पणजी: राज्यातील कदंब बससस्थानकांची स्थिती फारच बिकट आहे. ‘स्मार्ट सिटी’ पणजीतील कदंब बसस्थानकाची स्थिती तर दयनीय आहे. त्यामुळे वाहतूकमंत्री तसेच त्या-त्या आमदारांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, असा सल्ला सत्ताधारी पक्षाचे आमदार मायकल लोबो यांनी दिला. सार्वजनिक खासगी भागिदारीतून (पीपीपी) या बसस्थानकांची सुधारणा करावी, असेही ते म्हणाले.
मागण्या, कपात सूचनांना पाठिंबा आणि विरोध या अधिवेशनात दुपारनंतरच्या सत्रात लोबो बोलत होते. ते म्हणाले, अपघातांत गोवा हे एक क्रमांकाचे राज्य बनले आहे. अपघात रोखण्यासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत, हे सांगावे. त्यावेळी आम्ही वाहतूक खात्याला एक पत्र लिहिले होते.
राज्यातील रस्त्यांवर जे दिशादर्शक फलक हवे आहेत, तेच नसल्याचे दिसते. याविषयी सार्वजनिक बांधकाम खाते (साबांखा) वाहतूक खात्याकडे बोट दाखवते, वाहतूक खाते ट्रॅफिक सेलकडे बोट दाखविते आणि ट्रॅफिक सेल साबांखाकडे बोट दाखवते. त्यामुळे दिशादर्शक फलक उभारायचे कोणी, हा प्रश्न उपस्थित होतो.
आपण लिहिलेल्या पत्रानंतर वाहतूक खात्याचे साहाय्यक उपसंचालक वाझ यांच्याशी चर्चा झाली. केलेल्या सूचनेनुसार त्यांनी सर्व पंचायती, नगरपालिकांना दिशादर्शक फलक उभारावेत, असे निर्देश दिले. राज्यातील अपघातांची संख्या का वाढली, ते तपासण्यासाठी समिती नेमावी म्हणून आपण मागील अधिवेशनात सांगितले होते.
अजूनही ती समिती नेमलेली नाही. म्हापशातील छोटे बसस्थानक बरे, पण आंतररराज्य बसस्थानकाची स्थिती पणजी बसस्थानकासारखीच आहे. पणजी, मडगाव, वास्को व फोंडा बसस्थानकांची स्थिती मंत्र्यांनी आवर्जून पाहावी, असेही लोबो म्हणाले.
मायकल लोबो यांनी बायंगिणी कचरा प्रकल्प आपल्या पर्रा येथील घराकडे उभारावा, असा टोला कुंभारजुवे आमदार राजेश फळदेसाई यांनी लगावला. या प्रकल्पावर काल कचराव्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे गुणगान गाणाऱ्या फळदेसाई यांनी आज लोबोंना लक्ष्य केले. लोबो जसे आपल्या मतदारसंघातील टॅक्सीचालकांचा प्रश्न गांभीर्याने घेतात, तसेच मला माझ्या मतदारसंघातील लोकांचे हित पाहणे गरजेचे आहे. लोबोंना कचरा प्रकल्प हवाच असेल तर त्यांनी तो आपल्या घराकडे उभारावा.
लक्झरी बसेस नोंदविण्यासाठीचे शुल्क कमी केल्यामुळे गोव्यात लक्झरी वाहने घेणाऱ्या व्यावसायिकांनी परराज्यात जाऊन नोंदणी करणे बंद केले आहे, त्याबद्दल मंत्र्यांचे अभिनंदन करतो, असा उपरोधिक टोला लगावत लोबो म्हणाले, राज्यातील टॅक्सीचालकांच्या विषयावर गेली चार वर्षांपासून चर्चा सुरू आहे. एक मंत्री गोवा टॅक्सी ॲप तर दुसरा मंत्री गोवा माईल्सला प्रोत्साहन देत आहे. मध्येच ‘गोंयचो पात्रांव’ ही योजना आणली आणि त्यात श्रीमंतांनी कार खरेदी करून त्या योजनेत घातल्या. राज्यात २० हजार टॅक्सीचालक आहेत. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटेल अशी आशा आहे, असेही लोबो म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.