Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

गोवा वीज खात्यात लावणार शिस्त!

वीज कर्मचारी खरेच गांभिर्याने घेणार का?

दैनिक गोमन्तक

गोवा: वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीजखात्यात कडक शिस्त आणली जाईल, तसेच लोकांना विनाकारण सतावणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असे बजावले आहे. पण त्यांचे हे इशारे वीज कर्मचारी खरेच गांभिर्याने घेणार का? असा सवाल त्या खात्यातूनच केला जाऊ लागला आहे. लोकांना कधीच वेळेवर व अचूक बिले मिळत नाहीत. मीटर नावावर करण्याची गोष्ट तर बाजूलाच राहिली. मग त्या शिस्तीला अर्थ तो काय?∙∙∙

मॅडम, दुकानाची चावी कधी भेटेल?

‘इफ यू फेल तो प्लॅन इट्स शूअर यू प्लॅन टू फेल’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने नियोजनाचे कसे तीन तेरा वाजतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे केपे नगरपालिकेने उभारलेली व्यावसायिक इमारत. या इमारतीचे उद्‍घाटन घाई गडबडीने निवडणुकीपूर्व आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच करण्यात आले होते. उद्‍घाटन झालेल्या या इमारतीचा ताबा अजूनपर्यंत पालिकेकडे आला नसल्याचे कळते. जी जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारली आहे त्या जुन्या इमारतीत व्यवसाय करणारे दुकानदार गेल्या चार वर्षांपासून दुकानाविना आहेत. मासळी विक्रेत्यांना दफनभूमी जवळ उघड्यावर मासळी विकावी लागते ते सर्व व्यावसायिक आता नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांना विचारायला लागले आहेत, ‘मॅडम दुकानाची चावी कधी भेटणार’ बिचाऱ्या मॅडम एवढेच सांगतात - ‘सब्र करा’ चावी लवकरच भेटणार.∙∙∙

मानुचा क्रूझ सिल्वाला आशीर्वाद!

गोवा विधानसभेत यावेळी बरेच ‘लो प्रोफाई’ल आमदार निवडून आले आहेत. कमी बोलणारे व गोंधळ गडबड न करता मुकाट्याने काम करणारे आमदार विधानसभेत आहेत. यात पहिला नंबर लागतो तो वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांचा. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेले क्रूझ हे खऱ्या अर्थाने आजातशत्रू म्हणावे असे व्यक्तिमत्त्व. त्यांनी जनसेवेचे व्रत घेतलेले असून जनतेची सेवा करण्यासाठी दोन संपर्क कार्यालये उघडली आहेत. यावेळी क्रूझ यांना आशीर्वाद देण्यासाठी माजी आमदार मानू फर्नांडिस खास उपस्थित होते. कुंकळ्ळी व वेळ्ळी मतदारसंघाचे नेतृत्व केलेले मानू आता राजकारण सोडून धार्मिक कार्यात व्यस्त आहेत. मानुचा आशीर्वाद क्रूझला लाभल्याने आम आदमी पक्षाचे नेते व कार्यकर्ते सध्या खुश आहेत.∙∙∙

कुंकळळी पालिकेचा उलटा कारभार!

‘बांयचे काडून न्हयक उडोवप’ अशी कोकणीत एक म्हण आहे. कुंकळ्ळी नगरपालिकेचा कारभारही असाच चालतोय असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पालिकेने सध्या मॉन्सूनपूर्व कामाला सुरवात केली आहे. पालिकेच्या चौदाही प्रभागातील गटारे साफ करण्याचे काम सुरू आहे. मात्र, गतारातून काढलेला कचरा व चिखल तसाच रस्त्यावर टाकून दिल्यामुळे तो कचरा सर्वत्र पसरला आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे कचरा रस्त्यावर पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.पालिकेने साफसफाईच्या नावाने जो शिगमा घातला आहे त्याच्यामुळे लोकांची डोकेदुखी वाढली आहे.पालिकेला सद्या कोणीच वाली नसल्यामुळे आंधळं दळत आणि कुत्र पीठ खाते अशी स्थिती झाली आहे. ∙∙∙

काँग्रेसचे ‘हम नही सुधरेंगे’!

पक्षामध्ये नवचैतन्‍य आणण्यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्‍यभरात ‘चेतना यात्रे’चे आयोजन केले. पक्षावर नाराज असलेल्‍या आणि पक्ष सोडून गेलेल्‍या पक्षाच्‍या जुन्‍या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी म्‍हणे ही यात्रा काढण्यात येत आहे. पण नेतृत्व असो किंवा एखादे पद असो राज्‍यस्‍तरीय पातळीवर एकमेकांना पाण्यात बघणारे नेते आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि मौन यामुळे राज्‍यातील काँग्रस खंगली. यापुढे सर्वांनी एकोप्याने काम करून सत्तारूढ भाजपाला धडा शिकवण्याचा चंग म्‍हणे श्री. पाटकर यांनी बांधला आहे. पण कुंकळ्ळीतील यात्रेवेळीच याला अपशकून झाला.

पक्षाचे स्‍थानिक नेते एल्‍विस गोम्‍स यावेळी अनुपस्‍थित राहिले. याची चर्चा सुरू असतानाच श्रीस्‍थळ-काणकोण येथेही घोटाळा झालाच. पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेले महादेव नाईक या ठिकाणी प्रकट झाले. यामुळे पक्षाचे स्‍थानिक नेते जनार्दन भंडारी बैठक सोडून निघून गेले. याबाबत खुलासेबाजी झाली असली तरी यामागील कारणे न समजण्याइतकी जनता दुधखुळी राहिलेली नाही, हे काँग्रेस नेत्‍यांना कधी कळणार देव जाणे. मागील पानावरून पुढे... करत काँग्रेसचे ‘हम नही सुधरेंगे’ धोरण अद्यापही कायम आहे. ∙∙∙

सुदिनरावांचा हटके अंदाज

गोवा राज्यातील मंत्रिमंडळात वीज खात्याचा ताबा सांभाळणारे मंत्री सुदिन ढवळीकर ही तशी सुसंस्कृत व्यक्ती. आता इतर मंत्री सुसंस्कृत नाहीत, असे आम्ही म्हणत नाही, पण त्यातल्या त्यात सुदिनरावांची पद्धतीच फार वेगळी आहे. आता हेच पहा. पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टी लोकांच्या जीवनाशी निगडित त्यामुळे वीजमंत्री असल्याने राज्यभरातील लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन यायला लागले आहेत.

बांदोडा येथील सुदिनरावांचे निवासस्थान तर लोकांनी फुलून गेलेले असते. त्यात त्यांच्या मतदारसंघातील लोकांबरोबरच इतर मतदारसंघातील लोकांचाही मोठा समावेश असतो. मागच्या वेळेला पाण्याचा ससेमिरा आणि आता विजेचा... तरीपण कुणी काम करणार याची अपेक्षा असल्यामुळे अशी लोकांची गर्दी अपेक्षित आहेच, पण आपल्या घराचा परिसर जनता दरबार करणारे सुदिनराव म्हणूनच वेगळे आहेत, असे मडकई मतदारसंघातील नव्हे इतर मतदारसंघातील लोक बोलताहेत. ∙∙∙

भाजप खरेच ‘जुमला’ पार्टी आहे?

‘जुमला’ हा शब्द उत्तर भारतीयांना चांगलाच ठाऊक आहे. पण भाजपच्‍या राष्ट्रीय नेत्‍यांनी तो देशभर प्रसिद्ध केला. ‘जुमला’ या शब्दाची व्‍याख्याच करायची म्हटले तर आपले इप्‍सित साध्य करण्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व करणे अशी करता येईल. देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत भाजपने जुमलाबाजी केल्‍याचे मान्‍य केले होते. यानंतर ‘जुमला’ या शब्दाला देशव्‍यापी प्रसिद्धी मिळाली. आणि लोकांच्‍या दैनंदिन वापरातही आली.

गोवा विधानसभा निवडणूक जाहीरनाम्‍यात भाजपने राज्‍यातील खाणी लवकरच सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच वर्षांतून तीन महिने घरगुती सिलिंडर मोफत देण्याचेही सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी खाणींबाबत केलेल्‍या विधानावरून भाजपचा तो ‘जुमला’ असल्‍याची टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे. यात भरीत भर म्‍हणून केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटूंबांनाच मोफत सिलिंडर देणार असल्‍याचे सांगितले जात आहे. यावरूनही आता भाजप म्‍हणजे खरेच ‘जुमला’ पार्टी आहे, अशी चर्चा राज्‍यात सुरू आहे.∙∙∙

कुणाला कुणाला म्हणून चुचकारायचे!

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता पंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. विधानसभे आमदार निवडून आलेच; पण आता प्रत्येक मतदारसंघातील पंचायतींसाठी पंचसदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातील पंचायती आपल्या ताब्यात असाव्यात असे वाटणे साहजिक आहे. पण पंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याने आपल्या समर्थकांना निवडून आणणे संबंधित आमदारांना मोठे कठीण होते. पंचायत निवडणुकीत तसेच हवशे नवशे गवशे कितीतरी लोक उमेदवार असतात, त्यामुळे कोण निवडून येईल सांगता यायचे नाही. त्यामुळेच आमदारांसाठी ही डोकेदुखी ठरते आहे. शेवटी निवडून आलेला आपलाच असे गोड मानून घ्यावे लागते बरोबर ना. ∙∙∙

निर्णय न घेणे, हाच मोठा निर्णय

दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या संदर्भात या वाक्प्रचाराचा वापर केला जात असे. गोव्यात सध्या माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या बाबत काहीसे असेच झाले आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा प्रत्येक दिवस मडगावच्या बाबांसाठी कुचंबना करणारा ठरत आहे. मुख्यमंत्रिपदाने हात दाखवला, विरोधी पक्षनेतेपदही गेले. त्यामुळे रोज त्यांच्या भावी पवित्र्याबाबत नव नव्या अफवा उसळत आहेत. दिगंबरबाब त्याबाबत कानावर हात ठेवत आहेत. पण, त्यांच्या निकटवर्तीयांची देहबोली वेगळेच सांगते. ∙∙∙

भांडण दोन संतोषांचे

फातर्पा पंचायतीत दोन संतोष काम करतात. दोघेही कारकून. दोघांचे नाव जरी एक असले तरी सध्या त्या दोघांमधून विस्तवही जात नाही. याचे कारण म्हणजे एक संतोष माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा समर्थक तर दुसरा आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा. बाबूंचे समर्थक असलेल्या संतोषने दुसऱ्या संतोषला तुझी बदली मी पेडण्यात करवून घेईन अशी धमकी दिली आहे तर दुसऱ्या संतोष तसे केले तर मीही तुला काय ते पाहून घेईन, असे प्रतिआव्हान दिले आहे. पाहुया कोण जिंकते ते! ∙∙∙

मॉन्सूनपूर्व कामाचे गौडबंगाल

मॉन्सून पावसाला अद्यापही महिन्याभराचा अवधी आहे. मॉन्सूनपूर्व पावसाच्या पहिल्या सरीतच राजधानी पणजीत आणि भोवताली अनेक ठिकाणी पाणी साचले. मॉन्सूनपूर्व कामांचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, केवळ ४० मिली मीटर पाऊस पडताच अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे मॉन्सूनपूर्व काम नक्की कशा प्रकारे केले जातात, याबाबत संशय घेण्यास वाव आहे प्रत्यक्ष मॉन्सूनमध्ये १०० ते १५० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यावेळीच्या पूरस्थितीची अवस्था काय असेल? हे न बोललेलंच बरे. त्यामुळे पणजीसारख्या राजधानीच्या शहरात मॉन्सूनपूर्व कामे ही कागदावरच रंगवली जातात की काही दीर्घकालीन नियोजन असते; हे मात्र गुलदस्त्यातच आहे. मॉन्सूनला अद्याप एक महिन्याचा अवधी आहे. त्यामुळे गटार उपासण्याबरोबर मॉन्सूनपूर्वची काम करून घ्यावी लागतील अन्यथा पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होऊन पणजी जलमय होऊन जाईल, हे मात्र नक्की. ∙∙∙

बाणावलीचे आमदार अजून चर्चिल?

बाणावली येथे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चर्चिल आलेमाव यांचा पराभव करून एक अध्याय संपविला. आता आपचे व्हेंझी व्हिएगस तिथले आमदार आहेत. तरीही रोजच्या सवयीने असेल कदाचित कित्येक लोक अजूनही आपले प्रश्न घेऊन चर्चिल आलेमाव यांच्याच घरी जातात. काही जण तर या प्रश्नावर तुम्ही विधानसभेत आवाज उठवायलाच पाहिजे असे ठणकावून सांगतात. त्यांच्यासाठी चर्चिल हेच अजूनही बाणावलीचे आमदार आहेत असेच वाटते. ∙∙∙

अशोक नाईकांचे ‘हार’

हे अशोक नाईक म्हणजे भंडारी समाजाचे अध्यक्ष. रितेश नाईक यांना फोंड्याचे नगराध्यक्ष पद मिळाल्यावर घातलेल्या त्यांच्या हारानंतर आता कुर्टी खांडेपार पंचायतीचे सरपंच दादी नाईक यांना घातलेल्या हारामुळे फोंड्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. हेच अशोक नाईक निवडणूकपूर्वी आपचे सर्वेसर्वा केजरीवाल यांना भेटले होते आणि त्यांच्या प्रभावामुळे केजरीवालांनी भंडारीसमाजाचा मुख्यमंत्री करण्याची घोषणाही केली होती, पण झाले भलतेच. आपचा मुख्यमंत्रिपदाकरीता जाहीर केलेला उमेदवार पराभूत तर झालाच. त्याचबरोबर मागच्या वेळी असलेल्या भंडारी समाजाच्या अकरा आमदारांच्या संख्येत लक्षणीय घट होऊन ही संख्या यावेळी चारवर घसरली.

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी तर ‘आप’ने भंडारी समाजाला मुख्यमंत्रिपद देणार हे जाहीर केल्यामुळे आमच्या समाजावरच परिणाम झाला असल्याचे जाहीरपणे सांगितले आणि त्यांचे म्हणणे खरेही ठरले. अति उत्साहीपणा कधी कधी नडतो तो असाच. रवी नाईक जे मुख्यमंत्री झाले होते ते समाजाच्या कार्डावर नव्हे तर स्वबळावर असे लोक बोलतात ते उगाच नव्हे. रवींना तर फोंड्यात सर्व समाजाचे व धर्माचे लोक मतदान करतात हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे अशोकांचे हे ‘हार’ येणाऱ्या पंचायत निवडणुकीत समाजाकरीता ‘हार’ ठरतो की ‘हार’ ठरते हे बघावे लागणार आहे, असे भंडारी समाजाचेच लोक आता बोलायला लागले आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT