मोफत तीर्थयात्रा आमदारांच्या पथ्यावर जीवनात एकदा तरी तीर्थयात्रा करावी अशी प्रत्येक धार्मिक, आस्तिक माणसाची इच्छा असते. पूर्वीच्या काळी सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर, आपल्या मुलाबाळांचा संसार बसवून झाल्यावर लोक म्हातारपणी तीर्थाटन करायचे. अलीकडे आपल्या राज्य सरकारने पन्नाशी ओलांडलेल्या धार्मिक नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रेची सोय उपलब्ध करून दिली आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन अनेक लोक आता अयोध्यानगरीत रामाच्या दर्शनासाठी जाण्याची तयारी करत आहेत. ज्यांना अयोध्येत मोफत जायचे आहे, ते आमदारांच्या घरी गर्दी करताना दिसतात. आता आमदारांच्या शिफारशीनुसार तीर्थाटन करण्याची संधी मिळते याचा अर्थ अयोध्या दर्शन घेतलेले मतदार निवडणुकीत आपल्या आमदारांना नक्कीच विसरणार नाहीत. तसे तीर्थाटन आपल्या स्वतःच्या कमाईतून केले तर पुण्य पदरात पडते असे म्हटले जाते. मात्र या तीर्थयात्रेचा फायदा सत्ताधारी आमदारांना होणार आहे ना! ∙∙∙
चिंबलचा ‘पारा’ उकळतोय! ‘तोयार’ तळे परिसरात युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे दोन्ही सरकारी प्रकल्प नकोच, यावर चिंबलवासीय ठाम आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी दोन वेळा चर्चा केली. तोयार तळे पाहणीची, प्रभावक्षेत्र सीमांकनाची मागणी मान्य केल्याने आंदोलक माघार घेतील अशी सरकारी यंत्रणेची अपेक्षा होती. मात्र चिंबलवासीयांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढतच चालली आहे. शनिवारी गवळेभाट परिसरात कोपरा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला झालेली गर्दी पाहता ती कोपरा बैठक नव्हे तर जाहीर सभाच वाटली. यावरून चिंबल आतून किती धगधगत आहे याची कल्पना येते. ∙∙∙
दामूची बापूला क्लीन चिट! मडगाव नगरपालिकेचे सोपो प्रकरण सध्या खूपच गाजत आहे. नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांनी मीडिया ब्रीफिंग करून, ‘सोपो ठेका प्रक्रिया कायदेशीर सोपस्कार पार पाडूनच केली आहे व सर्व व्यवहार पारदर्शक आहेत’ असे सांगितले. एका बाजूने त्यांनी बापूला क्लीन चिट देऊन टाकली. मडगावचे व्यापारी मात्र आपल्याकडून अव्वाच्या सव्वा सोपो वसूल केला जात असल्याचे सांगतात. आता ते सरसकट खोटे बोलतात, असे तर दामूंना म्हणायचे नाही ना? आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, हे त्यांना माहीत नाही असे नाही. कुणाच्या तरी दबावाखाली येऊन दामू हे बापूची पाठराखण तर करत नाही ना? ∙∙∙
योगाभ्यासाचा परिणाम होणार? भारताचा वारसा असलेला ‘योग’ जगभर झाला आहे. मनाला शांती देणारा, आळस झटकणारा, शरीर बळकट करणारा योग घराघरांत पोहोचावा यासाठी केंद्र सरकार आणि भाजपशासित सरकारे नेहमीच प्रयत्नशील आहेत. गोवाही त्यात मागे नाही. राज्यातील आयएएस, आयपीएस, सनदी अधिकारी आणि पोलिसांना राज्य सरकारने शनिवारी (२४ जानेवारी) भल्या पहाटे पणजीत योगगुरु रामदेवबाबा यांच्याकडून योगाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण सत्राला अनेक अधिकाऱ्यांनी हजेरीही लावली. आता त्यातील किती जण एका दिवसाच्या योगाभ्यासाद्वारे स्वत:मध्ये सुधारणा करतात, हे लवकरच कळेल. ∙∙∙
महापौरांबरोबर ‘ते’ दिसेनात! रोहित मोन्सेरात पणजीचे महापौर झाल्यापासून त्यांच्याबरोबर सतत जिकडे-तिकडे दिसणारे उपमहापौर संजीव नाईक हे सध्या त्यांच्याबरोबर दिसत नाहीयत. पणजीतील मळा परिसरात काही दिवसांपूर्वी महापौर एकटेच गेल्याने तेथील भाजप गट व बाबूश समर्थकांमध्येही त्याबाबत चर्चा सुरू झाली. सध्या ते दुचाकीवरून इकडे-तिकडे फिरताना तसेच सांतिनेजमधील नगरसेवकाबरोबर अधिक दिसतात. आता महानगरपालिकेची निवडणूक काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच संजीव नाईक यांची उमेदवारी पक्की करायची की नाही, हे सर्वस्वी बाबूश मोन्सेरात यांच्या हातात आहे. प्रभाग २५ मध्ये नाईक यांची मजबूत पकड असल्याने तेच उमेदवार असतील, असे तरी सध्या दिसत आहे. पण महापौरांचा अडथळा नसेल तर! ∙∙∙
जेनिफरची अनुपस्थिती जाणवली सध्या सगळीकडे हळदीकुंकू कार्यक्रमांचे पीक आलेले आहे. महिला आपापल्या घरी हा कार्यक्रम करतात आणि अन्य महिलांना वाण (भेटवस्तू) देतात. ताळगाव महिला मोर्चाच्या वतीने जुन्या पंचायतीच्या हॉलमध्ये हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला. त्यासाठी ताळगाव मतदारसंघातील महिलांची मोठी उपस्थिती होती. माजी जिल्हा पंचायत सदस्या, पंचायतीच्या माजी सदस्यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. मात्र, आमदार जेनिफर मोन्सेरात यांचेही सहकार्य लाभले. गेल्या वर्षी त्यांनी कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतला होता. मात्र प्रकृती ठीक नसल्याने यंदा जेनिफर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्यावरील प्रेमापोटी ताळगावातून आलेल्या महिलांची संख्या काही कमी नव्हती. जेनिफरना लवकर बरे वाटावे, यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थनाही केली. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.