Chimbel Protest
Chimbel ProtestDainik Gomantak

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलवरून वाद पेटला! चिंबल ग्रामस्थांची आक्रमक भूमिका; सर्वेक्षण ढकलले पुढे

Chimbel Protest: युनिटी मॉल ज्या सर्वे क्रमांकात आहे, त्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) अधिकाऱ्यांशी चिंबल ग्रामस्थांचा वाद झाला.
Published on

पणजी: युनिटी मॉल ज्या सर्वे क्रमांकात आहे, त्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) अधिकाऱ्यांशी चिंबल ग्रामस्थांचा वाद झाला. परिणामी अधिकाऱ्यांना सर्वेक्षण एक दिवस पुढे ढकलावे लागले.

तोयार तळ्याभोवती असलेल्या सर्व सर्वे क्रमांकांच्या जागांचे सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने अधिकाऱ्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले. कदंब पठारावरील चिंबल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आणि तोयार तळ्यापासून काही अंतरावर सरकारच्या वतीने युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ उभारण्याचे घाटले जात आहे.

या प्रकल्पांविरोधात चिंबलवासीयांचे २६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सरकारने दिलेले प्रस्ताव उपोषणकर्त्यांनी फेटाळले आहेत. बुधवारी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महालक्ष्मी बंगल्यात घेतलेल्या बैठकीत तोयार तळ्याच्या प्रभाव क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, युनिटी मॉल रद्द करण्याची तयारी नसल्याने सरकारकडून दोन्ही प्रकल्पांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे आज जलस्रोत खात्याचे माजी मुख्य अभियंता तथा ‘जीटीडीसी’चे सल्लागार आणि इतर अधिकारी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षणासाठी आज सकाळी दहाच्या सुमारास प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवर पोहोचले. या अधिकाऱ्यांनी फक्त सर्वे क्र. ४०/१चे सर्वेक्षण करण्यास सुरवात केली.

Chimbel Protest
Chimbel Unity Mall: युनिटी मॉलचे काय होणार? संपूर्ण राज्याचे लक्ष चिंबलकडे; लढ्यासाठी ग्रामस्थ सज्ज

त्याला ग्रामस्थांनी तात्काळ हरकत घेतली. तोयार तळे हे या सर्वे क्रमांकात नाही. ते दुसऱ्या सर्वे क्रमांकात येते. केवळ एकाच सर्वे क्रमांकाचे सर्वेक्षण केले जाऊ नये. ज्या सर्वे क्रमांकात तळे येते, तसेच त्यासभोवताली असलेल्या सर्व सर्वे क्रमांकाच्या जागांचे सर्वेक्षण केले जावे, अशी बाजू उपोषणकर्त्यांच्या वतीने ॲड. मेलिसा सिमोईस यांनी मांडली. त्याचबरोबर ज्या सर्वे क्रमांकात तळ्याचा संपूर्ण भाग येतो, त्या जागांच्या सर्वेक्षणाविषयी अधिसूचना काढली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Chimbel Protest
Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

ड्रोनद्वारे सर्वेक्षण

‘जीटीडीसी’चा सल्लागार प्रमोद बदामी यांनी सांगितले की, सध्या पाणथळ जमिनीचे संपूर्ण सर्वेक्षण केले जात आहे. ड्रोनच्या साहाय्याने, गुगल मॅपकरवी हे सर्वेक्षण केले जाईल. उपोषणकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर तोयार तळे क्षेत्राचे शनिवारी सर्वेक्षण सुरू होईल. या सर्वेक्षणास चार दिवस लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com