शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दीपश्री सावंत गावस ऊर्फ दीपाश्री प्रशांत म्हातो हिला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने दिपाश्रीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. फोंडा पोलिसांनी आज (5 नोव्हेंबर) दिपाश्रीला न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, पोलिसांनी दीपाश्रीकडून तीन कार आणि दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
दरम्यान, दीपाश्री अटक टाळण्यासाठी गोव्याबाहेर पळून गेली होती. मात्र, काल (4 नोव्हेंबर) दुपारी फोंड्यात येताच तिला रीतसर अटक करण्यात आली. गावकरवाडा-उसगावातील एका महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने 15 लाखांचा हा व्यवहार झाला होता. त्यात दीपाश्री हीच मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात सुरुवातीला आयआरबी पोलिस असलेल्या कुर्टी-फोंडा येथील सागर सुरेश नाईक याला अटक करण्यात आली होती.
त्याचवेळी, चौकशी दरम्यान माशेल येथील विद्यालयातील शिक्षिका सुनिता शशिकांत पावसकर हिचे तसेच दीपाश्रीचे नाव संशयित सागर नाईक याने घेतल्याने सुनिता पावसकर हिला 28 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. मात्र सुनिताला अटक झाल्याचे समजताच दीपाश्री फरार झाली होती. त्यामुळे फोंडा पोलिसांनी दीपाश्रीच्या विरोधात लुक आऊट नोटीस बजावली होती. मात्र काल (4 नोव्हेंबर) दीपाश्री फोंड्यात पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असताना तिला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.