Sonali Phogat Case : सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी देशभरात चर्चेत असलेल्या हणजूण येथील किनारपट्टीवरील कर्लिस बीच शॅक क्लबवर अखेर आज शुक्रवारी सकाळी हातोडा पडला आहे. सकाळपासूनच या क्लबचं बांधकाम तोडण्याचं काम सुरु झालं. या क्लबचं बांधकाम पाडण्याचा आदेश 6 वर्षांपूर्वी गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) दिला होता. त्यावर आता राष्ट्रीय हरित लवादाने शिक्कामोर्तब करताना क्लबच्या मालकीण श्रीमती लिनेट नुनीस यांचे आव्हान फेटाळले आहे. फोगट मृत्यूप्रकरणी ड्रग्जचा वापर झाल्याचे समोर आल्यानंतर ‘कर्लिस’ला सील करण्यात आले होतं.
कर्लिस बीच शॅक क्लबच्या बांधकामासंदर्भात ‘गुगल मॅप’ने तपासणी करण्यात आली होती. तपासणीनुसार तेथे 2003 पूर्वी सध्याचे बांधकाम नव्हते. त्यामुळे ही बांधकामे नव्याने करण्यात आलीत. या क्लबचा विस्तार झाल्याने ही बांधकामे 1991 पूर्वीची असल्याचा या तपासणीवेळी कुठेच उल्लेख नाही. 1991 पूर्वीपासून हा क्लब सुरू असल्यास त्यासाठी आवश्यक असलेले मद्य, व्यापार परवाना पंचायतीकडून घेण्यात आल्याचा पुरावा नाही. व्यावसायिक कर नोंदणी तसेच दुकाने व आस्थापने परवान्याचा दस्तावेज सादर करण्यात आलेला नाही. पाणी व वीज पुरवठ्यासंदर्भातचीही बिले मालकाकडे नाहीत. त्यामुळे हे बांधकाम 1991 पूर्वीपासूनचे असल्याचा काहीच पुरावे नाहीत, असे निरीक्षण लवादाने अर्ज फेटाळताना केले.
दरम्यान, 2004 मध्ये काशिनाथ शेट्ये यांनी केलेल्या तक्रारीनुसार हणजूण येथील सर्वे क्रमांक 42/10 बांधकाम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आले होते. मात्र, अर्जदार लिनेट नुनीस यांनी बांधकाम पाडलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने बांधकाम केल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्यावर पुनर्तपासणीचे आदेश जीसीझेडएमएला दिले. परंतु या तपासणीत तेथे 2008 मध्ये कोणतेच बांधकाम नसल्याचे आढळून आले होते. ‘कर्लिस’च्या मालकीण लिनेट नुनीस यांनी आव्हान दिलेल्या अर्जावरील सुनावणीवेळी काही तांत्रिक कारणावरून जीसीझेडएमएला बाजू मांडता आली नव्हती. त्यासाठी त्यांनी फेरसुनावणीसाठी 7 सप्टेंबर 2022 रोजी अर्ज केला होता. मात्र, यावर लवादासमोर 6 सप्टेंबरला सुनावणी झाली. त्यावेळी अर्जदारतर्फे बाजू मांडण्यात आली होती. लवादाचे न्यायमूर्तींनी जीसीझेडएमएने दिलेला बांधकाम मोडण्याचा निवाडा सर्व कायदेशीर प्रक्रिया पाळूनच दिला असून तो योग्य आहे. दुसऱ्यांदा जीसीझेडएमएने तपासणी केली तेव्हा अर्जदार अनुपस्थित राहिल्याची टिप्पणीही लवादाने केली आहे.
पहिल्यापासून वादाच्या भोवऱ्यात
२००८ साली ब्रिटन तरुणी स्कार्लेट हिचा मृतदेह कर्लिस शॅक समोरील किनारपट्टीवर अर्धनग्न अवस्थेत सापडला होता. तिला ‘कर्लिस’मध्ये काही स्थानिकांनी ड्रग्ज दिले होते व तिचा मृत्यू झाला होता. सोनाली फोगट मृत्यू प्रकरणामुळे या क्लबचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यानंतर क्लबच्या काही अंतरावर एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता व त्यामुळे खळबळ माजली होती. हा क्लब वादग्रस्त ठरण्याबरोबरच आता त्यावर येत्या काही दिवसांत बुलडोझर फिरणार आहे.
हरित लवाद काय म्हणाले?
योग्य प्रक्रिया करूनच जीसीझेडएमएने दिलेल्या बांधकाम पाडण्याच्या आदेशात राष्ट्रीय हरित लवाद हस्तक्षेप करू इच्छित नाही. सध्या जे बांधकाम उभे आहे, ते 1991 पूर्वीचे असल्याचे सिद्ध होत नाही. जुन्या बांधकामावर नव्याने बांधकाम करण्यात आले आहे व ते आवश्यक परवान्यासह करण्यात आलेले नाही असे लवादाने आदेशात म्हटले आहे.
एडविन अडचणीत
कर्लिस बीच शॅक क्लब हे सोनाली फोगट मृत्यूप्रकरणात अमलीपदार्थविरोधी गुन्ह्यावरून क्लबचा चालक एडविन नुनीस हा सध्या जामिनावर आहे. संशयित एडविन नुनीस हा ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असल्याचा हैदराबाद पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे या प्रकरणातून एडविनची बाहेर पडण्याची धडपड सुरू असतानाच ‘कर्लिस’ पाडण्याची नामुष्की त्यांच्यासमोर आली आहे.
‘जीसीझेडएमए’चा आदेश
‘कर्लिस’चे बांधकाम पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करण्याबरोबरच ते ना विकास क्षेत्र असलेल्या सीआरझेड-3 मध्ये केल्याची तक्रार जीसीझेडएमएकडे 2015 मध्ये दाखल झाली होती.
या तक्रारीनुसार केलेल्या तपासणीत हा क्लब बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढून जीसीझेडएमएने तो पाडण्याचा आदेश 21 जुलै 2016 रोजी दिला होता.
लिनेट नुनीस व एडविन नुनीस यांना या कर्लिस नाईट क्लब तसेच बार व रेस्टॉरंटमधील सर्व व्यवहार बंद करण्याचे निर्देश दिले होते.
क्लबचा मद्य परवाना मागे घेण्यात यावा, वीज कनेक्शन तोडावे, पाणी पुरवठा बंद करावे, हणजूण पंचायतीने व्यापार परवाना मागे घ्यावा असे आदेशात नमूद केले होते.
गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना या बांधकामाविरुद्ध 15 दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.