुलींना अतिरेक्यांचे द्वेष, अत्याचार, मानसिक दडपण कसे सहन करावे लागते, याचे भयाण दर्शन घडले.
प्रचंड आशावादी असलेल्या नादियाची भूमिका छान झाली. आपला पवित्र यझिदी धर्म मानणारी, गुलामीनंतर दहशतवादाने दहशतवादाला प्रतिकार न करण्याचा सल्ला सहकाऱ्यांना देणाऱ्या नादियाचा श्रावणी नायक यांनी केलेला अभिनय भावला.स्वतःची तात्विक बाजू समर्थपणे मांडणारी, दहशतवाद्यांना त्यांच्यात भाषेत उत्तर देऊ पाहणारी, नसीमाची भूमिका तन्वी कामत बांबोळकर यांनी यशस्वीरित्या साकारली.
रूबा हे मुळात कवी मनाचे निरागस पात्र प्रज्ञा तांडे यांनी संयत अभिनयाने हळुवारपणे फुलवत नेले. आपल्या माणसांवर प्रेम करणारी, आपले डोळे गेल्यानंतर दुःखी किंवा काही अघोरी प्रसंग बघण्यापेक्षा डोळे नसण्यात सुख मानणारी, अतिरेक्यांच्या कारवाईमुळे घाबरणाऱ्या रूबाचा अभिनय छान वाटला.
प्रचंड ताण तणावाखाली वावरणारी घाबरी, बावरलेली सत्याची आणि संकटाची जाणीव होताच मनाने खचणाऱ्या जिहानच्या भूमिकेशी सर्वज्ञा पाटील हिचा छान मेळ बसला. आपल्या इच्छेविरुद्ध नवऱ्याला साथ देणारी, रूबाच्या मृत्यूनंतर खचलेली, पण अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची तयारी करणारी अमाल सायली कामतने अचूक सादर केली.
जहाल अतिरेकी तस्लिमाच्या भूमिकेत गौरी कामत यांची संवादफेकीतील जरब अन् अभिनय भावला. दहशतवादग्रस्त इराकमध्ये कुटुंब पोसण्यासाठी मुली पुरवण्याचा धंदा करणाऱ्या हाफिजच्या भूमिकेत अभिषेक नाईक शोभले.
बुरहानच्या भूमिकेत अजित कामत छान वावरले. आशुतोष नाईक, रोहन पेडणेकर ,कलानंद कामत बांबोळकर, विशाल मांद्रेकर, गौरीश कोलवेकर, तेजस प्रभूगावकर, सायली कामत बांबोळकर ,प्रज्ञा कामत, आद्या कामत आणि अंकिता कामत यांनी इतर भूमिका केल्या. कलानंद कामत बांबोळकर यांची मोहीत विश्वकर्मासह केलेली नेपथ्यरचना विषयानुरूप होती.
पार्श्वसंगीत प्रसन्न कामत तर पार्श्वगायन गौतमी हेदे बांबोळकर यांचे होते. पार्श्वगायनातील धीरगंभीरपणा मंचावरील भीषण घटनांना उठाव देणारा होता. गौरी कामत यांची वेशभूषा तसेच खुशबू कवळेकर नायक यांची रंगभूषा कल्पक होती. रंगमंच व्यवस्था सुरेश काकोडकर तर निर्माता म्हणून प्रा. दामोदर पंचवाडकर यांनी काम पाहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.