Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Goa Shravan Flowers: श्रावण महिन्यातील सण उत्सवांची आपल्या निसर्गस्नेही पूर्वजांनी घातलेली साखळी, श्रावण महिन्यात शिगेला पोहोचते. मान्सूनच्या पावसाला प्रारंभ होतो.
Seasonal flora Konkan monsoon
Shravana month nature bloomsdainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येती सरसर, क्षणात फिरूनी ऊन पडे

श्रावण हा हरित देवतेला पडलेलं विलोभनीय स्वप्न असून त्याचे या महिन्यात घडणारे दर्शन केवळ मानवी समाजालाच नव्हे तर वृक्षवेलींना आणि पशुपक्ष्यांना प्रफुल्लित करत असल्याने तो आविष्कार विविधरंगी पुष्पोत्सवाने घडवतो.

श्रावण महिन्यातील सण उत्सवांची आपल्या निसर्गस्नेही पूर्वजांनी घातलेली साखळी, श्रावण महिन्यात शिगेला पोहोचते. मान्सूनच्या पावसाला प्रारंभ होतो आणि ज्येष्ठ, आषाढात नदीवाले, झरे पाण्याने तुडुंब भरून वाहतात. जमिनीत पेरलेल्या धान्याला फुलेफळे येतात.

आपल्या सभोवताली हिरव्या वैभवामुळे जो उत्साह वातावरणात पाहायला मिळतो, त्यामागे निसर्ग देवतेची कृपादृष्टी असल्याची भावना भारतीय लोकमानसात दृढ आहे. त्यामुळेच त्यांनी श्रावण महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल निर्माण केलेली आहे.

श्रावणातल्या पौर्णिमेला आकाशात समस्त कलांनी विकसित झालेला चंद्र असो अधवा माकडांना लग्नासाठी भ्रांती निर्माण करणाऱ्या सुवर्ण उन्हाची निर्मिती करणारा सूर्य असो, या साऱ्यात देवत्व पाहणाऱ्यांनी श्रावणात सणांबरोबर विधी, परंपरेत लोकमनाला निसर्गातल्या दिव्यत्वासमोर समोर नतमस्तक होण्यास जणू काही प्रवृत्त केलेले असते.

पर्जन्यवृष्टी झाल्यावर कातळ दगडांनी युक्त पठारावर वैविध्यपूर्ण फुलांचे दर्शन घडते. आश्विन, श्रावण, भाद्रपद या महिन्यात विशिष्ट कालखंडात कातळ सड्यांचे रूप वेगळे असते.

ठरावीक वेळेत बहरणाऱ्या पुष्पवनस्पती जणू दुसऱ्या फुलांच्या बहराला मागे टाकत आपले अस्तित्व फुलोऱ्यामधून सिद्ध करतात. सुंदर हिरव्या गवताळ पठाराला श्रावण महिन्यात येणारा बहर निसर्गातील मनोहारी रूप आपल्या समोर आणतो. या रंगांची उधळण दिवसातील वेळेनुसारदेखील बदलत असते.

सूर्योदयापासून माणूस आपल्या कामाला सुरुवात करतो. भारतीय लोकमानसात सूर्यदेवाला विशेष महत्त्व आहे. पहाटेपासून दिवसभर सूर्यप्रकाशातून संपूर्ण विश्वाला रंग चढल्यामुळे मानवाचे जीवनही रंगीत, आनंदी बनते. त्यामुळे प्रत्येक सकाळ ही नवीन दिवसाची सुरुवात असते. ती नवीन ऊर्जा घेऊन येते असे मानले जाते. आपल्या जीवनात वाईट प्रसंगांना संध्याकाळची उपमा देऊन पुन्हा सकाळ येणार असल्याचे सांगितले जाते.

फुले सकाळीच का बहरतात? शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यावर आपला प्रश्नाच चुकीचा असल्याचे जाणवते. सकाळ म्हणजे बहरणे आणि रात्र म्हणजे कोमेजणे असा विचार कुणीही बाळगू नये अशी शिकवण घेऊन येणारा श्रावण महिना सर्वांत पहिल्यांदा, रात्री बहरणाऱ्या पांढऱ्या फुलांचे आपल्याला दर्शन घडवतो.

स्थानिक भाषेत या फुलांना ‘तुतारी’ असे म्हणतात. दिवसभर जेव्हा निसर्गसुंदर रंगाने सजलेला असतो तेव्हा ही फुले जणू झोपी जातात. संध्याकाळ होताच जणू काही त्यांच्यात ऊर्जा सक्रिय होते आणि ती ताजीतवानी होऊन जागी होतात.

अंधार पडू लागताच इतर फुले कोमेजतात परंतु ही फुले मात्र पूर्णपणे बहरून विस्तीर्ण पठाराला पांढऱ्या रंगाचा साज चढवतात. जणू आकाशातील तारे पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. त्यांचा आकार शहनाईसारखा असतो. रात्रीच्या वेळी वर डोकावून पाहणारी आणि सकाळी सूर्य प्रकाशात कोमेजून जाणारी ही फुले म्हणजे निसर्गातील अद्भुत चमत्काराच!

रात्र ही त्यांच्यासाठी नवीन दिवसाची जणू सुरुवात असते. त्यामुळे गोव्यातील पठारावर, माळरानात आषाढापासून श्रावणापर्यंत तुतारीची फुले सर्वांत प्रथम आपले स्थान प्राप्त करून संध्याकाळ व ते सकाळपर्यंत आपल्या सोज्वळ अस्तित्वाचीझलक दाखवतात.

काळोखात परागीकरण करणारे कित्येक कीटक त्यांच्यावरती अवलंबून असतात याची नोंद करणे गरजेचे आहे. आज जर कामातून घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला नजर टाकल्यास हे दृश्य आपल्याला अनुभवता येते. दिवसासारखी सुंदर व रात्रही तितकीच मनाला भुरळ घालणारी, मनोहारी असते.

श्रावण महिना आपल्या हिवळीत चांदेरी, सोनेरी रंगाबरोबर गुलाबी, निळ्या रंगाचे अतिशय लावण्यरूप आपल्यासमोर ठेवतो. श्रावणापर्यंत चंदेरी रात्रीत बहरलेल्या चंदेरी फुलांना मागे टाकत सोनेरी रंगाच्या ‘हरणा’ नामक फुलांच्या बहराला सुरुवात होते.

या फुलांना तर गणेशचतुर्थी वेळी माटोळीस बांधण्यासाठी विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर काही गुलाबी तेरडेही आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हजार झालेले आहेत. सबंध गोव्यात अनेक प्रकारच्या तेरड्यांचे दर्शन आपल्याला घडत असते. त्यामध्ये गवतवर्गीय, गोव्यात ‘चिड्डो’ म्हणून ओळख असलेले लहान तेरडे, मोठे तेरडे भरपूर प्रमाणात आढळतात.

त्याची नावे त्यांचा स्वरूपावरून, अधिवासावरून दिलेली आहेत. विशेषत तेरडे मातीवर उगवलेले दिसतात परंतु गोव्यातील एक प्रजाती अशी आहे जी फक्त दगडावर उगवते. त्यामुळे या तेरड्यांना ‘दगडी तेरडे’ असे म्हणतात. लढाईत वापरणाऱ्या ढाली सारखा गोलाकार आकार असलेल्या तेरड्यांना ‘ढाल तेरडा’ म्हणतात. गोव्यातील चोरला घाटात यांचे दर्शन घडते.

कातळ सड्यावर मातीचे प्रमाण अत्यल्प असते त्यामुळे बहुतेक वनस्पती कीटकभक्षी असतात. जगण्यासाठी आवश्यक सत्त्वे प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे मातीची उपलब्धता नसल्याने ते कृमी कीटकांना भक्षण करून आपल्या अन्नाची प्राप्ती करतात. कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचात विशेष रचना केलेली असते.

त्यांची मुळे, फांद्या कृमी कीटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. नागाळी पठारावर अगदी हातच्या बोटाएवढीच उंच वाढणारी ‘ड्रोसेरा इंडिका’ या प्रदेशनिष्ठ वनस्पतीचे दर्शन घडते. श्रावणात त्याला गुलाबी फुले येतात. त्याच्या लहान लहान वेलीवर असलेल्या असंख्य द्रवबिंदूंमुळे त्यांची खास ओळख आहे. हे द्रव चिकट असतात.

Seasonal flora Konkan monsoon
Surangi Flowers: सूर्य वर आल्यावर उमलणारी, जुन्या फांद्यांवरती येणारी 'सुवासिक सुरंगी'

एकदाचा कुणी कीटक त्याच्यावर बसला की त्याची सुटका नाही. जितका हालचाल करेल तितका तो चिकटत जातो. हळूहळू ही वनस्पती जणू काही आपल्या वेलींसारख्या हाताची मूठ झाकून त्याला आपल्या अन्नाचा घटक बनवते. याच कालखंडात ‘स्मिथिया’ कुळातील वनस्पती आज अनेक ठिकाणी पिवळ्या रंगाने बहराला आलेली आहे.

काही दिवसांनी सोनेरी पठाराला आकाशी निळ्या रंगाचा साज चढवण्यासाठी ‘युवट्रीकुलारीया’ नामक वनस्पती सज्ज झालेल्या आहेत. त्याचबरोबर तेरडे जेव्हा पूर्णपणे बहरून गडद गुलाबी रंगाने बहरतात तेव्हा पठाराचे स्वरूप मन भुलवणारे असते.

Seasonal flora Konkan monsoon
Tiver flowers: गोड पाणी देणाऱ्या म्हादईच्या संगमावर होणारा फुलांचा वर्षाव, 'तीवर'चा गुलाबी बहर

सर्वण येथील कारापूर, मोपा, खणगीणे, रिवण ही गोव्यातील झांब्या दगडांची पठारे ‘दीपकाडी कोंकनेंसीस’ आणि प्रदेशनिष्ठ असलेली ‘दीपकाडी गोवन्सीस’ या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. आषाढ श्रावणात त्यांचा श्वेतवर्णीय बहर अवर्णनीय असतो.

हा बहर फुलपाखरे, पतंग, भुंगे व इतर कृमी कीटकांसाठी आनंदाचा क्षण असतो. इतका बहर पाहून त्यांना वेड लागलेले असते. त्यामुळे पाऊस कमी होताच दिवसा व रात्री फुलांवरती ते रेंगाळत असताना निसर्गात श्रावण साजरा, सोज्वळ बसून मानवाला हर्षित करीत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com