Goa Pink Force  संदीप देसाई
गोवा

गोव्यात ‘पिंक फोर्स’चा बोजवारा

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात गाजावाजा करून पोलिस खात्यात ‘पिंक फोर्स’ वाहने सुरू करण्यात आली आहेत मात्र चार महिन्यातच ही सेवा मरगळली आहे. निवृत्त पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी निवडणुकीपूर्वी मिरामार येथे कार्यक्रमांद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाले तरी ही सेवा रस्त्यावर क्वचितच दिसते. अनेकदा या ‘पिंक फोर्स’ची वाहने रस्त्याच्या बाजूने असलेल्या झाडाखाली उभी करून आतमध्ये महिला पोलिस मोबाईलवर असतात.

ही सेवा 24 तास कार्यरत असेल तसेच त्याचा चालकही महिला असेल असे सांगण्यात आले होते मात्र सध्याच्या स्थितीला या वाहनांवर काम करण्यासाठी पोलिस महिला कर्मचारीच मिळेनासे झाले आहेत. ज्याची वर्णी लावली जाते ती महिला पोलिस मंत्री वा आमदाराकडे जाऊन ती रद्द करते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पिंक फोर्सची वाहने ही पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर धूळ खात पडलेली होती. यावर करण्यात आलेल्या खर्चाप्रमाणेही सेवा केली जात नाही. त्यामुळे या सेवेचा बोजवारा वाजला आहे.

आरोग्‍य खाते करते तरी काय?

आज जागतिक मलेरिया दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आरोग्‍य खात्‍याने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राजधानी पणजीतही एका सभागृहात कार्यक्रम होता. सध्या राज्‍यात मुरगाव तालुका, फोंडा, मडगाव परिसरात मलेरियाचे रुग्‍ण सापडले आहेत. या कार्यक्रमस्‍थळी मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्‍य खाते उपाययोजना करत असेल, कार्यक्रम राबवत असेल तर मग राज्‍यात मलेरियाचे रुग्‍ण वाढतातच कसे? अशी कुजबूज उपस्‍थितांमध्ये सुरू होती. एखाद्या विशिष्ट परिसरातील लोक आरोग्‍य खात्‍याच्‍या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करत असतील आणि त्‍यामुळे मलेरियाचे रुग्‍ण वाढत असतील तर मग आरोग्‍य खात्‍याचे अधिकारी आणि कर्मचारी करतात तरी काय? अशीही चर्चा यावेळी सुरू होती. ∙∙∙

‘हस्‍तकले’चा विकास व्हावा

आज पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी हस्‍तकला महामंडळाच्‍या अध्यक्षपदाचा ताबा घेतला. यावेळी आर्लेकरांच्‍या कार्यकर्‍त्‍यांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी अकरा वाजता झालेल्‍या या कायक्रमप्रसंगी येथील कर्मचाऱ्यांचीही बरीच धावपळ सुरू होती. महामंडळाच्‍या कार्यालयाचा संपूर्ण परिसर निरस झाला आहे. इमारतीचा बराच भाग वापराविना पडून आहे. परिसरात छान झाडे आणि वनराई आहे. पण निगा न राखल्‍याने परिसराला अवकळा आली आहे. यावेळी श्री. आर्लेकर यांनी हस्‍तकला महामंडळाचा विकास करणार असल्‍याचे सांगितले. अगोदर कार्यालयाच्‍या परिसराचे सुशोभीकरण करा, महामंडळाचा विकास यथावकाश करता येईलच, असा एक नागरिक पुटपुटला. ∙∙∙

गोविंदांच्या धाडी

सध्या क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सुस्तावलेल्या प्रशिक्षकांना वठणीवर आणण्याचा विडा उचलला असावा. मागच्या आठवड्यात त्यांनी फातोर्डा स्टेडियमवर धडक देऊन कामचुकार कर्मचाऱ्यांना पकडले. सोमवारी त्यांनी फोंडा येथील प्रशिक्षण केंद्रावर धडक दिली असता तिथेही त्यांना लेट लतीफ प्रशिक्षक सापडलेच. गोविंदरावांच्या या धडक मोर्चाचा कित्येक प्रशिक्षकांनी धसका घेतला आहे असे सांगितले जाते. प्रशिक्षण केंद्राच्या दारात कुणाचीही गाडी उभी झाली की त्यांना म्हणे घाम फुटतो. काही प्रशिक्षक म्हणे प्रशिक्षणार्थ्यांकडे लक्ष देण्याऐवजी गेटकडेच अधिक लक्ष ठेवून असतात अशीही माहिती हाती लागली आहे बुवा !

विश्वजित-दिव्या यांचा सौहार्द

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपली पत्नी डॉ. दिव्या हिच्या वाढदिवसाप्रित्यर्थ एक फेसबूक पोस्ट टाकला आहे, तो भावस्पर्शी आहे. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तींना खूप अहंकार असतो. परंतु विश्वजित यांनी दिव्या यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रांना मोठ्या जाहिराती दिल्याच. परंतु फेसबूकवर साफ मनाने आपल्या भावनाही व्यक्त केल्या. ते म्हणाले, आमच्या दोघांमधला असलेला सौहार्द क्वचितच कुठे पहायला मिळतो. विश्वजित यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी उमेदवारी मिळवण्यासाठी घरच्यांशीसुद्धा पंगा घेतला होता. परंतु आता सर्व ठाकठीक झाले आहे. दिव्या यांना सत्तरीतील लोकांचेही पाठबळ मिळत आहे आणि त्या स्वत: पोटतिडकीने कार्य करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचा शेवट गोड ते सर्वच आनंददायी असते. ∙∙∙

बिच्चारी प्रतिमा

नावेलीमधील अनपेक्षित पराभवापासून प्रतिमा कुतिन्हो काहीशा पिछाडीवर गेल्या आहेत. आपमध्ये तसे त्यांना स्थान आहे; पण त्यांच्या धडाडीला तसा वाव मिळत नाही, अशी त्यांच्या समर्थकांची तक्रार आहे. त्या महिला काँग्रेसमध्ये असताना विविध प्रश्न घेऊन ज्याप्रमाणे रस्त्यावर येत तशा आता येत नसल्याने त्यांची सक्रियता तर कमी झाली नाही ना? असा प्रश्नही केला जातो. एक खरे की प्रतिमा काँग्रेसमधून बाहेर पडल्यापासून त्या पक्षाची सक्रियताही घटलेली आहे. एकंदरीत दोघांची अडचण एकच आहे. ∙∙∙

कामे लवकर मार्गी लागो

फोंडा पालिकेच्या खास बैठकीत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामासंबंधी ठराव मंजूर झाले. बऱ्याच काळानंतर पालिकेच्याबाबतीत चांगलं काहीतरी ऐकायला मिळाले. एरव्ही फोंडा पालिकेत फक्त पाडापाडीचे राजकारण चालले होते, आता एक वर्ष शिल्लक राहिल्याने कामाचा तगादा सुरू झाला आहे.

नूतन नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सध्या कामाचा धडाका लावल्याने आणि आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी पालिकेतील कामांना सहकार्य दिल्याने ही कामे शक्य तेवढ्या लवकर सुरू होतील, अशी आशा फोंडावासीय व्यक्त करू लागले आहेत. गेली चार वर्षे फोंडा पालिकेत राजकारणच चालले आहे. विकासकामांच्याबाबतीत फक्त चर्चा, कामाच्याबाबतीत नन्नाचा पाढा. पण पालिकेतील सर्व नगरसेवकांना आता वेळेचे महत्त्व पटलेय. कारण एका वर्षानंतर पुन्हा मतदारांसमोर जायचे झाले तर सांगणार काय, त्यामुळेच प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागातील कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. काही का असेना पितापुत्रामुळे फोंडा शहर पुन्हा एकदा कात टाकणार अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे आणि तसे झाले तर फोंड्यासाठी ती जमेची बाजू ठरेल, हे नक्की. ∙∙∙

रेजिनाल्ड सोनसोड्यावर फिरकलेच नाहीत

काही दिवसांपूर्वी सोनसोडो येथे कचऱ्याला आग लागली त्यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी ही सोनसोडोची समस्या सोडविल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही असे म्हटले होते. ही समस्या चिघळत ठेवल्याबद्दल त्यांनी दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई यांना दोषही देताना मी सोनसोड्याचे राजकारण करणार नाही असे त्यांनी म्हटले होते.

याहीपुढे जाऊन रेजिनाल्ड यांनी आपण दररोज सोनसोडोला भेट देऊन काम कुठवर पोहोचले आहे याचा आढावा घेणार असे म्हटले होते. यावर गोवा फॉरवर्डचे दुर्गदास कामत यांनी त्यांना ‘मन की बात न करता, काम की बात करा’ असा सल्ला दिला होता. रेजिनाल्ड खरेच सांगितल्याप्रमाणे सोनसोडोला भेट देतात का हे पाहायला सोमवारी गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी तिथे येऊन थांबले होते. पण, रेजिनाल्ड काही आलेच नाहीत. त्यावरून त्यांना फक्त ‘मनकी बात’ करायची आहे ‘काम की नही’ हेही स्पष्ट झालेच म्हणा ना?∙∙∙

रवी आणि सिंह

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले रवी नाईक यांच्याकडे हस्तकला खातेही आहे याची फारशी कुणाला जाणीव नसावी. मात्र, सोमवारी त्यांनी हस्तकला महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिल्यावर कित्येकांना ते याही खात्याचे मंत्री आहेत हे समजले. त्यांनी आल्या आल्या महामंडळाचे कार्यालय साफ सुधरे ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर त्यांनी पणजी येथील महामंडळाच्या दालनालाही भेट दिली.

त्या दालनात एक सिंह विकायला ठेवला होता. रवींनी आपल्या मिश्किल शैलीत हा सिंह तुम्ही सुदिनला का देत नाहीत असा सवाल केला. त्याचवेळी त्या दालनात काही महाराष्ट्रातील पर्यटक आले होते. त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याकडे हिंदी बोलण्यास सुरवात केल्यावर तुम्ही महाराष्ट्रातील तर मग तुम्ही मराठी का बोलत नाहीत, असे म्हणत त्यांना मराठी बोलण्यासही भाग पाडले. रवी मंत्री झाले तेव्हा त्यांनी हिंदीतून शपथ घेतली होती. रवींची ती दिव्य हिंदी ऐकून कित्येकांनी त्यांना ट्रॉलही केले. त्यामुळे रवींनी कदाचित हिंदीचा धसका तर घेतला नाही ना? असे कित्येकांना त्यावेळी नक्कीच वाटले असावे.∙∙∙

अशीही कान उघाडणी

गोवा किनारी व्यवस्थापन विभागाकडील खोळंबलेल्या प्रकरणांबाबत मुख्यसचिवांनी या विभागाला फैलावर घेतले आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी न होता राहिलेल्या प्रकरणांची गंभीर दखल घेतल्यावर मुख्य सचिवांना जाग आली ही वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्षात सदरविभाग असो वा प्राधिकरण त्यांना राजकारण्यांच्या तालावर नाचावे लागत़े व सुनावण्या खोळंबण्याचे मुख्य कारण आहे. हल्लीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाईविना राहिलेले कोलवा येथील काम हे त्याचे उदाहरण मानले जाते. ∙∙∙

रवीचे वाघही

कुठल्याही वादग्रस्त प्रश्नाला बगल कशी द्यावी हे रवी नाईक यांच्याकडून शिकावे. गोव्यात वाघ आहेत की नाहीत यावर राज्यात गरमागरम चर्चा चालू असताना काल सोमवारी कृषिमंत्री असलेले रवी नाईक यांना हाच प्रश्न विचारला असता तुम्ही हा प्रश्न वन खात्यालाच विचारा असे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. गोव्यात किती वाघ आहेत ते वन खात्यानेच मोजले असतील असे ते म्हणाले. पण, पत्रकार त्यांना याच प्रश्नावर खोदून खोदून विचारून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी रवीबाब नेहमीच्या मिश्किल शैलीत म्हणाले, मी एका विष्णू वाघ यांनाच ओळखत होतो. यावर पत्रकार तरी काय बोलतील? ∙∙∙

परिवर्तन झाले पण...

गत निवडणुकीत कुंकळ्ळी, केपे व काणकोण या तिन्ही मतदारसंघात परिवर्तन झाले; पण या मतदारसंघातून जात असलेल्या कुंकळ्ळी ते काणकोण या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ची समस्या सुटण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. कुंकळ्ळी बायपासचा प्रश्न तर गेली वीस वर्षे रखडलेला आहे, तीच गोष्ट काणकोण पर्यंतच्या रस्त्याची तेथील वाहतुकीत कित्येक पटींनी वाढ झाली; पण रस्ता तोच आहे. हीच तर खरी समस्या आहे. ∙∙∙

भाषिकवादाचा अतिरेक

उदगीर येथील 15 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना खास निमंत्रण दिल्यानंतर कोकणी मराठी भाषांमधील दुरावा नष्ट होईल व सलोख्याचे वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. पण, प्रत्यक्षात संमेलनाध्यक्षांनी जी मुक्ताफळे उधळली त्यामुळे पुन्हा स्थिती कितीतरी वर्षे मागे गेली आहे. तरी नशिब भाईंनी कमालीचा संयम पाळला. हे एकंदर चित्र पाहिले तर या लोकांना कोकणीची झालेली भरभराट पाहवत नाही की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. ∙∙∙

वाद पाण्याचा

चौथे महायुध्द पाण्यासाठी होईल असे सांगितले जाते नव्हे तर खुद्द जाणकारच तसे सांगतात. देशातील विविध राज्यातही पाण्यावरून विवाद सुरू आहेत व ते लोण आता गोव्यातील विविध भागात पोचले आहे. कुठ्ठाळीतील अपक्ष आमदारानेच त्याला वाचा फोडली आहे. कुठ्ठाळीला मंजूर झालेले पाणी वेर्णा औद्योगिक वसाहतीकडे वळविले जाते व त्यामुळे लोकांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते, असा आरोप ते करतात. नीलेशबाबांचे त्यावर काय म्हणणे ते अजून कळाळेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT