Goa Mine
Goa Mine Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: वाहनांना गंज, आर्थिक कुचंबणा, खाणपट्ट्यातील ट्रकचालकांची विदारक स्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mine राज्यातील खनिज खाणी सहा महिन्यांत सुरू होणार, अशी घोषणा सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी केली होती. पण प्रत्यक्षात निवडणूक होऊन वर्ष उलटले तरी खाणी सुरू झाल्या नसल्याने सावर्डे, कुडचडे व सांगे भागातील या व्यवसायावर अवलंबून असलेले लोक संतापले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले लोक खाणी कधी सुरू होणार, याकडे लक्ष देऊन आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी खाणी सहा महिन्यांत सुरू करू, असे आश्वासन दिले होते; पण त्यांचे हे आश्वासन हवेतच विरले आहे.

राज्य सरकारने काही ठिकाणी असलेल्या खनिज मालाचा ई-लिलाव केला असून गेल्या वर्षी काही प्रमाणात ट्रकना काम मिळाले होते; पण यावर्षी या भागात हवे तसे काम नसल्याने ट्रक असून नसल्यासारखे आहेत.

हे ट्रक रस्त्यावर आणण्यासाठी आता लाखो रुपये खर्च करावे लागणार असल्याने आम्ही ते तसेच ठेवल्याचे कनय नाईक यांनी सांगितले. आता मे महिना अर्ध्यावर येऊन ठेपला आहे.

जून महिन्यात पाऊस सुरू होणार असल्याने कामाची ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खाणी सुरू होणार याच आशेवर आम्ही जगत आहोत, असे प्रकाश गावस देसाई यांनी सांगितले. ट्रक बंद असल्याने व कामाचा दुसरा पर्याय नसल्याने आम्ही आमच्याकडे असलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते, ते सुद्धा आता राहिले नसल्याने उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न ट्रकमालकांना सतावत आहे.

पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी ट्रकमालकांना महिन्याकाठी आर्थिक साहाय्य दिले होते तसे प्रमोद सावंत यांनी अर्थसाहाय्य देऊ काही प्रमाणात दिलासा द्यावा, अशी मागणी देसाई यांनी केली.

लोकसभेवेळी दिसणार परिणाम

मर्यादित स्वरूपात का होईना, सुरू असलेली खनिज वाहतूक सावर्डे भागातील जेटीवर जात असून खामामळ-कुडचडे येथील जेटीवर खनिज वाहतूक होत नसल्याने ट्रकमालकांनी संताप व्यक्त केला आहे.

सावर्डे भागात कुडचडे येथील ट्रक चालवण्यास बंदी असल्याने कुडचडेतील ट्रक ठप्प आहेत. याविषयी आमदार काब्राल यांच्यासोबत कुडचडेतील ट्रकमालकांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली होती; पण यातून काहीच निष्पन्न न झाल्याने ट्रकमालक चिंतेत सापडले आहेत. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत निश्चित दिसून येईल, असे ट्रकमालकांनी सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांचे ट्रक बंद असल्याने त्यांना गंज चढला असून हे ट्रक दुरुस्त करण्यासाठी आता लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. याविषयी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.

- किरण गावकर, ट्रकमालक, कुडचडे.

रस्ते खोदल्याने वाहतूक ठप्प : सध्या काही प्रमाणात खनिज वाहतूक सुरू केली होती; पण माड-बाणसाय ते कुडचडे ओव्हर ब्रीजपर्यंत रस्ता खोदून ठेवल्याने खनिज वाहतूक मर्यादित केल्याने याचे परिणाम ट्रकमालकांना भोगावे लागत आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून सुरू केलेले हे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने वाहतूक वारंवार खोळंबले. याचा खनिज वाहतुकीवर परिणाम झाल्याने ट्रकमालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

Santa Cruz Panchayat: सांताक्रुझ पंचायत सत्ता सारीपाटावर; ‘विरोधी’ सोंगट्यांना कोटींचे लालूच?

Calangute ODP: कळंगुट ओडीपी खटला लांबणीवर; सुनावणीसाठी तयार नसल्याने सरकारवर ओढावली नामुष्की

SCROLL FOR NEXT