Vendors Outside GMC Dainik Gomantak
गोवा

बांबोळीत गाळे वितरणाला विलंब; व्यापारांमध्ये नाराजी

बांधकाम पूर्ण मात्र सरकारकडून चालढकलपणा

दैनिक गोमन्तक

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या आवाराबाहेरील भाजी - फळे विक्रेते तसेच खाद्यपदार्थांचे गाळे हटवल्यास वर्ष होत आले तर त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. नव्या गाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, पावसाळा जवळ येऊनही त्याचे वितरण करण्यात होत असलेल्या विलंबामुळे प्रतीक्षेत असलेल्या गाळेधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.

या ‘गोमेकॉ’ इस्पितळाच्या बाहेर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना हटवण्यात आले होते. मात्र, तेथील मारुती मंदिराच्या बाहेर गेल्या काही महिन्यापासून बेकायदेशीपणे नव्याने भाजी-फळ विक्रेत्यांनी व्यापार सुरू केला आहे. त्यामुळे सध्या गाळे मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गाळेधारकांवर हा अन्याय आहे. या पूर्वीच्या व्यापाऱ्यांनी तेथील पार्किंग क्षेत्रातील काही परिसरात उघड्यावरच व्यापार सुरू करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या इस्पितळाच्या बाहेर लोकांची गर्दी होऊ लागल्याने वाहतुकीचीही कोंडी होत आहे.

काही दिवसांपूर्वी या गाळेधारकांनी सरकारला तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी विनंती करणारे निवेदन दिले आहे. आठवडा उलटून गेला तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून गाळे वितरण करण्यासंबंधी कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत. या गाळेधारकांना वेळीच नव्याने बांधण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये स्थलांतर न केल्यास त्यांना व्यापार करणे कठीण होऊन बसणार आहे.

सध्या सकाळच्यावेळी या इस्पितळाच्या आवाराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने उभी करून खाद्यपदार्थ, कपडे तसेच प्लास्टिक व्सतू इत्यादी वस्तूंची विक्री केली जाते. इस्पितळ प्रवेशद्वाराबाहेर मोटारसायकल टॅक्सी स्टँड आहे तेथे तर भाजी विक्रेते जागा अडवून व्यापार करत असल्याने लोकांची गर्दी होते. इस्पितळात येणाऱ्या वाहनांना तेथे वाट मिळणेही कठीण होते. त्यामुळे ज्या कारणासाठी तेथील व्यापाऱ्यांना हटवण्यात आले होते त्याचा उद्देशच निष्फळ ठरला आहे. उपजिल्हाधिकारी, पोलिस व पंचायतीकडूनही नव्याने अतिक्रमण केलेल्यांविरुद्ध कोणतीच कारवाई होत नाही. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने खाद्यपदार्थ व भाजी विक्रेते असतात मात्र त्यांना तेथून हटवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

पूर्वीच्या गाळेधारकांची असलेली यादी व सध्याच्या यादीमध्ये बरीच तफावत आहे. ज्यांना तेथून हटवण्यात आले होते त्याच्यापेक्षा अधिक नावे या यादीमध्ये घुसडण्याचा प्रकार झाला आहे.

नव्या यादीला काही गाळेधारकांचा त्याला विरोध आहे. काही व्यापाऱ्यांनी पंचायतीकडून व्यापारासाठी परवानगी घेतली होती. मात्र, ज्यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम गेल्यावर्षी सुरू झाली तेव्हा त्यांचे तेथे काहीच अस्तित्व नव्हते.

आता गाळा मिळण्यासाठी सर्वजण दावा करत आहेत. त्यामुळे गाळेधारकांत समन्वय नसल्याने त्यांच्यात फूट पडल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका गाळेधारकानेच सांगितले.

गोमेकॉ इस्पितळ प्रवेशाच्या बाहेर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विक्रेत्यांचे बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण हटवण्यात आले होते. त्याला पुढील महिन्यात वर्ष होणार आहे. भरपावसात जिल्हाधिकाऱ्यांनी गाळेधारकांना धडक कारवाई करून त्यांना बेरोजगार केले होते. त्यावेळी माजी आमदारांनी तसेच पंचायतीने मध्यस्थी करून सराकारकडून पर्यायी व्यवस्थेची मागणी केली व ती मंजूर होऊन गाळ्यांचे बांधकामही पूर्ण झाले आहे. पावसाला सुरवात झाली आहे त्यामुळे या व्यापारांना या गाळेधारकांचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT