Goa Politics: अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी गुरुवारी खास विमानाने मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि भाजपचे पदाधिकारी जाणार आहेत. रेल्वेने दोन दिवसांपूर्वी वास्कोहून अयोध्येला रवाना झालेले 1,300भाजप कार्यकर्ते आणि भाविक बुधवारी रात्री अयोध्येला पोचले.
मोपा विमानतळावरून सकाळी 8 वाजता हे विमान 40 जणांना घेऊन अयोध्येकडे झेपावणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह काही आमदार सपत्नीक या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. आमदार आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारीही रवाना होणार आहेत.
एका धार्मिक कार्यक्रमामुळे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि एक दिवसाचा धावपळीचा दौरा असल्याने प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत.
पंतप्रधान कार्यालयाकडून 15 फेब्रुवारी ही तारीख गोव्यातील मंत्रिमंडळाच्या रामलल्ला दर्शनासाठी निश्चित केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयातून या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी प्रतिमाणसी २४ ते २५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याआधी भाजपने १,३०० रामभक्तांना अयोध्येला पाठवण्यासाठी काही आर्थिक भार उचलला आहे.
आठवडाभराच्या या दौऱ्यासाठी प्रत्येकाकडून दीड ते २ हजार रुपयेच आकारले आहेत. हे भाविक आणि विमानाने तेथे पोचणारे सारेजण सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत श्री रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
सावंत तीन दिवस दिल्लीत
आदिवासींना राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीचा पाठपुरावा कऱण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शुक्रवारी केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांची शिष्टमंडळासह भेट घेणार आहेत.
शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा दिल्लीत असल्यास त्यांचीही ते भेट घेतील. अयोध्येहून मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन १७ व १८ रोजी दिल्लीत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.