Goa Police Constable Prathamesh Gawade Death Case
पणजी: पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल्सच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झाली. त्यावरील निर्णय शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आला आहे. संशयित प्रीती चव्हाण व तनिष्का चव्हाण या दोन्ही चुलत बहिणी पोलिस सेवेत प्रोबेशनवर आहेत. त्या मंगळवारपासून न्यायालयीन कोठडी आहेत. त्यांची पोलिस नोकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
प्रथमेश याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ काढून तो व्हायरल केला होता. त्यामध्ये त्याने प्रीती चव्हाण, तनिष्का चव्हाण व तिचा भाऊ आकाश चव्हाण या तिघांच्या सतावणुकीला व धमकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्याच्या आधारे सायबर पोलिस कक्षाने तक्रार दाखल करून गुन्हा नोंद केला. चौकशीअंती प्रीती व तनिष्का या दोघींना अटक करण्यात आली. तिसरा संशयित आकाश चव्हाण फरारी आहे.
सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. तसेच तिसरा संशयित आकाश चव्हाण हा अजूनही फरारी आहे. जामीन मिळाल्यास तपासकामात अडथळा येऊ शकतो. मयत गावडे याने व्हिडिओत केलेले आरोप गंभीर आहेत. संशयित आकाश याला अटक होईपर्यंत या दोघींना जामीन दिला जाऊ.
प्रथमेश गावडे याने व्हिडिओमध्ये केलेले आरोप खोटे आहेत. त्याची सतावणूक केली जात होती किंवा धमक्या दिल्या जात होत्या तर त्याने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल का केली नाही? प्रीती व त्याचे प्रेमसंबंध होते, मात्र काही कारणास्तव त्यांच्यात मतभेद झाल्याने त्याने प्रीतीला मारहाण केली होती. त्यामुळे तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाशी काहीच संबंध नाही. प्रीती व तनिष्का दोघीही पर्वरी येथे राहत असल्याने चौकशीसाठी त्या केव्हाही उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.