पणजी: चिंबल येथील तोयार तळे परिसरातील प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे दोन्ही वादग्रस्त प्रकल्प इतरत्र हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. चिंबलवासीयांच्या चिवट लढ्याला अखेर बुधवारी (28 जानेवारी) रात्री साडेदहा वाजता यश मिळाले. आंदोलनाचा हा बत्तिसावा दिवस होता.
‘ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन प्रस्तावित दोन्ही प्रकल्प अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे पत्रक रात्री उशिरा पर्यटन खात्याने जारी केले. त्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही दुजोरा दिला आहे. तोयार तळे परिसरात हे प्रकल्प नकोच अशी ग्रामस्थांची भूमिका होती. त्याआधी त्या परिसरात आयटी पार्क प्रकल्प नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळीही ग्रामस्थांच्या विरोधामुळे तो प्रकल्प रद्द करावा लागला होता.
अचूक सर्वेक्षण; उच्च क्षमतेच्या ड्रोनचा वापर
१ या सर्वसमावेशक सर्वेक्षणादरम्यान ग्रामस्थांच्या सूचनांनुसार कॅचमेंट क्षेत्र, निचरा वाहिन्या, पृष्ठभागावरील व भूमिगत जलप्रवाह, वनस्पती आच्छादन, शेतकऱ्यांची (Farmers) शेती व पाण्याचे झरे यांचे सखोल ग्राउंड ट्रुथिंग करण्यात आले.
२ सर्वेक्षण पथकाने कॅचमेंट क्षेत्राच्या संपूर्ण सीमारेषेवरून प्रत्यक्ष पाहणी करत पाण्याचे स्रोत, निचरा रेषा नोंदवल्या तसेच ग्रामस्थांनी दाखविलेल्या प्रत्येक ठिकाणाची तपासणी केली.
३ तलावात येणाऱ्या विविध पाण्याच्या प्रवेशबिंदूंसह उच्च जलरेषा, निम्न जलरेषा व तलावाचा मातीचा बांध यांचे मॅपिंग करण्यात आले.
4 प्रत्यक्ष मोजमापाबरोबरच जमिनीच्या भूप्रकृतीचा अचूक अभ्यास करण्यासाठी उच्च क्षमतेच्या ड्रोनचा वापर करण्यात आला.
आंदोलनस्थळी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. त्यानंतरही उपोषण करण्यावर ग्रामस्थ ठाम होते. चिंबल ग्रामस्थांनी २१ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर, तोयार तलावाची आर्द्रभूमी व प्रभाव क्षेत्राचे सखोल मॅपिंग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार २३ जानेवारीपासून सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. या प्रक्रियेत ग्रामस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे तज्ज्ञ सदस्य, वकील, जलतज्ज्ञ, वास्तुविशारद यांच्यासह एनआयओ, आर्द्रभूमी प्राधिकरणाचे तज्ज्ञ सदस्य, भू सर्वेक्षण खाते व पर्यटन खात्याचे अधिकारी सहभागी झाले होते. हे सर्वेक्षण काल २८ जानेवारी रोजी पूर्ण झाले.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सविस्तर नकाशांसह मसुदा अहवाल ग्रामस्थ व त्यांच्या वकिलांना सादर करण्यात आला. या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की युनिटी मॉल व प्रशासन स्तंभासाठी प्रस्तावित जागा ही तोयार आर्द्रभूमीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर आहे. ग्रामस्थांनी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी मॅप केलेल्या कॅचमेंट क्षेत्राबाहेरही आहे. तथापि, सदर प्रकल्पस्थळ राष्ट्रीय महामार्गालगतच्या वसाहती क्षेत्रात असले तरी ग्रामस्थांच्या भावना व संवेदनशीलतेचा विचार करून दोन्ही शासकीय प्रकल्पांचे स्थान अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पर्यटन खात्याने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.