Women Footballers Assault: महिला फुटबॉलपटूंवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या दीपक शर्मा यांना गोवा पोलिसांनी अटक केली. दीपक शर्मा हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. हिमाचल प्रदेशस्थित क्लबच्या दोन महिला फुटबॉलपटूंनी शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, इंडियन वुमन लीग 2 दरम्यान दीपक शर्मा यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. गोव्यातील एका हॉटेलच्या रुममध्ये हा हल्ला झाला होता. शुक्रवारी एआयएफएफकडे तक्रार करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी महिला फुटबॉलपटूंवर हल्ला झाला होता.
डीएसपींनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर दीपक शर्मा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. म्हापसा पोलिसांनी त्यांना विविध आरोपाखाली अटक केली. यात इजा पोहोचवणे, महिलेवर बळाचा वापर करणे इत्यादींचा समावेश आहे. त्यांना रात्री कोठडीत ठेवण्यात येणार असून रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे म्हापसा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतकांत नाईक यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) दोन महिला फुटबॉलपटूंशी कथितपणे भांडण करणारे कार्यकारी समिती सदस्य दीपक शर्मा यांना या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत क्रीडा क्षेत्रातील घडामोडीपासून दूर राहण्यास सांगितले होते. भारतीय महिला फुटबॉल लीग सेकंड डिव्हिजनमध्ये हिमाचल प्रदेशच्या खाड एफसीच्या दोन महिला फुटबॉलपटू सहभागी झाल्या होत्या. 28 मार्चच्या रात्री क्लबचे मालक शर्मा यांनी त्यांच्या रुममध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी एआयएफएफ आणि गोवा फुटबॉल असोसिएशनच्या समितीकडेही यासंबंधीची तक्रार केली होती. याशिवाय, म्हापसा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला फुटबॉलपटूंनी तक्रारीत म्हटले की, शर्मा दारुच्या नशेत होते आणि त्यांच्यापासून त्यांना धोका होता. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी एआयएफएफला अधिकाऱ्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले होते. शर्मा हे हिमाचल प्रदेश फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस, क्लबचे मालक आणि AIFF च्या कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. चौकशी समितीमध्ये कार्यकारी समिती सदस्य पिंकी बोंपल मगर, एआयएफएफ सुरक्षा आणि बाल संरक्षण अधिकारी रीता जयरथ आणि विजय बाली यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.