Calangute Shivaji Maharaj Stachu Dainik Gomantak
गोवा

Calangute Shivaji Maharaj Stachu: कळंगुटमधील 'तो' वाद काही शमेना, अद्यापही आरोप प्रत्यारोप सुरूच

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद शमण्याची सध्यातरी कोणतीच शक्यता दिसत नाही. याप्रकरणी आता घूमजाव करत कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण माफी मागितली होती असा दावा केला आहे, तर सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी केलेले दावे-प्रतिदावे धादांत खोटे असल्याचे शिवस्वराज्य संस्थेने म्हटले आहे. मुळात कळंगुटवासीयांना विश्वासात घेऊनच आम्ही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्याचा दावा शिवस्वराज्य कळंगुट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मंगळवार २० जून रोजी कळंगुट पंचायत कार्यालयाबाहेर शिवपुतळ्यावरून तणाव व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि ही स्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये व पंचायत कार्यालयात हजर असलेले पंच सदस्य, कर्मचारी तसेच उपस्थित पोलिसांना जमावाकडून कुठलीही इजा पोहोचू नये यासाठीच मी घटनास्थळी माफी मागितली होती. माझी ती दिलगिरी मनापासून नव्हती, असे कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.

मुळात मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात नाही, परंतु शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेने हा पुतळा रातोरात काळोखाच्या अंधारात सहा तासांत उभारला आणि तोही रस्त्याच्या मधोमध. त्यामुळे संस्थेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. पंचायतराज कायद्यानुसार कुणीही परवानगीशिवाय रस्त्याच्या मधोमध काहीही उभारू शकत नाही. हा प्रकार पंचायत कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे. पंचायत मंडळाच्या ठरावाला आक्षेप होता, तर शिवस्वराज्य संस्थेने बीडीओ किंवा पंचायत संचालकांकडे दाद मागायला हवी होती, असेही जोसेफ सिक्वेरा म्हणाले.

तो ठराव मागे घेणार नाही : सिक्वेरा

कळंगुट पंचायत मंडळाची सोमवारी बैठक झाली. यावेळी शिवपुतळा हटविण्याबाबतच्या ठरावाविषयी पुढे काय करावे यासाठी कायदेशीर मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार हा ठराव कायदा पथकाकडे पाठविला आहे. कारण, मी एकटा परस्पर शिवरायांचा पुतळा हटविण्याचा आदेश मागे घेऊ शकत नाही. हा ठराव पंचायत मंडळाचा होता, असे कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी म्हटले आहे.

सरपंचांनी अहंकार दूर ठेवावा : मयेकर

सरपंच जोसेफ सिक्वेरांच्या माफी नाम्यासंदर्भात सुदेश मयेकर म्हणाले, की इंग्रजीमध्ये ‘अपॉलॉजी’ व ‘सॉरी’ या शब्दांचा नेमका काय अर्थ होतो हे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे सिक्वेरा यांनी आपणास हवे ते अर्थ काढू नयेत. शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करू नये. मुळात सिक्वेरांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रशासन कसे चालवायचे असते याचा आदर्श घ्यावा. ज्या ठिकाणी सरपंच आपण शिवप्रेमींना किल्ला उभारून देऊ असे सांगत होते, ती जागा मागील २५ वर्षे न्यायप्रविष्ट आहे. या जागेसंदर्भात भाटकार-मुंडकार यांच्यात खटला सुरू आहे.

जोसेफ सिक्वेरा शिवप्रेमींची करताहेत दिशाभूल

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा हे शिवपुतळ्यावरून सध्या लोकांची व शिवप्रेमींची दिशाभूल करीत आहेत. मुळात सरपंचांनी शिवप्रेमींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि आपण किल्ला उभारण्याचा प्रस्ताव शिवस्वराज्य संस्थेसमोर मांडला होता असे जे ते आता सांगत आहेत, ते धादांत खोटे आहे. ते खोटारडे लोकप्रतिनिधी आहेत, असा आरोप शिवस्वराज्य कळंगुट संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांनी केला. कळंगुटमधील शिवपुतळ्याच्या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी पंच सदस्य सुदेश मयेकर, प्रज्योत कळंगुटकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT