पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 10 फेब्रुवारी रोजी गोव्यात येत आहेत. गुरुवारी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील जागेत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 11 तारखेला गोव्यात येणार असे कळविण्यात आले होते. मात्र, मोदी यांचा दौरा 10 रोजी ठरला आहे. गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता ते म्हापसा (Mapusa) येथे जाहीर सभेला संबोधित करतील. या बदललेल्या तारखेची नोंद गोमंतकीयांनी घ्यावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) प्रचाराचा वेग वाढवला आहे. पुढील पाचही दिवसांत केंद्रीय मंत्र्यांच्या बारापेक्षा जास्त जाहीर सभा होणार आहेत. शिवाय घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे. तानावडे म्हणाले, प्रचारासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असल्याने त्या दिवसांत केंद्रीय नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
मंगळवार दि. 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पेडणे, थिवी, शिवोली येथे जाहीर सभा होणार आहेत. तर, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या फातोर्डा आणि नावेली येथे जाहीर सभा होत आहेत. 9 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा मये, डिचोली आणि साखळी येथे होणार आहे. तर, याच दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या जाहीर सभा फोंडा व वास्को येथे होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.