गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा आमदार दिव्या राणे या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. परंतु त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व अतिशय प्रखरपणे अधोरेखित होत असून एका कुशल नेत्याच्या हाती जर जबाबदारी गेली आणि जनतेसाठी काही करायची इच्छा, तळमळ असली की कशा पद्धतीने काम करता येते, याचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. गोव्याच्या काजूला जागतिक स्तरावर स्थान मिळावे, शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. एफडीएच्या माध्यमातून भेसळ काजूवर कारवाईसाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. आता येत्या काजू महोत्सव हरित गोवा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही तरी मोठ्ठी घोषणा करण्याच्या तयारीत त्या आहेत. याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. परंतु कोणते मोठे निर्णय घेणार? ही माहिती गुलदस्त्यात ठेवल्याने उत्सुकता शिगेला लागली असून अनेकांचे लक्ष येत्या काजू महोत्सवाच्या उद्घाटनाकडे लागले आहे. ∙∙∙
अयोग्य नियोजनामुळे अनेक योजना फसतात, हे आपण अनेक वेळा अनुभवले आहे. राज्यातील एकमेव साखर कारखाना कोणाच्या चुकीमुळे बंद पडला? आता गोवा डेअरीला जर सरकारने सहयोगाची संजीवनी दिली नाही, तर गोवा डेअरीची गत संजीवनी साखर कारखान्या सारखीच होणार आहे, असे आम्ही नाही, दूध उत्पादक शेतकरी म्हणतात. गोवा डेअरी सहकारी तत्त्वावर चालत आहे. राज्यातील सुमार १८० सहकारी दूध सहकारी सोसायटी गोवा दूध संघाचे सदस्य आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोवा डेअरीवर सरकारचे वर्चस्व आहे. ज्या गोवा डेअरीवर दूध उत्पादकांची सत्ता असायला हवी, त्या डेअरीवर सरकारचे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. गोवा डेअरी असताना सरकारने राज्यात गुजराती डेअरीला परवानगी देऊन गोवा डेअरीच्या अस्ताची तयारी या पूर्वीच केल्याने दूध उत्पादक म्हणायला लागले आहेत, आधी संजीवनी आणि आता गोवा डेअरी सौजन्य गोवा सरकार. ∙∙∙
कृषिमंत्री रवी नाईकासारखा दुसरा धूर्तनेता गोव्यात तरी कोणी असेल असे वाटत नाही. याचा प्रत्यय परवा फोंडा येथे गोमन्तक टीव्हीने घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी आला. मुलाखतीत त्यांना सध्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री म्हणून ते दहापैकी किती गुण देऊ शकतात, असे विचारल्यावर त्यांनी एक मिनिटही न दवडता नऊ असे उत्तर दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री सध्या चांगले कार्य करत असल्याची पुस्तीही जोडली. याचा अर्थ आगामी निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री दहापैकी दहा गुण घेऊ शकतात, असाही होऊ शकतो. आता रवी हे मुख्यमंत्र्यांना खुश करण्याकरता बोलले का? की मनापासून बोलले ते कळायला मार्ग नसला तरी त्यांचे हे ‘गुण’ सध्या फोंड्यात चर्चेचा विषय बनले आहे, एवढे नक्की. नाहीतरी रवींची प्रत्येक कृती ही चर्चेचा विषय बनतच असते, नाही का? ∙∙
वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ‘बॉडी ऑन कॅमेरा’ असलेल्या पोलिस निरीक्षकांचा अधिकार आहे. त्यामुळे एरव्ही पणजी बसस्थानकावर वाहतूक पोलिसांची असलेली पथके गायब झाली आहेत. एकच वाहतूक पोलिस निरीक्षक असल्याने वाहतूक पोलिसांमध्ये मरगळ आली आहे. निरीक्षक पदाखालील पोलिस कारवाई करू शकत नसल्याने त्याना बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे. त्याचाच फायदा पर्यटक घेऊ लागले आहेत. हे पर्यटक ‘नो एन्ट्री’ असूनही विरुद्ध दिशेने रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका पणजी शहरामध्येच उद्भवला आहे. या पर्यटकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. स्थानिक वाहन चालकांनीही त्याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. उभ्या असलेल्या पोलिसांमध्ये निरीक्षक नसल्यास कोणीही वाहन चालक पोलिसांना दाद देत नाही. एकेकाळी हेल्मेट नसलेले वाहन चालक हे वाहतूक पोलिसांना पाहून पळ काढायचे, आता मात्र बिनधास्तपणे पोलिसांच्या समोरूनच जातात. त्यामुळे वाहतूक पोलिसांची स्थिती केविलवाणी झाली आहे. पोलिसही न बघितल्यासारखे पाठ करून रस्त्यावर उभे असलेले दिसतात. ∙∙∙
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व उत्पल पर्रीकर यांना भाजप प्रवेश दिला जाणार का? ते भाजपमध्ये यावे असे वाटते का? हे दोन प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना अलिकडे हमखासपणे विचारले जातात. त्याचे उत्तर सरळ देणे राजकीय दृष्ट्या अडचणीचे ठरू शकते, हे दामू यांना ठाऊक आहे. यामुळे ते सावध पवित्रा घेतात. सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. चूक केलेल्यांना आपण चूक केली होती, याची जाणीव तरी होऊ द्या, असे सांगून ते वेळ मारून नेत आहेत. ∙∙∙
सोमवारी मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकपदाचा ताबा सूरज सामंत यांनी घेतला. सोमवारचा मुहूर्त त्यांनी निवडला होता. ठाण्यातील सर्व पोलिस यावेळी जातीने हजर होते. नव्या सायबाचे वेलकम पोलिसांनी जोरदारपणे केले. मात्र काहीजण आतून दुःखी होते. सामंत हे कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. आता आमची डाळ शिजणार का? याची त्यांना चिंता आतापासून भेडसावू लागली आहे. एकंदर मडगाव पोलिस ठाण्याचा माहोल थोडी खुशी थोडा गम अशीच होती. ∙∙∙
दोनापावल येथील अलिशान भागात असलेल्या एका बंगल्यावर दरोडा पडतो व त्या घटनेची साधी माहितीही घेतली गेली नाही. दोनापावल या भागात यापूर्वी काही ठिकाणी चोऱ्या झाल्या मात्र त्याची नोंद, तक्रारी न दिल्याने झाली नाही. विशेषतः बंगल्यामध्ये राहत असलेल्या वृद्धांची माहिती प्रत्येक पोलिस स्थानकावर नोंद असणे आवश्यक आहे. प्रत्येक भागातील बीट पोलिसांना या वृद्धांची अधूनमधून चौकशी करण्याची तसेच भेट देण्याचे काम आहे. मात्र त्याकडे पोलिस स्थानकाच्या प्रमुखांकडून दुर्लक्ष होऊ लागले आहे. हे बीट पोलिस हल्ली त्यांना आखून देण्यात आलेल्या परिसरात क्वचितच फिरताना दिसतात. रात्रीच्यावेळी पोलिस नियंत्रण कक्षाच्या गस्तीवरील वाहनेही गस्त घालत नाही. या वाहनांसाठी दिलेला पेट्रोल कोटा अपुरा असल्याने वारंवार गस्त न घालता एका ठिकाणी त्या उभ्या करून पोलिस आराम करताना दिसतात. राज्यातील कायदा सुव्यवस्था खरीच सुधारली, की बिघडली आहे. हे आता या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनाच उत्तर द्यावे लागेल. काही तासांतच गुन्ह्याचा छडा लावणारे पोलिस यंत्रणा या दरोड्याने चक्रावून गेले आहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.