कळंगुट: हणजूण कोमुनिदादच्या मालकीची मुड्डेर-हणजूण येथील लाखो चौरस मीटर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे संशयितांनी लाटल्याचा गंभीर आरोप कोमुनिदादचे अध्यक्ष रॉय डिसोझा यांनी केला आहे.
शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, शिवशंकर मयेकर, यशवंत सावंत तसेच पार्सेकर आडनावाच्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात जमीन बळकावली असून, याप्रकरणी कोमुनिदादने सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे तक्रार दाखल केली आहे. सरकारने कायदेशीर कारवाई करून जमीन पुन्हा कोमुनिदादच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी यावेळी केली.
डिसोझा यांनी सांगितले की, वर्ष २०१६ मध्ये हणजूण कोमुनिदादच्या सर्व्हे क्र. ४३६/१ मधील तब्बल ३३ हजार ३२६ चौरस मीटर जमीन पार्सेकर नावाच्या स्थानिकाने बेकायदा बळकावली होती. त्यानंतर सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात असलेल्या शिवशंकर मयेकर यांच्याकडून हीच जमीन खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. याशिवाय सर्व्हे क्र. ४९६/१ मधील तब्बल दोन लाख चौरस मीटर जागादेखील बनावट दस्तऐवजांच्या आधारे मयेकर याने बळकावल्याचा दावा केला आहे.
२०१६ पासून सुरू असलेल्या या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात पार्सेकर, यशवंत सावंत, मीनाक्षी सावंत, परप्रांतीय रविंद्र सिंह, सत्यवती सिंह, योगिंदर सिंह, सुजाता फोगट यांची नावे समोर आली आहेत. याबाबत ‘एसआयटी’कडे तक्रारी दाखल असून, चौकशी सुरू आहे. सध्या मयेकर याला ईडीने ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणामागे राजकीय पाठबळ असल्याचा आरोप डिसोझा यांनी करून दोषींना गजाआड करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
हणजूण कोमुनिदादच्या शेतजमिनी शेती करण्याच्या बहाण्याने स्थानिकांनी आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. त्या जमिनींचा गैरवापर व्यावसायिक कारणांसाठी चालवला असल्याचा आरोप कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्या जमिनी कायदेशीर मार्गाने पुन्हा ताब्यात घेण्यासाठी स्थानिक कोमुनिदाद प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार दिलायला लोबो यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी आज आसगाव तसेच हणजूण कोमुनिदादच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करते. त्यांनी अंतिम न्याय मिळेपर्यंत एकजुटीने राहावे. जमीन घोटाळा प्रकरणात कुणीही दोषी असो, न्याय झालाच पाहिजे. आमच्या जमिनी म्हणजेच आमचा वारसा असून त्यांचे रक्षण करणे हे सर्व गोवेकरांचे कर्तव्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.