शिवोली: बार्देशातील शापोरा येथील मच्छीमार जेटीची अत्यंत दुरवस्था झालेली असून सरकारच्या संबंधित खात्याकडून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच येथील जेटीची अशी अवस्था झाल्याचे शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी सांगितले.
या भागातील बहुतेक मासेमारी ट्रॉलर्स शापोरातील जेटी परिसरात नांगरुन ठेवण्याच्या कामाला गती आलेली असून त्यासाठी परप्रांतीय कामगार तसेच स्थानिक ट्रॉलर्स मालक कामाला लागल्याचे या भागाचा शनिवारी दौरा केला असता दिसून आले.
जून ते ऑगस्ट असे दोन महिने राज्यात मासेमारी बंदी काळ असल्याने या काळात कुठल्याही प्रकारची मासेमारी यांत्रिक बोटीद्वारे केली जात नाही, परंतु परराज्यातील मासेमारी ट्रॉलर्स राज्याच्या हद्दीत अतिक्रमण करून बेकायदा मासेमारी करण्याचा अनेकदा प्रयत्न करत असतात. त्यामुळे राज्यातील कोस्टल पोलिस यंत्रणा या काळात सतर्क राहाणे गरजेचे असल्याचे मालवणकर यांनी सांगितले.
शापोरात एकेकाळी १८० ते २०० फिशींग ट्रॉलर्स मासेमारी करण्यासाठी समुद्रात सोडले जायचे, परंतु दुर्दैवाने गेली अनेक वर्षे या भागात सेंड बार (पाण्याखाली वाळूच्या टेकड्या निर्माण होणे) ची अतिशय गंभीर समस्या निर्माण झाल्याने अनेकांच्या बोटी या सेंडबारना आढळून अपघातग्रस्त होऊ लागल्या. सेंड बारच्या भीतीने अनेकांनी या भागातून आपला पाया काढता घेतला असून सध्याच्या स्थितीत शापोरा जेटीवर अवघ्यात बोटी आहेत.
अवकाळी पाऊस आणि वादळी वातावरणामुळे खारीवाडा जेटीवरील मच्छीमारांनी औपचारिक मासेमारी बंदी लागू होण्यापूर्वीच १५ दिवस अगोदरच सुमारे २५० ट्रॉलर्स नांगरुन ठेवण्यात आले आहे. तसेच लहान होड्या जेटीवर आणून डागडुजी सुरू करण्यात आली आहे.
उद्या रविवारी (ता. १) पासून बंदीमुळे या जेटीवरून होणारी मासेमारी बंद झाली आहे. तेव्हा आज खारीवाडा जेटीवर सामसूम होती. मासेमारी व्यवसायात गुंतलेले सुमारे ८० टक्के कामगार गावी परतले असल्याचे अखिल गोवा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष फिलीप डीसोझा यांनी सांगितले.
राज्यात १ जूनपासून मासेमारी बंदी लागू होते. ही बंदी दोन महिने असणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी करण्यास बंदी घातली जाते. पण यंदा १५ दिवसांपूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने खारीवाडा जेटीवरील मच्छीमार व्यावसायिकांना मासेमारी बंदी काळाच्या १५ दिवस अगोदरच समुद्रातील ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणून मासेमारी बंद करण्यास भाग पाडले.
पर्ससीन आणि मासेमारी ट्रॉलर्स असे सुमारे २५० ट्रॉलर्स जेटीनजीक नांगरून ठेवले आहेत. या जेटीवर सुमारे ३ हजारांहून अधिक परप्रांतीय कामगार काम करतात. यंदा ८० टक्के कामगार आठवड्यापूर्वीच आपापल्या गावी परतू लागले आहेत. छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आदी राज्यांतून हे कामगार गोव्यात येतात. १ ऑगस्टपूर्वी ते परत गोव्यात येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.