धारगळ: पेडणे तालुक्यातील धारगळ येथे एका ट्रकला आग लागल्यानंतर पुन्हा एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवताना, ट्रकमधून तब्बल ६० लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेने राज्याच्या सीमेवर होणारी अवैध दारू वाहतूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारगळ येथे एका उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. याच दरम्यान, त्यांनी ट्रकमधील माल बाहेर काढण्यासाठी कंटेनरचा सील तोडला असता, आतमध्ये दारूचे बॉक्स भरलेले असल्याचे दिसून आले. पोलिसांना एकूण १,२८६ दारूचे बॉक्स सापडले, ज्यांची किंमत सुमारे ६० लाख रुपये आहे.
हा ट्रक अवैधरित्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. आरोपींनी पकडले जाऊ नये म्हणून ट्रकमधील मूळ चेसिस नंबर बदलला होता आणि बनावट नंबर प्लेट लावली होती. ट्रकचा मालक आणि चालकाने संगनमत करून हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आणि मोठ्या शोध मोहिमेनंतर त्याला गुजरातमध्ये अटक करण्यात यश आले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, ही दारू कोठून आणली आणि कुठे पोहोचवली जाणार होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने राज्याच्या सीमेवरील तपासणी यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.