पणजी: केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) भ्रष्टाचारविरोधी शाखेने फोंडा येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक अंकित गोयल यांच्याविरुद्ध गृह आणि मुद्रा कर्ज प्रक्रिया करण्यासाठी लाच मागितल्याचा आणि बहीण अंजली गोयल हिच्या बँक खात्यावरून रक्कम स्वीकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली सीबीआयने या दोघा भावाबहिणीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती सीबीआयच्या गोव्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
कर्ज अर्जदारांना त्रास दिल्याचा आणि त्यांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारी सीबीआयला मिळाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पुराव्यांसह ईमेल तक्रारींमुळे सीबीआयतर्फे औपचारिक कार्यवाही सुरू करण्यापूर्वी आरोपांची पडताळणी करण्यात आली.
पडताळणी केल्यानंतर, व्यवस्थापक अंकित गोयल हा गृह व मुद्रा कर्जाचे अर्ज हाताळत होता. कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांकडून तो लाच घेत होता व ही रक्कम बहीण अंजली गोयल हिच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगत होता.
अंकित यांनी त्यांची बहीण अंजली गोयल यांच्या खात्याद्वारे अनेक वेळा अनुचित फायदे मागितले आणि स्वीकारले हे देखील सिद्ध झाले आहे असे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अंकित याच्यासह त्याची बहीण अंजली हिलाही सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
सीबीआयच्या मते, गृह कर्ज अर्ज प्रक्रिया करण्यासाठी अंकितने कथितपणे ४ लाख रुपयांची लाच कशी मागितली याचे तपशीलवार वर्णन किमान दोन तक्रारींमध्ये आहे. एका प्रकरणात, तक्रारदाराने आरोप केला आहे की, अंकितने व्हॉट्सॲपद्वारे त्याच्याशी संपर्क साधला आणि लाच देण्यास विलंब केल्याने त्याने अनिश्चित काळासाठी कर्ज रोखून धरले. या प्रकरणाबद्दल चौकशी केल्यानंतर अंकित बँकेच्या शाखा प्रमुख आणि दुसऱ्या शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार गैरवर्तन करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अंकित बँकेच्या नावाखाली मोठे रॅकेट चालवत होता का, याचा तपास सीबीआय करत आहे. तक्रारदाराने अंजलीच्या खात्यात केलेल्या व्यवहारांचे पुरावे देखील दिले आहेत, ज्याचा वापर लाच घेण्यासाठी केला गेला असल्याचा संशय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.