पणजी: गेल्या दोन वर्षांत देशी-विदेशी २५६ पर्यटकांबाबत गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून, अधिकाधिक प्रकरणे पर्यटकांच्या साहित्याच्या चोरीसंदर्भात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून स्पष्ट केले आहे.
आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. गेल्या दोन वर्षांत राज्यात आलेल्या किती देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्ह्यांच्या घटना घडलेल्या आहेत, सर्वाधिक गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि असे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कोणती काळजी घेत आहे, असे प्रश्न आमदार व्हिएगस यांनी विचारले होते.
आमदार व्हेन्झी यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या दोन वर्षांत २२५ देशी आणि ३१ विदेशी अशा २५६ पर्यटकांबाबत गुन्ह्यांच्या घटना घडल्या असून, त्यातील सर्वाधिक घटना फसवणुकीसंदर्भात असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अशा घटना रोखण्यासाठी सरकारने चोवीस तास १३६४ या क्रमांकाची गोवा पर्यटन हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. चोरी, छळ, वैद्यकीय, आपत्कालीन परिस्थिती आणि हरवलेल्या वस्तूंबाबत या सेवेद्वारे मदत मिळवता येते.
महिला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘पिंक फोर्स’ची स्थापना करण्यात आलेली आहे. समुद्रकिनारे, बसस्थानके, मंदिरे, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त ठेवण्यात येत आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व प्रमुख रेल्वे स्थानके आणि धावत्या रेल्वेंमध्येही चोवीस तास पोलिस गस्त ठेवली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.