CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत झालेत सावध

मुख्यमंत्री म्हटल्यावर सहज विजय हाशिल होणार असा आडाखा प्रमोद सावंत यांनी बांधला होता.

दैनिक गोमन्तक

गोवा: साखळी मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत बरेच सावध झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणुकीत बिनधास्त राहिलो. पण, विजयासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागली, याचे शल्य प्रमोद सावंत यांना लागून राहिले आहे. मुख्यमंत्री म्हटल्यावर सहज विजय हाशिल होणार असा आडाखा प्रमोद सावंत यांनी बांधला होता. बरीच विकासकामेही साखळी मतदारसंघात केली, पण काॅंग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने मतदारांना आपल्या बाजून खेचण्यात यस मिळवले होते. त्यामुळे सावंत यांना काही ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ प्रमोद सावंतच नव्हे तर त्यांचे वडील माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनाही हे शल्य लागून राहिले आहे, त्यामुळेच तर त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना देवाची कृपा म्हणून आपला पुत्र विजयी झाला, असे म्हटले आहे. ∙∙∙

त्यांच्या हाती फक्त 500 रुपये

हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्यावेळी ज्यांची मतमोजणी करण्याचे कर्मचारी म्हणून नेमणूक केली होती त्यांची अवस्था सध्या ‘आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या’ अशी झाली आहे. याचे कारण म्हणजे या कर्मचाऱ्यांना सुरवातीला या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतःच्या खर्चाने मध्यवर्ती ठिकाणी दोन वेळा बोलावून घेण्यात आले. मतमोजणीच्या दिवशीही ते स्वतःच्याच खर्चाने केंद्रावर आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना तालुक्याच्या मामलेदार कार्यालयात मानधन घेण्यासाठी बोलावण्यात आले त्यावेळी त्यांना खरे तर धक्काच बसला. याचे कारण म्हणजे त्यांना मानधन म्हणून फक्त ५०० रुपये हातावर टेकविले गेले. चार चार वेळा कामाच्या ठिकाणी बोलावून शेवटी मानधन म्हणून फक्त ५०० रुपये दिले गेले ते पाहून ‘ते तरी कशाला दिले’, अशी कित्येकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ∙∙∙

तयारी पंचायत निवडणुकीची

मे महिना अखेरीस होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केलेला भाजप त्यात आघाडीवर आहे तर विरोधी काँग्रेसवाले अजून पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीत. यावेळी दोन्ही प्रमुख पक्षांसमोर पंचायत पातळीवर आरजीचे जबर आव्हान राहिल अशी चिन्हे दिसत आहेत. त्यांचा जरी एकच आमदार निवडून आलेला असला तरी अन्यत्र त्या पक्षाला जी मते मिळाली ती त्यांचा हुरुप वाढविणारी ठरली आहेत. दुसरीकडे मगो व तृणमूल पंचायत निवडणूक गांभीर्याने घेईल, असे दिसत नाही. ∙∙∙

एसजीपीडीएबाबत उत्सुकता

सरकारांत कोणाकोणाचा समावेश होणार ते बहुतेक स्पष्ट झाले आहे व त्यामुळे पीडीए व विशेष करून एसजीपीडीए कुणाकडे जाणार याबाबत विशेष करून मडगावात उत्सुकता आहे. सुरवातीचा काळ सोडला तर नियोजन व विकास क्षेत्रांत महत्त्वाच्या असलेल्या या संस्थेवर सतत राजकीय नियुक्त्याच झालेल्या आहेत. त्यामुळे यावेळी अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्ता भाजपची आहे व मडगाव तसेच फोंडा पालिका क्षेत्र या प्राधिकरणाच्या कक्षेत येत असल्याने त्या क्षेत्रातील सत्ताधारी आमदार नियुक्त होऊ शकतो, असा तर्क केला जात आहे. ∙∙∙

रेजिनाल्ड फॉर्मात

कुडतरी मतदारसंघातून चौथ्यांदा जिंकून आलेले कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने ते नक्कीच खुश आहेत. त्यांना यावेळी काँग्रेस पक्षाशी प्रतारणा केल्याने काँग्रेसने तिकीट नाकारली आणि सध्याच्या बदललेल्या राजकिय परिस्थितीत काँग्रेसचा हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला असे म्हणावे लागेल. आपण मंत्री होणार ह्या चाहुलीनेच रेजिनाल्ड हुरळून गेले असावेत. कारण शुक्रवारी त्यांनी सोनसोडो येथील कामाची पाहणी तर केलीच. शिवाय ज्या ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होते तिथे त्यांनी चक्क मशिनवर वर चढून काम व्यवस्थित चालू आहे की नाही याची पाहणी केली. रेजिनाल्ड यांचा सध्याचा जोश तसा चांगलाच आहे. पण, तो पुढेही असाच राहणार ना? ∙∙∙

अजब न्याय

अजब न्याय वर्तुळाचा नावाचे एक नाटक मागे आले होते. मडगाव नगरपालिकेचा कारभार काहीसा या नाटकासारखा नसला तरी त्याच्या शिर्षकासारखा असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पालिकेने कोविडमुळे फटका बसल्याने तिच्या सोपो कंत्राटदाराचे पाच महिन्याचे सोपो शुल्क माफ करून टाकले. पण, त्याचबरोबर बाजारातील विक्रेत्यांनी लॉकडाऊन काळातील सोपो व भाड्यात सवलत द्यावी म्हणून केलेली मागणी कायद्यात तरतूद नसल्याची सबब सांगून फेटाळली होती. सध्या मडगाव बाजारातही सोपो माफीची बाब चवीने चघळलेली दिसून येत आहे. ∙∙∙

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधक वरचढ!

गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, हे अगदी सुस्पष्टच झालेले आहे. केवळ डॉ. प्रमोद सावंत यांनी औपचारिकदृष्ट्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा सोपस्कार पूर्ण करणे तेवढे बाकी आहे. असे असले तरी, विकासकामांचा पाठपुरावा व कार्यवाही करण्याच्या बाबतीत सत्ता नसतानाही हळदोणेचे काँग्रेसप्रणित आमदार कार्लुस फरेरा यांनी चांगल्यापैकी भरारी घेतली आहे. त्यांची धडाडी लक्षात घेऊन विरोधी पक्षनेतेपदासाठीही त्यांचे नाव घेतले जात आहे. ते तर सोडूनच द्या. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून धोकादायक असलेली म्हापसा येथीत तार नदीतील जलपर्णी नदीच्या पात्रातून काढण्याच्या बाबतीत भाजप सरकारने काहीच केले नाही कार्लुस फरेरा हे सध्या भाजपपेक्षा वरचढ ठरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी तार नदीचे प्रदूषण दूर करण्याबाबत पुढाकार घेतलेला असून, त्यांच्या आक्रमकेतेमुळे भाजपवाल्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचे ऐकिवात आहे. ∙∙∙

सुदिनच्या व्हिडीओने करमणूक

सुदिन ढवळीकर यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचे जुने व्हिडीओ आता व्हायरल व्हायला लागले आहेत. निकालापूर्वी सुदिनांचे जे वक्तव्य केले त्याचे ‘व्हिडियो’ आता सगळीकडे पसरायला लागले आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा व्हिडियो म्हणजे डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यास भाजपला मगोपचा पाठिंबा असणार नाही असे जे ते बोलेले होते. त्यात ते म्हणतात - ज्यांनी सुदिन ढवळीकरांना मंत्री म्हणून काढले मगोपक्षाच्या दोन आमदारांना विकत घेतले. त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य. आता, मात्र तेच डॉ. सावंताना चांगला माणूस असल्याचे सर्टिफिकेट देताना दिसताहेत. हे दोन विरोधाभास दाखवणारे सुदिनांचे व्हिडियो सध्या राज्यात लोकांची भरपूर करमणूक करताना दिसताहेत. त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसताहेत. सध्याच्या व्हिडियोच्या जमान्यात राजकारण्यांनी बोलण्याआधी मर्यादा सांभाळणे गरजेचे असते ही शिकवण हे व्हिडियो देतात.

बाबू गेले, बाबा तरले

विधानसभा निवडणुकीने यावेळी काही नवे विक्रम नोंदविले आहेत. मावळत्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री होते. तेवढ्याने भागत नाही तर ते दोघेही बाबू म्हणून परिचित होते. पण, त्या दोघांना मतदारांनी घरी पाठविले. त्यातील केपेचे बाबू तर सतत पाचदा निवडून आले होते. पण, यावेळी ते हरले. दुसरे बाबू मडगावच्या कायापालटाचा ध्यास घेऊन पेडणेहून मडगावात आले होते. पण, मतदारांनी त्यांची गय केली नाही. त्यामुळे नव्या विधानसभेत कोणी बाबू असणार नाही. त्याचबरोबर वाळपई व मडगाव अशा दोन ठिकाणच्या बाबांना पूर्वीहून अधिक मतांच्या आघाडीने पुन्हा विधानसभेत पाठविले आहे. एकेक नवल म्हणतात ते हे. ∙∙∙

क्रूझ सिल्वा बनतोय सक्रिय !

रिकामे भांडे ज्यास्त आवाज करते" अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. वेळळी मतदारसंघात अशी अनेक रिकामी भांडी आहेत. केवळ व्हिडियो समाज माध्यमावर व्हायरल करून राजकारण्यांवर टीका करणारे हे पेपर टायगर खऱ्या समस्यांवर आवाज उठवित नाहीत. वेळळीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या क्रीडा प्रकल्प विना उपयोग पडून होता तो पुन्हा सुरू करण्याचे काम क्रूझ यांनी युद्ध पातळीवर सुरू केले, याला म्हणतात आमदार.. ∙∙∙

गोविंदरावांचा धडाका...

निवडणुकीमुळे काही विकासाची कामे अडून राहिली होती. पण आता निवडणूक झाली, निकाल लागला, मंत्रिपदेही काहीजणांना मिळणार आहे. हे सर्व सोपस्कार पूर्ण होणार आहेतच. पण, प्रियोळ मतदारसंघातील म्हार्दोळ ते आपेव्हाळ - प्रियोळ दरम्यानच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे रखडलेले काम मंत्रिपद मिळायच्या अगोदरच या मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी धडाक्यात सुरू केले. आमदार गोविंद गावडे यांनी स्वतः श्रीफळ वाढवून आताच्या कार्यकाळातील पहिल्या कामाचा प्रारंभ काल केला. मंत्रिपदाचे नंतर बघुया, विकासकामांना पहिले प्राधान्य, हाच संदेश गोविंदरावांनी दिला आहे, अशा प्रतिक्रिया या हॉटमिक्स डांबरीकरण कामावेळी व्यक्त होत होत्या. ∙∙∙

पालिकेत सब अलबेल !

‘देव बोवाळा पडलो आनी इगर्ज नागयली’ अशी कोकणीत एक म्हण आहे. कुंकळळी नगरपालिका मंडळाची स्थिती सध्या अशीच झाली आहे.पालिकेत कोणाच्या पायात कोणाला पायपोस नाही. पालिकेचे अधिकारी जाग्यावर असत नाहीत भेटणा-यांना जनतेने निवडून दिलेले मायबाप नगरसेवक भेटत नाहीत. कर्मचारी जाग्यावर दिसत नाहीत. एकूण काय सब अलबेल अशीच स्थिती आहे .म्हणतात ना, वडील जाग्यावर नसला तर कुटुंब हाताबाहेर जाते तसाच हा प्रकार. आता पाहूया नवनिर्वाचित आमदार पालिकेचा कारभार जाग्यावर आणतात काय, की ये रे माझ्या मागल्या.. ∙∙∙

नगराध्यक्ष बनण्याची तयारी

दिदीच्या पक्षाकडून निराशा झाल्यावर तृणमूल पक्षाचा राजीनामा दिलेले मडगावचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी मडगावात ठिकठिकाणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करणारे फलक लावल्याने कित्येकांच्या भुवया वर गेल्या आहेत. महेशची ही भाजपात पूनरप्रवेश करण्याची तयारी असे सांगितले जाते. एरव्ही महेश पूर्वी भाजपचेच कार्यकर्ते होते. मात्र, दिगंबर काँग्रेसमध्ये आल्यावर तेही काँग्रेसवासी झाले. मात्र, आता काँग्रेसमध्ये काही राम राहिलेला नाही हे त्यांच्या लक्षात आल्याने महेशरावही बाजू बदलण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. भाजपात जाऊन मडगावचे नगराध्यक्ष बनण्याची तयारी ते करत असल्याचे सांगितले जात आहे. ∙∙∙

प्रकाश सर जागे झाले!

संपूर्ण देशात सगळ्या सरकारी खात्यात, शिक्षण संस्थांत, स्थानिक स्वराज्य संस्थात आरक्षण लागू आहे अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीयांसाठी राजकीय आरक्षण आहे विधानसभेत सोडून. गोवा विधानसभेत एसटीला जागा आरक्षित ठेवण्याची मागणी माजी आमदार प्रसाद गावकर यांनी केली होती त्या वेळी‘उटा’ वाले गप्प बसून होते. आता प्रकाश वेळीप जागे झाले असून एसटीला भाजपा सरकार विधानसभेत जागा आरक्षित करणार, असे वेळीप म्हणतात. भाजपात उटाचे स्थंभ मानले जाणारे रमेश, गोविंद व गणेश आहेतच की त्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज? असे आम्ही नव्हे एसटी बाधवच म्हणतात.. ∙∙∙

मायकल तुम्ही शांत का?

सरकारमध्ये असताना मायकल लोबो यांनी भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारला धारेवर धरण्याची मायकल एकही संधी सोडत नव्हते. सरकारमध्ये असून मायकल असे सारखे सारखे का बरसतात, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता काँग्रेसवासी झालेले मायकल लोबो सध्या करतात तरी काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. मायकल हे तसे मुरब्बी राजकारणी आहेत त्यातच उत्कृष्ट फुटबॉलरही. त्यामुळे गोल किती अंतरावरुन मारायचा याचा त्यांना चांगला अंदाज आहे. कदाचित, त्यामुळे मायकल यांनी आपली भूमिका सध्यातरी उघड केली नाही. आता काँग्रेसवासी मायकल विरोधी बाकावर राहिले तर काय करतील, याची उत्सुकता मात्र राजकीय वतुर्ळाला आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT