Waste Burning Issue Dainik Gomantak
गोवा

Waste Management: बायोडायजेस्टर उघड्यावर, कचरा जाळण्याचा घातक प्रकार; कचरा व्यवस्थापनाची पोलखोल

गोमन्तक डिजिटल टीम

Garbage collection center

पणजी: कुठ्ठाळी येथील कचरा संकलन केंद्रात कोणीही भेट दिली तर सर्वकाही आलबेल आहे, असे वाटू शकते. पण या कचरा संकलन केंद्रापासून काही मीटर अंतरावरच खरे चित्र दिसते. तेथे वर्गीकरण न केलेला कचरा साठवण्यात येतो. तेथे सरकारने पुरवलेले बायोडायजेस्टर उघड्यावर फेकले गेले असून त्यांना गंज लागला आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नच उद्‍भवू नये म्हणून उघड्यावरच तेथे कचरा जाळण्यात येतो.

कुठ्ठाळी येथे कचरा संकलन केंद्रात शेडभोवती रस्ता करण्यात आला आहे. तेथे छोट्या शेडमध्ये कामगा काम करत होते. त्या परिसरातील स्वच्छता पाहिल्यास कचरा प्रक्रीया केली जाते असे दिसून येत होते. प्लास्टीक कचऱ्याचे तुकडे करून त्याचे गठ्ठे बांधल्याचे दिसून आले. मात्र या केंद्रापासून काही मीटर अंतरावरच कुठ्ठाळीच्या कचरा व्यवस्थापनाची पोलखोल झाली.

तेथे कचरा उघड्यावर फेकला जात होता. कचरा जाळला जात होता. कोणी तपासणीसाठी आले तर स्वच्छ कचरा संकलन केंद्र दाखवायचे आणि प्रत्यक्षात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा जाळण्याचा मार्ग पत्करावा असा प्रकार कुठ्ठाळीत चालत असावा असा संशय तेथील कचरा समस्या पाहिल्यावर आल्याशिवाय राहिला नाही.

वेळ्ळी येथे कचरा प्रक्रीयेसाठी दिलेली यंत्रणा विनावापर पडून आहे. त्या कचरा संकलन केंद्रासमोर वाढलेले हिरवेगार गवत पाहिल्यास त्या कचरा संकलन केंद्राकडे कोणाचीच ये जा नसल्याचे दिसून येते. गावात कचरा संकलन होते की नाही याविषयी प्रश्न पडावा असेच वातावरण तेथे होते. कचरा संकलन केले तर त्याचे काय केले जाते याचाही प्रश्न आहे. कचरा संकलन केंद्रातील आणि त्याबाहेरील विनावापर यंत्रणा पाहिल्यास गोळा केला जाणारा कचरा कुठेतरी फेकली जात असावा अशी शंका घेण्यास जागा आहे.

वेळ्ळीहून मडगावला येताना वाटेत रस्त्याशेजारी फेकलेला कचरा दृष्टीस पडला. मडगावातून जाणाऱ्या महामार्गालगतचा कचरा कंत्राटदाराच्या कामगार महिला गोळा करताना दिसल्या. पुढे रुमडामळ दवर्ली येथे भयानक स्थिती होती. या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत अरुंद असा रस्ता आहे. दाटीवाटीने वस्ती असलेला हा भाग आहे.

मात्र कचरा संकलन केंद्र त्या परिसरात आहे हे दूरवरून जाणवणारा दर्पच सांगून जात होता. कचरा संकलन जवळ येत गेले तसे असह्य अशी दुर्गंधी वातावरणात भरून राहिल्याचे जाणवू लागले. नाक मुठीत धरून त्या परिसराची पाहणी केल्यावर कचरा व्यवस्थापनच कसे कचऱ्यात गेले आहे याचे दर्शन झाले.

साठवलेल्या कचऱ्याचा ढिग होऊ लागलेला होता. तेथे कुत्रे कचऱ्यात काही खाण्यासाठी मिळते का? हे पाहण्यासाठी कचरा उचकटत होते. कचऱ्यावर डल्ला मारण्यासाठी पक्षी घोंगावत होते. तेथे साचलेल्या पाण्यामुळे चिखल झाल्यामुळे चिखलाच्या खोलीचा अंदाज घेऊनच पाय ठेवावा लागत होता.

नजर फिरवावी तेथे कुजलेला कचरा दिसत होता. तेथे पाचेक मिनिटे थांबणेही असह्य व्हावे असे वातावरण होते. त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रीया केली जाते असे कोणी सांगितले तर तो मोठा विनोद ठरावा. कचरा संकलन केंद्राच्या शेडबाहेरच कचरा कुंड्याही कचऱ्यात फेकण्यात आल्या होत्या वरून दुर्लक्ष किती पातळीवर होत आहे हे लक्षात येते. कधीतरी प्लास्टीक कचऱ्याचे तुकडे करण्याचे काम तेथे चालत होते, त्या कचऱ्याचे बांधलेले गठ्ठे तेथे दृष्टीस पडले.

वीज निर्मिती कधी?

चिखलीत शिस्तबद्ध कचरा व्यवस्थापन चालत असल्याचे वातावरण होते. मात्र तेथील बायोडायजेस्टरमधून प्रक्रीया झालेला कचरा बाहेर येणारे तोंड बुजल्याची समस्या होती. ती आता दूर केल्यानंतर तो बायोडायजेस्टर सुरु केला जाणार आहे. त्याच्याच बाजूला दुसरा बायोडायजेस्टर बांधण्यात येत आहे. त्यापासून तयार होणाऱ्या वायूवर जनरेटर चालवून वीज निर्मिती करण्याची योजना आहे. ती वीज दोनशे मीटरवरील जॉगींग पार्कमध्ये वापरण्यात येणार होती. जनरेटर सुरु होण्याआधी एका मोठ्या फुग्यात तो वायू एकत्रित करावा लागतो. ते फुगे निपचितपणे जमिनीवर पडलेले आढळले. त्यामुळे चिखलीत कचऱ्यापासून वीज निर्मिती होते, हे तूर्त तरी दंतकथा वाटावी, अशीच स्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT