पणजी: दिगंबर कामत व रमेश तवडकर यांची वर्णी मंत्रिपदी लागली तरी मंत्रिमंडळात आणखी फेरबदल होतील, अशी चर्चा खुद्द सत्ताधारी गोटात आहे. खरेतर मंत्रिमंडळ फेरबदल गणेश चतुर्थीनंतर प्रस्तावित होता मात्र तो आताच करावा लागल्याने दोघा जणांचाच समावेश झाला, असेही सांगण्यात येत आहे.
मंत्रिपदासाठी मायकल लोबो, संकल्प आमोणकर यांच्या नावाची चर्चा होती. आमोणकर यांना भाजप प्रवेशावेळी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. कॉंग्रेसमधून आलेल्यांचे नेतृत्व लोबोंनी केल्याने साहजिकपणे मंत्रिपदावर त्यांचा दावा होता. निदान दिलायला यांना मंत्रिपद मिळेल, असे त्यांना वाटत होते.
मंत्रिमंडळातून गोविंद गावडे यांना वगळल्यानंतर एक जागा रिक्त झाली होती. सिक्वेरा यांनी काल राजीनामा दिल्यानंतर दुसरी जागा खाली झाली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आणखी तीन जागांवर नवे चेहरे आणण्यात येणार होते. मात्र, ते आता लांबणीवर पडले आहे.
नव्याने मंत्री झालेले दिगंबर कामत व रमेश तवडकर यांना कोणती खाती मिळतील याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कामत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तर तवडकर यांना आदिवासी कल्याण ही प्रमुख खाती दिली जातील, असे सांगण्यात येत आहे.
आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे पर्यावरण, कायदा, बंदरे अशी प्रमुख खाती होती. ती खाती कोणाला दिली जातील की अन्य मंत्र्यांपैकी कोणाला ती दिली जातील याविषयी उत्सुकता आहे.
मध्यंतरी किरकोळ खाती असूनही आपण चांगले काम केल्याचा दावा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला होता.
‘पर्पल फेस्ट’च्या आयोजनातून त्यांनी आपले संघटन कौशल्य दाखवले आहे. त्यांच्याकडे अन्य काही खाती या निमित्ताने मुख्यमंत्री सोपवतील काय, याकडेही अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
२००७ ते २०१२ या काळात ज्या मंत्रिमंडळाला भाजपचे नेते घोटाळेबाज मंत्रिमंडळ म्हणत हाेेते तेच दिगंबर कामत यांचे मंत्रिमंडळ पुन्हा सत्तेत आले आहे. हे परिवर्तन नसून हा प्रकार म्हणजे ‘ओल्ड वाईन इन न्यू बॉटल’ असेच वाटते, अशी तिरकस प्रतिक्रिया फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी कामत यांच्या मंत्रिमंडळ समावेशावर व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.