गोवा म्हटलं की, "कुछ भी करो, चालता हैं!" अशी एक मनाची धारणाच तयार झालेली आहे. इथली लोकं सुशेगाद आहेत, त्यामुळे मनाला येईल तसं वागलं तरीही काही विशेष फरक पडणार नाही असाच विचार सतत मनात सुरु असतो. गोवा खरं तर सौंदर्याची खाण आहे, त्याचा स्वतःचा असा एक समृद्ध इतिहास आहे, मात्र पर्यटक गोव्याला येताना हे विसरतात. दुर्देवाने पर्यटक केवळ नाच-गाणी, मोठमोठाल्या आवाजातले कर्णकर्कश संगीत आणि दारूच्या नशेत बुडणारा गोवाच लक्षात ठेवतात.
दुसरीकडे मात्र, पणजीतील फोंतेन्हास सारख्या ठिकाणी पर्यटकांमुळे स्थानिक कंटाळले आहेत. आपण जरी नवीन ठिकाणी चार दिवस आनंदाने घालवायला आलो असलो तरीही तिथे अनेक वर्षांपासून लोक राहतात, गोवा हे त्यांच्यासाठी घर आहे आणि आपण त्यांच्या प्रायव्हसीचा आदर केलाच पाहिजे ही महत्वाची गोष्ट पर्यटक म्हणून आपण विसरूनच जातो. कोणाला आपल्या घरात इतरांनी सतत डोकावून पाहिलेलं आवडेल का? असा प्रश्न पडतो.
पर्यटक म्हणून आपण गोव्यात सुट्या एन्जॉय करण्यासाठी जातो. मात्र तिथेही लोकं राहतात हे आपण शिताफीने विसरतो. अनेकदा आपल्याला गोव्यात रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. पण आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ शकतो हे मात्र विसरुन जातो.
प्रत्येक ठिकाणी कैक वर्षांपासून काही वास्तू उभ्या असतात, यांमुळेच जागेची ओळख बनलेली असते, जागेचा समृद्ध इतिहास असतो, आपण मात्र ठिकठिकाणी रेघोट्या ओढणं, पायचे छापे काढण्यासारखे विचित्र प्रकार करतो. जेवढ्या कुतूहलाने त्या जागेला भेट देतोय तेवढ्याच जबाबदारीने वागणं हे देखील महत्वाचं नाही का?
काबो दे रामा सारख्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेणं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करणं आणि यामुळे स्थानिकांनी त्याचा त्रास सहन करावा लागणं हे कितपत बरोबर आहे?
पर्यटन हा जरी गोव्याचा प्रमुख व्यवसाय असला किंवा फिरणं याचा अर्थ थोडीशी मजा आणि मस्ती करणं असला तरीही कुठेतरी सरकारी नियमांची पकड मजबूत असणं कधीही चांगलं. केवळ नियम बनवून त्यांचं पालन होतं नसतं त्यावर लक्ष ठेऊन अंमलबजावणी करून घ्यावी लागते.
गोव्यात अनेक मंदिरं प्रसिद्ध आहेत, अशा ठिकाणी अंगभर कपडे घालूनच प्रवेश देणं असो किंवा समुद्र किनारे आणि धबधब्यांवर धोक्याच्या नियमाचं पालन करणं हे प्रत्येक पर्यटकांसाठी अनिवार्य केलं पाहिजे. याशिवाय, सरकार किनाऱ्यांवरील दलालांना हटवून परवानाधारक मार्गदर्शकांची भरती करत जलक्रीडा सुव्यवस्थित करण्यावर भर नक्कीच देऊ शकते.
आपल्याकडे पर्यटनाच्या व्यवसायाला महत्व आहे त्यामुळे पर्यटकांना कोणतीही गैरसोय होऊ नये ही आपली प्रमुख जबाबदारी ठरते. अशावेळी काही App-बेस्ड टॅक्सी सारख्या सुविधांची सोय करून दिल्यास पर्यटकांचा प्रवास सुरक्षित होऊ शकतो.
हिंटरलँड टुरिझममुळे गावकऱ्यांना फायदा नक्कीच होतो मात्र यामुळे स्थानिकांना काही त्रास होत नाहीये ना? त्यांना पर्यटकांची ये-जा चालेल ना? अशा प्रश्नांची उत्तरं सरकारजवळ कधीही असावी. आलेल्या पर्यटकांकडून मौज-मस्तीच्या नावाखाली पर्यावरणाला धोका निर्माण होत नाहीये ना याची खबरदारी घेतली गेली पाहिजे.
पर्यटकांकडून अनेकवेळा ट्राफिकचे नियम मोडले जातात आणि आपण मात्र त्यांच्याकडून काहीसे पैसे घेऊन सारवासरव करतो. पण असे विषय फाईन देऊन सुटण्यासारखे नाहीत, यावर कायमचा आळा बसवण्यासाठी ठोस निर्णय घेतले गेलेच पाहिजेत. काही विशेष पोलिसांची नियुक्ती करून केवळ नियम मोडणाऱ्या पर्यटकांच्या वागणुकीत सुधारणा केली जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.