पणजी : राज्यातील कचरा उचल करणारे खासगी कंत्राटदार निर्जनस्थळी कचरा फेकून पसार होतात, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. हॉटेल्स व उद्योगांचा कचरा उचल करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना आता घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अंतर्गत आणण्यात येईल.
कुठ्ठाळ्ळी मतदारसंघात कचरावाहू ट्रकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या कंत्राटदाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्या ट्रकांचा परवानाही रद्द करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी विधानसभेत आज दिले.
कुठ्ठाळ्ळी कोमुनिदादच्या जागेत बेकायदेशीरपणे रात्रीच्यावेळी कचरा टाकला जात असताना ट्रकचालकाला स्थानिकांनी रंगेहाथ पकडले होते. मात्र, त्याविरुद्ध ठोस कारवाई झाली नाही, असा प्रश्न कुठ्ठाळ्ळीचे आमदार आंतोन वाझ यांनी उपस्थित केला होता.
त्याला उत्तर देताना कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले की, कायदेशीर कारवाई झाली आहे. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक होऊन त्याची जामिनावर सुटका झाली आहे, तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेला कचरावाहू ट्रक न्यायालयाने परत केला आहे. कंत्राटदाराची सुरक्षित ठेव रक्कम ४ लाख रुपये आहे, ती जप्त करण्यात आली आहे.
कुठ्ठाळ्ळी कोमुनिदादच्या जागेत जो बेकायदेशीरपणे कचरा टाकण्यात आलेला आहे. कचरा उचल करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार आंतोन वाझ यांनी केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत म्हणाले की, पंचायत क्षेत्राबाहेरील कचरा टाकण्यात आला आहे. जेव्हा त्या कचऱ्याची तपासणी केली होती तेव्हा पंचायतीने या कचऱ्यातील प्लास्टिक वेगळे करण्यात येईल, असे सांगितले होते.
कचरा उचल करण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला देण्यात आले होते त्यानेच तो उचलायला हवा. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळण्यासाठी राज्यातील खासगी कंत्राटदारांची नोंद ही गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे होणे गरजेचे आहे. त्यामुळे या महामंडळाला कारवाई करणे सोपे होईल व त्यांच्यावर वचकही बसेल.
हॉटेल्स, उद्योग तसेच पंचायतीकडे नोंद असलेल्या कचरा उचल करणाऱ्या कंत्राटदारांना त्यांची नोंदणी महामंडळाकडे सक्तीची केली जाईल. बांधकाम तसेच बांधकाम पाडलेल्या कचऱ्यासाठीची साधनसुविधा येत्या तीन महिन्यांत उभी केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.